पाकिस्तानमध्ये लोकशाही स्थिर होणार का ?
महा एमटीबी   25-Jul-2018

पंतप्रधानपदासाठी पाकिस्तानमध्ये आज मतदान


इस्लामाबाद :
लष्करी हुकुमशाही आणि अस्थिर सरकार यामध्ये गेल्या ७० वर्षांपासून अडकून पडलेल्या पाकिस्तानच्या लोकशाहीसाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असून पाकिस्तानमध्ये आज सार्वत्रिक निवडणुकांना सुरुवात झाली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधान (वजीर-ए-आजम) पदासाठी म्हणून आज देशाभरात मतदान घेण्यात येत असून तब्बल १० कोटी मतदार आज पाकिस्तानच्या भवितव्याचा निर्णय घेणार आहेत.


आज सकाळी ८ वाजल्यापासून संपूर्ण पाकिस्तानमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. पाकिस्तान नॅशनल असेम्बलीच्या ३४२ पैकी २७२ जागांसाठी हे मतदान घेण्यात येत असून या जागांसाठी संपूर्ण देशातून ३ हजार ४५९ उमेदवार मैदानात उतरले आहेत. पकिस्तानमधील तब्बल १० कोटी ५९ लाख मतदारांच्या हातामध्ये सध्या या उमेदवारांचे भवितव्य आहे. याबरोबरच पाकिस्तानमधील स्थानिक जागांवर देखील आज मतदान घेण्यात येणार आहे. आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत देशामध्ये मतदान घेण्यात येणार आहे. त्यानंतर मतदान केंद्रावर सुरुवात करण्यात येणार असून उद्या सकाळपर्यंत निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
 

पंतप्रधान पदासाठी मुस्लीम लीग आघाडीवर

पाकिस्तानमध्ये अनेक वेळा सत्ते राहिलेला नवाज शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लीम लीग (एन) हा सध्या पंतप्रधान पदाचा प्रमुख आणि आघाडीचा दावेदार आहे. शरीफ कुटुंबातील एक आघाडीचे नेते म्हणून ओळखले जाणारे शाहबाज शरीफ यांना सध्या मुस्लीम लीगकडून पंतप्रधान पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांची तारिक-ए-इन्साफ पक्ष हा सध्या मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. तारिक-ए-इन्साफकडून इम्रान खान हेच पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत..

 
मतदानासाठी सध्या संपूर्ण देशामध्ये ८५ हजार मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. देशामध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत असताना देखील संपूर्ण देशामध्ये मतदान घेण्यात येत आहे. त्यामुळे मतदानादरम्यान कसल्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये म्हणून संपूर्ण देशात सध्या साडे तीन लाखांहून सैनिक आणि पोलीस जवान तैनात करण्यात आले आहेत. बलुचिस्तान आणि खैबरपख्तूनमध्ये अनेक मतदारसंघाना अतिदक्षता विभाग म्हणून घोषित करण्यात आले असून त्यानुसार त्याठिकाणी मोठ्या संख्येने सैन्य तैनात करण्यात आले आहे.

सत्तर वर्षांमध्ये २९ पंतप्रधान परंतु एकाचाही कार्यकाळ पूर्ण नाही

१९४७ मध्ये भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यामुळे भारताबरोबरच सध्या पाकिस्तानला देखील ७० वर्ष पूर्ण होत आहेत. मुस्लीम समाजाला गुण्यागोविंदाने आणि भारतापेक्षा अधिक उत्तमपणे राहता यावे म्हणून मोहम्मद अली जीनाने पाकिस्तानची निर्मिती केली. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या ७० वर्षांमध्ये पाकिस्तानमध्ये कधीही लोकशाही नांदू शकलेली नाही.  पाकिस्तानच्या गेल्या ७० वर्षांच्या इतिहासामध्ये या देशामध्ये तब्बल २९ पंतप्रधान झाले आहेत. परंतु यातील एकाही पंतप्रधानाला आजपर्यंत आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. तसेच पाकिस्तानमध्ये सर्वाधिक काळ लष्करी हुकुमशाहीच राहिलेली आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये आजपर्यंत लोकशाही नांदू शकलेली नाही.