रिक्षाचालकांची मनमानी
महा एमटीबी   21-Jul-2018डोंबिवलीकरांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे रिक्षा. डोंबिवलीत जेवढा मान दुकानदारांना, किरणावाल्यांना मिळतो, त्यापेक्षा कैकपटीने जास्त मान मिळतो तो रिक्षाचालकांना आणि त्याच रिक्षाचालकांच्या मनमानीचा त्रासही तितकाच होतो. डोंबिवलीकरांसाठी वाहतूककोंडीचा प्रश्न सुटतो न् सुटतो तोवर त्यांच्या जीवाला घोर लावलाय तो बेकायदेशीर भाडेवाढीने. पश्चिमेतील उमेशनगर, दोन टाकी, गुप्ते रोड, महात्मा फुले रोड, आनंदनगर भागात शेअर रिक्षाचे भाडे आता ८ रुपयांवरुन १० रु. करण्यात आले आहे. ही अचानकपणे झालेली भाडेवाढ प्रवाशांना वेठीस धरणारी आहे. चाकरमानी आणि रिक्षाचालक यांचे नाते आधीच फार सौख्याचे असताना आता या भाडेवाढीमुळे रोजच प्रवाशांबरोबर त्यांचे खटके उडत आहेत. शेअर रिक्षाचालकांचा तर माजच वेगळा असतो, बेकायदेशीररित्या चार-पाच भाडी घेणं, त्यातच त्यांची दादागिरी यामुळे डोंबिवलीकर चांगलेच वैतागले आहेत. शेअर रिक्षा ही लांब राहणाऱ्या लोकांना परवडणारी असली तरी, २ रुपयांनी झालेली भाडेवाढ त्रासदायक ठरत आहे. सकाळी डोंबिवली लोकल पकडण्याची गडबड, त्यात रिक्षाचालकांशी होणारे रोजचे वाद यामुळे डोंबिवलीकरांनी पायीच प्रवास सुरु केल्याचे चित्र पाहायला मिळते. बेकायदेशीर भाडेवाढ करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करा, असं आरटीओला सांगूनही काही विशेष फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे सध्या 'अडला हरी, गाढवाचे पाय धरी’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रिक्षाचालकांशी हुज्जत घालून आपलाच दिवस खराब करण्यापेक्षा हातावर पैसे टेकवून आपल्या कामाला जाणे चांगलं, अशीही काही मंडळी आहेत. पण, रिक्षाचालकांची ही मनमानी डोंबिवलीकरांचा अंत पाहणारी आहे. केवळ प्रवाशांना विनंती करणारे बोर्ड लावून ही अशी भाडेवाढ करणं चुकीचं तर आहेच, पण आरटीओकडून कारवाईची अपेक्षा ठेवणंही फायद्याचं नाही. पण, या सगळ्यात रखडला जातोय तो सर्वसामान्य मध्यमवर्गीय डोंबिवलीकर. असे वाटते, त्यानेही कधीतरी मनमानी करावी आणि रिक्षाचालकांना जाणीव करून द्यावी की, जशी प्रवाशांना त्यांची गरज आहे, तशी त्यांनाही प्रवाशांची गरज आहेच की. तेव्हा, डोंबिवली असेल किंवा इतर कुठलीही शहरं रिक्षाचालकांच्या या मनमानी कारभाराला वेसण घातल्याशिवाय तरी हा प्रश्न निकालात निघणारा नाही, हे निश्चित...

 

खड्ड्यांनी छळले होते...

 

जिवाला जीव लावणाऱ्या डोंबिवलीकरांच्या जीवावरंच आता बऱ्याच गोष्टी बेतलेल्या दिसतात. जुलै महिन्यातला मुसळधार पाऊस, त्यामुळे होणारी वाहतूककोंडी आणि हो, महत्त्वाचं म्हणजे जागोजागी पडलेले खड्डे. या खड्ड्यांमुळे पाच लोकांचा जीव जातो काय आणि त्यावर पालिका लगेच १३ कोटींची मलमपट्टी करते काय, ऐकावं तेवढं नवलच! पालिकेला जागं करण्यासाठी पाच नागरिकांचा बळी ही किंमत मोजावी लागत असेल तर या खड्ड्यातच आमचा जीव आहे, असं म्हणायला हरकत नाही. १३ कोटी रुपयांचे खड्डे बुजवण्यासाठी ताबडतोब १२ ठेकेदार कामाला लागतात. हेच प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी केले असते, तर निदान रस्ते तरी सुस्थितीत असते. रस्त्यांची दुरवस्था पाहता, या रस्त्यांवरुन सामान्य नागरिकांनी चालावे की उडावे, असा प्रश्न पडावा. तरीही या रस्त्यांवरुन चालण्याची स्टंटबाजीचं जणू डोंबिवलीकर सध्या करताना दिसतात. नागरिकांचे सोडा, पण या खड्ड्यांमुळे पालिकेचे अधिकारीही जखमी झाले आहेत. कल्याण-डोंबिवली परिसरातील वाढते खड्डे या विषयावर आपली राजकीय पोळी भाजण्याची संधी कोणत्याच राजकीय पक्षाने सोडलेले नाही. मग त्यासाठी महासभेत दंगा करणे, आंदोलन छेडणे हे सगळं आलंच. याचा तसुभरही फायदा कल्याण-डोंबिवलीकरांना होत नसून आपला जीव मुठीत धरून ते रोज घराबाहेर पडतात. गेल्या २० वर्षांत पावसाळ्यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते बांधले जातात, पण दोनच महिन्यात परिस्थिती ‘जैसे थे.’ ज्या ठेकेदारांना ही कामे दरवर्षी दिली जातात, त्यांना कोणतेही नगरसेवक, पालिकेचे अधिकारी कडक शब्दांत जाब विचारत नाहीत आणि परिणामी नागरिकांना आपला जीव गमाविण्याची वेळ येते. या प्रशासनाला जागं करण्यासाठी खड्डे बुजवण्यासाठी वरवरची मलमपट्टी करून, पालिका खरंतर या ठेकेदारांचे खिसे भरत आहेत की काय, असा प्रश्न पडतो. आता खिसे भरले असतील तर निदान नागरिकांना चालता येतील असे तरी रस्ते करा, म्हणजे नागरिकांना आपला जीव गमवावा लागणार नाही. खड्ड्यांमुळे एखाद्याचा जीव जाणे ही अतिशय दुर्दैवी बाब. त्यामुळे आता सबंध मुंबईकरांचाच जीव धोक्यात आहे की काय, असे वाटायला लागले आहे. त्यामुळे मलिष्काच्या प्रश्नाला आता उत्तर मिळतंय की, मुंबईला खरंच पालिकेवर भरोसा नाय!

 
- प्रियांका गावडे