सविता दामोदर परांजपे.. एका भुताटकी कथेचे ट्रेलर प्रदर्शित
महा एमटीबी   25-Jul-2018
 
 
 
मुंबई :  अनेक मराठी रसिक प्रेक्षकांनी या आधी सविता दामोदर परांजपे हे नाव ऐकले असेल. रीमा लागूचे प्रसिद्ध नाटक सविता दामोदर परांजपे. या नाटकावरच आधारित सुबोध भावे अभिनित चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे एक निर्माता म्हणून जॉन अब्राहम याचे प्रथमच मराठी सिनेसृष्टीत प्रवेश झाला आहे. ट्रेलरवरुन तरी हा चित्रपट उत्कंठावर्धक आणि मनोरंजक असल्याचे जाणवते.
 
 
 
यामध्ये मुख्यभूमिकेत सुबोध भावे, तृप्ती मधुकर तोरडमल आणि राकेश बापट आहेत. तर याचित्रपटाच्या दिग्दर्शिका आहेत स्वप्ना वाघमारे जोशी. ही कथा एका नुकत्याच लग्न झालेल्या जोडप्याची आहे. शरद आणि कुसुम. मात्र कथेत एक भयंकर वळण येतं जेव्हा कुसुमच्या पोटात दुखायला लागतं. सर्व प्रयत्न करुन सुद्धा जेव्हा काही मार्ग निघत नाही, तेव्हा शरद आपल्या मित्राला म्हणजेच अशोकला बोलवतो, कुसुमच्या उपचारासाठी. पहिल्याच भेटीत अशोकला लक्षात येतं तिचं दुखणं हे शारीरिक नाही, मानसिक तर त्याहून नाही. हे त्या सगळ्या पलिकडचे आहे. मंगळसूत्र काढल्यानंतर ती विचित्र वागायला लागते आणि एकच नाव घेते "सविता दामोदर परांजपे.." कोण आहे ही सविता? हेच कोडं उलगडणार आहे, या चित्रपटाच्या माध्यमातून.
 
 
 
 
३१ ऑगस्ट २०१८ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ज्यांनी नाटक बघितलं आहे, त्यांच्यासाठी कदाचित यामधील रहस्य आधीच उलगडलेलं असणार आहे, मात्र नाटकावर आधारित जरी हा चित्रपट असला तरी यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत का? कथानक तसेच ठेवण्यात आले आहे का? आणखी काय नवीन यामध्ये सामिल करण्यात आले आहे, अशा अनेक उत्सुकता या ट्रेलरमुळे निर्माण झाल्या आहेत. ही सर्व कोडी ३१ ऑगस्ट रोजी सुटतील.