वंचितांची नवी ‘उमेद’
महा एमटीबी   27-Jul-2018


 


“मुलं देवाघरची फुलं म्हणतात ना, मग, या फुलांना कोणीतरी खत-पाणी घालायला हवं ना, याच फुलांची मी फक्त माळी आहे,” असं म्हणणाऱ्या मंगेशी मून यांच्या ‘उमेदी’ने भारलेल्या कार्याविषयी...

 

भारताला स्वातंत्र्य मिळून तब्बल ७० वर्षं पूर्ण झाली, तरी आजही अनेक मुलं शिक्षणापासून वंचित असतील, तर या स्वातंत्र्याला काय म्हणावे? हा प्रश्न खरंतर समाजात राहणाऱ्या प्रत्येक सुजाण नागरिकाला पडणं गरजेचं आहे. यातूनच कदाचित काही वर्षांनी एक ‘समृद्ध आणि साक्षर भारत’ तरी निर्माण होईल. आजही समाजातील काही जाती-जमातींकडे एका विशिष्ट नजरेने पाहिलं जातं. त्यात भटक्या-विमुक्त जमातींविषयी आजही आपल्या मनात संशय येतो, त्यांच्याकडे गुन्हेगारांच्या नजरेतून पाहिलं जातं. हा संशय म्हणजे मानसिक गुलामगिरी तर नाही ना, असा सवाल मंगेशी मून या तरुणीला पडला आणि या विमुक्त जमातीतील मुलांना आधार मिळाला. “आजूबाजूला काय चालू आहे हे माहीत असताना, डोळे बंद करून जगणं मला जमतही नाही आणि कधी जमणारही नाही”, असं परखडपणे मंगेशी म्हणाल्या.

 

३६ वर्षांच्या मंगेशी मून या वर्धा जिल्ह्यातील पारधी समाजातील मुलांना शिक्षित करण्याचं काम करतात. लग्नानंतर इतर मुलींप्रमाणे त्याही संसारात रमल्या खऱ्या, पण अनेक प्रश्न त्यांना सतत भेडसावत राहायचे. मुंबईतल्या रेल्वेमध्ये आणि पुलांवर भीक मागणारी मुलं पाहून त्यांना सतत आपण काहीतरी केलं पाहिजे, असं वाटायचं. मात्र, त्यांना योग्य दिशा मिळत नव्हती. त्यातच त्यांनी स्थलांतरित मुलांसाठी शाळा चालवायचं काम हाती घेतलं. हे काम करता करता मंगेशी यांनी ‘प्लॅटफॉर्म स्कूल’ची ही सुरुवात केली. या दरम्यान, एक गोष्ट त्यांना कटाक्षाने जाणवली ती म्हणजे, मुलांना असलेली शिक्षणाची आवड आणि परिस्थिती यात मुलं हरवून जातात. स्थलांतरित मुलांना शिकवत असताना त्यांना समजलं की, विदर्भातील कुटुंबच्या कुटुंब शहरात स्थलांतरित होत असतात. त्यांची मुलं लोकलमध्ये, रस्त्यांवर भीक मागतात किंवा दारुच्या भट्टीत काम करतात आणि कालांतराने स्वत: त्या व्यसनांच्या आहारी जातात. हे वास्तव धक्कादायक होतं. मंगेशी यांनी विविध ठिकाणी सर्व्हे करुन काय करता येईल, या प्रश्नांची उत्तरं शोधली. अखेर हे वास्तव बदलण्यासाठी त्यांनी या मुलांच्या शिक्षणासाठी काम करण्याचा निर्णय घेतला.

 

मंगेशी यांनी हा निर्णय घेतला खरा, पण मुलांना जमवणं हे काही सोपं काम नक्कीच नव्हतं. सभोवतालच्या निष्पाप वंचिताच्या आयुष्यात अर्थ भरून स्वत:चे आयुष्य सार्थकी लावण्यासाठी मंगेशी मून यांनी ‘उमेद’ संस्थेची स्थापना केली. भटक्या-विमुक्त जमातीतल्या मुलांच्या पालकांना स्वत: त्या भेटल्या, परंतु पालकांनी मुलांना या संस्थेस पाठवण्यास नकार दिला. त्यांचा आधार जाईल, भीक कोण मागणार अशी कारणं देऊन त्यांनी मंगेशी यांना पळवून लावले. असा प्रकार एक-दोन वेळा नाही, तर अनेक वेळा घडला. पण, मंगेशी यांनी जिद्द सोडली नाही. अखेर पहिल्या वर्षात त्यांच्या ‘उमेद’ या वसतिगृहात १० मुलं होती आणि सध्या त्यांच्या वसतिगृहात ४८ मुलं-मुली राहतात. वर्धा जिल्ह्यात अगदी खेड्यात त्यांनी आपल्याच जमिनीवर वसतिगृह सुरू केले. आपल्या १० एकर जमिनीत शेती करून मुलांच्या आहाराचा प्रश्न सोडवला. शिक्षणासाठी त्यांनी मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल केले. मुलांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी त्यांना झगडावे लागले. वडिलांच्या मदतीने त्यांनी हे शिवधनुष्य पेललेही. पण, इथवरचा प्रवास खडतर होता. अनेक वेळा रात्री-अपरात्री मुलं पळून जायची, मग त्यांना परत घेऊन येणं, व्यसनांपासून त्यांना मुक्त करणं अशी सगळी कसरत त्या करत असतात. या सगळ्यातच मुलांना शेतीविषयक माहिती मिळावी म्हणून त्या वसतिगृहातील मुलांना शेती ही शिकवू लागल्या. मंगेशी मून यांनी आपला संसार सांभाळून ४८ मुलांचं मातृत्व स्वीकारलं.

 

वसतिगृहातील मुलांना घरपणं मिळावं म्हणून मंगेशी यांनी आपल्या शेतात ‘अॅग्रो टुरिझम’ची सुरुवात केली. यामुळे राज्यातील ठिकठिकाणाहून पर्यटक त्यांच्या शेताला आणि वसतिगृहाला भेट देतात. “या ‘अॅग्रो टुरिझम’मुळे मुलांमध्येही सकारात्मक बदल होतो. घर म्हणजे काय हे त्यांना कळायला लागतं आहे,” असं मंगेशी आनंदात म्हणाल्या. पारधी समाजाला इतर समाजासारखं जगता यावं, यासाठी सर्वांनी एकत्र येऊन मदत करण्याची गरज आहे. शेवटी “ ‘मुलं देवाघरची फुलं म्हणता’ मग, या फुलांना कोणीतरी खत-पाणी घालायला हवं ना, याच फुलांची मी फक्त माळी आहे,” असं शेवटी हसत हसत मंगेशी म्हणाल्या.

- प्रियांका गावडे

9594969640