कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात १ टीएमसीने वाढ
महा एमटीबी   22-Jul-2018कोयनानगर : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात १ टीएमसीने वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे ६ फुटांपर्यंत उचलण्यात आले असून धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे कोयना नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली आहे. परिणामी अवघ्या दोन दिवसांमध्येच धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये तब्बल १ टीएमसी इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी संतुलित ठेवण्यासाठी आज दुपारी धरणाचे सहा वक्र दरवाजे हे दीड फुटांनी उचलून सहा फुटांवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीमध्ये सुरु झाला आहे.
दरम्यान जिल्ह्यामध्ये होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील इतर धरणांच्या पाणी पातळीमध्ये देखील झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कण्हेर, बलकवडी आणि तारळी या धरणांमधून देखील पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सावध राहण्याचा इशारा स्थानिक प्रशासनाने दिला आहे.