स्नेहग्रामचा महेश 'दादा'
महा एमटीबी   26-Jul-2018


 


गरजुंना तुम्ही कितीही पैसे द्या, त्यांच्यात बदल होणार नाही, मात्र शिक्षण दिलं तर त्यांच्या सोबत त्यांच्या कुटुंबाचा उद्धार होणार आहे, त्यांचा शाश्वत विकास होणार आहे. याच तत्वावर शेकडो कुटुंबाचा उद्धार करणाऱ्या स्नेहग्रामचा अवलिया महेश निंबाळकर या तरुणाच्या कामाचा हा आढावा...

 
 

महेश निंबाळकर हा मूळचा बार्शीतील, शिक्षणाची त्याला प्रचंड आवड मात्र लहानपणापासून घरची परस्थिती बेताची असल्याने आर्थिक चणचण पाचवीला पुजलेली, यामुळे शिक्षणात अनेकवेळेस अडचणी निर्माण व्हायच्या, पण थांबणं हे जिद्दी महेशच्या रक्तात नव्हतं... काहीही करून शिक्षण पूर्ण करायचा निर्धार मनी होता. शिक्षणाचा व क्लासचा खर्च भागवण्यासाठी महेश क्लासचे वर्ग झाडून घेई, काही दिवस त्याने बिगारीचे काम केले तसेच त्याने वीटभट्टीवर काम करत शिक्षण पूर्ण केले आणि शिकता शिकता तोच शिक्षक झाला... मात्र त्याचा प्रवास इथपर्यंतच मर्यादित नव्हता, कारण महेश संवेदनशील प्रवृत्तीचा असल्याने आपण ज्या कठीण परिस्थितीत वाढलो त्याची त्याला जाण होती. म्हणूंनच त्याने बार्शी येथे स्नेहग्राम प्रकल्पाची उभारणी करत वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पत्नी विनयासोबत धडपडतो आहे.

 

 
 

कोणतेही काम करत असताना त्यामागे एखादा प्रसंग असतो. तसाच प्रसंग महेशच्या आयुष्यात घडला. एकदा तो बार्शीमधील लातूर रोडवरून जात होता. या ठिकाणी डवरी गोसावी या भटक्या समाजातील कुटुंबांची पालं पडलेली असतं. भटकंती करून गुजराण करत आला तो दिवस ढकलणे हे त्यांचं पिढ्यानपिढ्या चालत आलेलं काम. दिवसभर पालावरील कर्ती माणसं पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करणार मग दिवसभर त्यांची मुलं पालावर व आजूबाजूला हुंदडायची. ही हुंदडाणारी मुलं नेमकं त्याच दिवशी महेशच्या नजरेस पडली. शिक्षक असलेल्या महेशच्या मनात प्रश्न निर्माण झाला कि, सर्व शिक्षा अभियान चालू असताना ही एवढी शालाबाह्य मुलं कशी काय असू शकतात. दुसऱ्याच क्षणी त्याच्या असं निदर्शनास आलं कि, कोणाच्याही धाकात नसलेली, लहानपणापासून व्यसनांना जवळ करणाऱ्या या समाजाच्या पिढ्यानपिढ्या बरबाद होत असणार. आपल्या समाजव्यवस्थेतील एक घटक असा बरबाद कसा काय होऊ द्यायचा ही कल्पनाच त्याला सहन झाली नाही आणि तो या गोष्टीने अस्वस्थ झाला. यांच्यासाठी काहीतरी करायचं हे त्यानं मनात पक्क केलं आणि एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली.

 


 
 

सुरुवातीला त्याने त्या ठिकाणी सर्वे केला तर त्याला जवळपास १०० मुलं शालाबाह्य असलेली निदर्शनास आलं. या संबंधी जवळच्या शाळेंना विचारल मात्र त्यांच्याकडून देखील समाधानकारक उत्तर आलं नाही. शेवटी महेशने हा याचा रिपोर्ट बनवला आणि दिल्ली येथील मनुष्य संसाधन मंत्रालयाला पाठवला. यानंतर यंत्रणा हलली आणि या मुलांना शाळेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरु झाली. शाळा जवळ नसल्याने मुलं शाळेत जाण बंद झाले. मग यावर मार्ग काढत महेशने २००७ साली त्या वस्तीवर पहिली भटक्यांची शाळा सुरु केली, या मुलांच्या शिक्षणावर स्वतःच्या खिशातून पैसा खर्च होत होता मात्र सहा महिने झाले तरी अपेक्षित रिझल्ट मिळत नव्हता. या कालावधीत त्याने या वस्तीवर अनेक प्रयोग राबवले. व्यवसायासाठी बीजभांडवल दिलं, अन्नधान्यची मदत, आरोग्य कॅम्प, महिलांचे सीझर, जनजागृती सारखे अनेक कार्यक्रम राबवले. हे सर्व करत असताना त्यांनी २६ कुटुंबाला कागदपत्राशिवाय रेशनकार्ड काढून दिले आणि खऱ्या अर्थाने या कुटुंबाला मुख्यप्रवाहात येण्यास मदत केली.

 
 

 
 
 

नोकरी आणि स्वखर्चातून या वंचितांसाठी काम करत असताना संसारात अनेकदा काटकसर करावी लागली. अनेक अडचणी निर्माण झाल्या मात्र अर्धांगिनी विनयानीं कधीही तक्रार केली नाही. शेवटी अपेक्षित रिझल्ट मिळत नसल्याने महेशने नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्णवेळ या मुलांसाठी काम करण्याचं ठरवलं. यातूनच त्याने २०१५ साली स्नेहग्राम प्रकल्पाची मुहूर्तवेढ रोवली. सुरुवातीला डवरी गोसावी, शिकलकर, बावरी समाजाच्या मुलांसाठी असणार काम स्नेहग्राममुळे सर्वांसाठी खुलं झालं. आज सर्व समाजाची ४० मुलं या ठिकाणी निवासी आहेत. या प्रकल्पाअंतर्गत फक्त त्यांच्या शिक्षणावरच नाही तर सर्वांगीण विकासावर लक्ष दिलं जात. महेश व विनया हे जोडपं मिळून या मुलांसाठी अहोरात्र झटत आहेत. शिक्षणासोबत विविध उपक्रम राबवले जातात. फिनलेन शिक्षण पद्धती हे या शाळेचं आणि विद्यार्थ्यांचं मुख्य आकर्षण आहे. ४५ मिनिटं मुलांना शिकवणे व १५ मिनिटे त्यांना खेळायला सोडणे, यामुळे मुलांचा शिक्षणात गोडी निर्माण झाली. या प्रकल्पात विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेतली जाते, टॅब स्कुल, ई-लर्निंग, बालसंसद, विद्यार्थी बचत बँक, ग्रीन टीम असे अनेक प्रयोग चालू असतात. प्रकल्पाच्या परिसरात जवळपास ७०० झाडे निंबाळकर जोडपं व मुलांनी मिळून लावले आहेत. स्वयंपाक बनवणे, झाडांची आणि परिसराची निगा राखणे अशी सर्व कामे सर्वजण मिळून करतात.

 
 

 
 
 

'मुंबई तरुण भारत'शी बोलताना महेश म्हणाला कि, "एखादा प्रकल्प राबवत असताना अनेक अडचणी असतात, या अडचणी कधीही संपत नसतात. ज्यावेळी अडचणी संपल्या त्यावेळी तो प्रकल्प संपला. मात्र अडचणी येतात म्हणून रडायचं नाही तर त्यावर मार्ग काढत पुढे-पुढे चालत राहायचं". हा प्रकल्प राबवत असताना आमटे कुटुंबीय, रमेश घोलप, ओमप्रकाश शेट्ये, कीर्ती ओसवाल आदींची खूप मदत झाली. त्यांची मदत व लोकसहभागावर हा प्रकल्प उभा असे तो म्हणतो. या सर्वांमागे महेशचं एक तत्व आहे. तो नेहमी म्हणतो, "गरजुंना तुम्ही कितीही पैसे द्या, त्यांच्यात बदल होणार नाही, मात्र शिक्षण दिलं तर त्यांच्या सोबत त्यांच्या कुटुंबाचा उद्धार होणार आहे, त्यांचा शाश्वत विकास होणार आहे". याच तत्वावर आज ४० मुलांवर नाही तर ४० कुटुंबावर काम करत आहे. त्याच्या या कामाला मुंबई तरुण भारतचा सलाम...!

 

- विजय डोळे

९८९०७४००४२