ऑटोग्राफ प्लीझ...
महा एमटीबी   25-Jul-2018 


आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या छंदाला समर्पित करणारे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच. त्यापैकीच एक म्हणजे मनोज कुलकर्णी. साडे सहा हजार स्वाक्षऱ्यांचे संग्राहक...

 

वय वर्ष दहा... ‘ऑटोग्राफ’ हा प्रकार माहीत नसताना केवळ बाबा म्हणाले म्हणून आयुष्यातील पहिला ‘ऑटोग्राफ’ घेतला, तो पण क्रिकेटर रमाकांत देसाई यांचा...”मनोज कुलकर्णी अगदी उत्साहात सांगत होते. छंद जोपासणाऱ्या बऱ्याच मंडळींना आपण भेटतो. कुणाला पोस्टाची तिकीटं, विविध नाणी जमवण्याचे छंद असतात. पण, मनोज यांच्यासारखी विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांच्या शे-दोनशे नव्हे, तर तब्बल साडे सहा हजार स्वाक्षऱ्या जमवणारी छंदवेडी माणसं फारच विरळा. मनोज कुलकर्णी हेही त्यांपैकीच एक... आपल्या बाबांकडून ‘स्वाक्षरी छंदा’चा वारसा पुढे नेत असताना केवळ क्रिकेटरच नाही, तर दिग्गज लेखकांचे ‘ऑटोग्राफ’ही जमा करण्यास त्यांनी सुरुवात केली. चिं. वि. जोशी, पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगुळकर यांपासून अगदी तसलिमा नसरिन, विलियम डॅल्रिंपल यांसारख्या आंतरराष्ट्रीय व नावाजलेल्या लेखकांच्या, तर आजी-माजी क्रिकेटर, मोठ-मोठे व्यावसायिक, संगीतकार, अभिनेते इ. लोकांच्या हजारो स्वाक्षऱ्या आणि त्या स्वाक्षऱ्यांमागचे हजारो किस्से...

 

स्वाक्षऱ्या जमवणं हा वाटतो तेवढा सोपा छंद नक्कीच नाही. कधी अभिनेते, संगीतकारांच्या पाया पडून, तर कधी ‘एक कप चहा’ सोबतही मनोज यांनी ऑटोग्राफ्सची जमवाजमव केली. “ये बस रे, चहा घेणार का? असं जेव्हा आशा भोसले म्हणाल्या; तेव्हा कळलचं नाही दोन क्षण की, असं त्या म्हणतील आणि दुसऱ्याच क्षणी त्यांनी स्वत:चं पेन काढून स्वाक्षरीही दिली आणि “माझा ऑटोग्राफ कशाला?” असंही म्हणाल्या.” मधुबाला यांच्यावरील तिकीट प्रकाशनावेळीचा वरील किस्सा मनोज यांनी सांगितला. रतन टाटा यांच्याशी झालेली आकस्मित भेट, क्रिकटपटू माधव आपटेंशी झालेला घरोबा, हे सगळे अनुभव स्वाक्षऱ्यांसोबतच मनोज यांच्या मनात आजही संग्रहित आहेत. एक स्मशानभूमी सोडल्यास मनोज यांनी सर्वच ठिकाणी, वेगवेगळ्या प्रसंगी अनेक मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या जमवल्या आहेत. स्वाक्षऱ्या संग्रहापेक्षा मनोज यांना खराखुरा आनंद मिळतो, तो वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांशी गप्पा मारुन आणि त्यांच्याशी विविध विषयांवर सखोल चर्चा करुन. स्वाक्षऱ्यांच्या या संग्रहासाठी झाडून सगळ्या कार्यक्रमांना मनोज हजेरी लावतात. मग त्या कार्यक्रमात त्यांना प्रवेश मिळो वा न मिळो, स्वाक्षरी मात्र मिळतेच. साडे सहा हजार स्वाक्षऱ्या संग्राह्य असूनही मनोज यांना खंत वाटते ती त्यांच्याकडे नसलेल्या लोकमान्य टिळक, विवेकानंद, राम गणेश गडकरी, बालगंधर्व यांच्या स्वाक्षऱ्यांची...

 

आजच्या सेल्फीच्या युगात कुठेतरी ‘ऑटोग्राफ’ ही संकल्पना नामशेष होते आहे की काय, अशी भीती मनोज यांना वाटते. हल्लीची मुलं स्वाक्षऱ्यांपेक्षा त्या व्यक्तीबरोबर फोटो काढणं अधिक पसंत करतात. कधी कधी समोरचा अगदी त्रासलेला असला तरी मग सेल्फी काढला जातोच, पण तेव्हा धड ना संवाद होतो ना चर्चा. कारण, हे फोटो एकवेळ मेमरीकार्डमधूनही डिलीट होऊ शकतात, पण त्या व्यक्तिमत्त्वांसोबतच्या चर्चा, अनुभव कायम राहतात... पण, तेच कुठेतरी त्या सेल्फींच्या आग्रहात राहून जातं. मुलांनी विविध छंद जोपासावे, यासाठी मनोज नेहमी प्रयत्नशील असतात. त्यांनी आपल्या संग्रहातून स्वाक्षऱ्यांसोबतचं जिव्हाळ्याची नातीही जोडली आहेत. बरेचदा बोलता बोलता त्या मान्यवराच्या स्वाक्षऱ्या घ्यायचे ते विसरल्याचेही एक हलके स्मित करुन ते आवर्जून सांगतात. एवढ्यावर मनोज थांबले नाहीत. आपला छंद आपल्या समाधानापुरता त्यांनी संकुचित ठेवला नाही. त्यांनी आपल्या मित्रांसमवेत ‘हॉबी क्लब’ची स्थापना केली. मुलांना वेगवेगळे छंद जोपासता यावे, तसेच विविध छंद बाळगणाऱ्या छंदिष्टांना त्यांच्या छंदाचे प्रदर्शन करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून या क्लबच्या माध्यमातून अनेकविध उपक्रम हाती घेतले जातात.

 

असे हे मनोज कुलकर्णी साडे सहा हजार स्वाक्षऱ्या जमवूनही आजही तितकेच छंद वेडे आहेत. आजही कोणताही कार्यक्रम असो, ते तातडीने त्या कार्यक्रमाला हजेरी लावतात. लेखकांच्या स्वाक्षऱ्या ते कधीही कागदावर किंवा वहीवर घेत नाहीत, ते स्वाक्षऱ्या फक्त पुस्तकांवरच घेतात. त्यांच्या मते, ती एका लेखकाची पावती असते. लेखकाच्या नावाखालीच त्याची स्वाक्षरी शोभून दिसते. तसे ते क्रिकेटर्सची स्वाक्षरी बॅट किंवा बॉलवरच घेतात. स्वाक्षरी केवळ संग्रहित करायची म्हणून ते कधीही घेत नाहीत. त्यात त्यांना दिग्गजांचा खरेपणाही जपायला आवडतो. कोणतीच पुस्तकं किंवा स्वाक्षऱ्या ते कोणाला देत नाहीत. त्यांच्या मते, त्यांचा संग्रह हा त्यांच्या जीवनाचा एक भाग आहे. स्वाक्षरी हा त्यांच्यासाठी खूप भावनिक विषय आहे. त्यामुळे प्रत्येक स्वाक्षरीला ते अगदी जपून ठेवतात. स्वाक्षऱ्यांबरोबरच दुर्मिळ पुस्तकं, वर्तमानपत्रांचे मास्टहेड जमा करणे यांसारखे अनोखे छंदही त्यांनी जोपासले. आपल्या संग्रहाला ते स्वत:पेक्षाही जास्त जपतात आणि हो मनोज कुलकर्णी एक उत्तम लेखकही आहेतच. तेव्हा, आजच्या सेल्फीवेड्यांच्या जगात स्वाक्षऱ्यांना जीव लावणारा हा अवलिया...

 

- प्रियांका गावडे