मेलेल्या माणुसकीचे दर्शन...
महा एमटीबी   28-Jul-2018नाजाणे कित्येक दिवस अन्नाचा कण पोटात न गेल्यामुळे तीन बहिणींवर काळाने घाला घातला. वय वर्षे आठपेक्षा कमी असलेल्या या बहिणी. त्यांची आई त्यांना दवाखान्यात घेऊन गेली, तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उपासमारीने त्या दगावल्या. मृत्युपूर्वी त्या तिघी आईकडे ‘भूक लागली, जेवण दे,’ म्हणत होत्या आणि इतके बोलून त्या बेशुद्ध पडल्या. त्यांची आई मानसिक रुग्ण आणि वडील कामाच्या शोधात गेलेले. कित्येक दिवस घरातून बेपत्ता. छे... त्या तीन मुलींची अन्नान्न दशा, अन्नाच्या एका शितासाठी कणाकणाने मरणारं त्यांचं शरीर... सगळं सगळं डोळ्यासमोर येतं आणि त्याचबरोबर ‘मला हे नको, मला ते नको’ म्हणत किमती अन्नपदार्थांना नाकारणारेही डोळ्यासमोर येतात. ‘हॅपी बर्थडे टू यू’ म्हणत नामांकित केकशॉपमधला केक एकमेकांच्या तोंडावर फासणारेही आठवतात. लग्नसमारंभात आणि तत्सम प्रसंगात जेवणावळी उठविणारे आणि तितकेच अन्न ताटात उरवून टाकणारेही आठवतात. जगभरातही असे दृश्य आहेच म्हणा ! ‘ग्लोबल फुड सिक्युरिटी इंडेक्स’च्या मते १/५ भारतीय उपासमारीने त्रस्त आहेत. या विषयाचा अभ्यास कारणाऱ्या सामाजिक संस्थांच्या मते तर १० पैकी ९ बालके ही विविध कारणामुळे वयाच्या २ वर्षांपर्यत कुपोषणाने ग्रस्त असतात. अर्थात, जगात जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचे आपले प्रारब्ध आणि कर्म असते. पशूपक्षी, प्राणी, कीटक सगळेच आपले अन्न स्वतः शोधतात. पण, गोष्ट जेव्हा लहानग्यांची येते तेव्हा त्यांनी काय करावे? दिल्लीमध्ये उपासमारीने मृत्यू झालेल्या तीन बहिणींच्या मृत्यूला संशयाचे अनेक कंगोरे आहेत. त्या मुली होत्या म्हणून त्यांना मरण्यासाठी सोडले, हा एक भाग असेल का? शेजारी एक कुटुंब राहते आणि त्यात तीन छोट्या मुली आहेत, त्यांचे वडील बेपत्ता आहेत. आई मानसिक रुग्ण आहे. त्या मुली कशा जगत असतील? याबाबत आजूबाजूच्यांना जराही काही वाटले नाही? काय असेल की बाजूला मुली मरत असताना शेजारपाजारच्या वस्तीला त्यांचे काही सोयरसुतक नव्हते. अर्थात, शेजाऱ्यापाजाऱ्यांनी त्यांचा ठेका का घ्यावा असाही सूर उमटेल. पण तरीही, या मुलींच्या मृत्यूने मेलेल्या माणुसकीचे दर्शन झाले...

 

कोणी अन्न देते का अन्न?

 

दिल्लीत उपासमारीने मेलेल्या बहिणींचे दुःख ताजे आहे, जे निर्भया हत्याकांडाइतकेच लज्जास्पद म्हणावे लागेल. जेव्हा-तेव्हा मानवी हक्काच्या गप्पा मारणारे, ‘हमे चाहिए आझादी’चे नारे लावणारे किंवा एखाद्या देशद्रोह्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढणारे या घटनेवर मात्र चिडीचूप आहेत. वनवासी भागातल्या गरीबांना, भोळ्या समाजाला कोणत्याही क्षुल्लक कारणाने चिथवून देशविरोधी शक्ती तयार करणारेही आता मूग गिळून शांत आहेत. हो, नेहमीप्रमाणे काहींनी गळा काढला की यात सरकारचे अपयश आहे. पण, ते सरकारचे अपयश कसे, हे मात्र कुणीही स्पष्ट करत नाही. दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांसाठी सरकारने कितीतरी योजना बनवल्या. अन्नसुरक्षा कायदा त्यापैकी एक. सरकार दारात आणून देईल, पण सरकारने दिलेले घरात घ्यायला घरातले तरी राजी पाहिजेत ना? या मुलींचे कुटुंब मूळचे पश्चिम बंगालचे. तिथून हे कुटुंब रोजीरोटीसाठी दिल्लीत आले होते. उघड आहे, दिल्लीत आले म्हणजे त्यांच्याकडे दिल्लीतले एकही सरकारी कागदपत्र नसेल, की ज्या अन्वये ते सरकारी सुविधांचा लाभ घेतील. रेशनकार्ड, ओळखपत्र जरी असली तरी पश्चिम बंगालचीच असतील. या मुलींना वेळीच अन्न मिळाले असते तर त्या वाचल्या असत्या. हकनाक बळी गेल्या नसत्या. सहज मनात येते की, त्या मुली मरत असताना आंदोलनाच्या नावाने महाराष्ट्रात करोडो रुपयांचे दूध रस्त्यावर फेकले गेले. मालवाहतूक संपाच्या आड करोडो रुपयांचे धान्य, फळे सडवली गेली. हे पापच आहे. अन्नाची किंमत त्या मुलींच्या मृत्यूपेक्षा कोण जास्त सांगेल? या मुलींच्या मृत्यूचे राजकारण न करता उपासमारीच्या भस्मासुराला कसे संपवायचे? दूध म्हणून पिठाचे पाणी पिणारा अश्वत्थामा आम्हाला नवा नाही आणि पोटाची खळगी भरण्यासाठी भिक्षा मागत असताना क्रूरपणे मृत्यू पावणारेही आमच्याच समाजातले. हे असं कुणी मरू नये म्हणून काय करता येईल का? हा मोठा प्रश्न आहे आणि हा मोठा प्रश्न आरक्षण मिळालेल्या, न मिळालेल्या आणि मिळवू पाहणाऱ्या सर्वच समाजाचा प्रश्न आहे. त्यात माणूस म्हणून विचार करताना कुणीतरी दुबळ्या-गरजू, पण असमर्थ भुकेलेल्यांच्या पोटी अन्न देईल का, अन्न?