प्रयोगवनचा प्रयोगशील ‘सत्तार’
महा एमटीबी   17-Jul-2018

 

 
तरुणाई फेसबुकवर हवा करत असताना हा तरुण मात्र सोशल मीडियावर लोकचळवळ उभा करतोय, गरजूंच्या मदतीला धावून जातोय. आश्चर्य म्हणजे यातील ९० टक्के लोकांना तो ओळखत देखील नाही. मात्र क्षणात तो त्यांच्यापाशी मदत पोहचवतो एवढं मोठं नेटवर्क त्याने फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून उभं केलंय
 

पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, बीड जिल्ह्याच्या सीमेवर आणि बालाघाटच्या डोंगर पायथ्याशी वसलेला जामखेड तालुकाजामखेड तालुका महाराष्ट्रात अनेक कारणाने ओळखला जातो. मात्र आज याच तालुक्यातील हळगाव या छोट्याश्या गावातील हरहुन्नरी आणि प्रयोगशील तरुण जामखेडची ओळख बनतोय. हाडाचा पत्रकार असलेला हा हरहुन्नरी तरुण आणि त्याचं जगणं मोठं रंजकम्हणजे पहा ना आज आपली तरुणाई फेसबुकवर हवा करत असताना हा तरुण मात्र सोशल मीडियावर लोकचळवळ उभा करतोय, गरजूंच्या मदतीला धावून जातोय. आश्चर्य म्हणजे यातील ९९ टक्के लोकांना तो ओळखत देखील नाही. मात्र क्षणात तो त्यांच्यापाशी मदत पोहचवतो एवढं मोठं नेटवर्क त्याने फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून उभं केलंय. एवढंच नाही तर अनेक सामाजिक उपक्रम हा तरुण राबवतोय, या तरुणाचं नाव आहे सत्तार शेख.

 

सत्तार शेख हा अवलिया सोशल मीडियावर सतत ऍक्टिव, त्याचे व्हॉस्अप ग्रुप आणि सोशल खाते आपण चेक केले तर, दिवसभरात किमान १० पोस्ट अशा निघतील की त्यात त्याने मदतीचे आवाहन केले असेल. सुरुवातीला जेव्हा या सोशल मीडियाचं फॅड आलं तेव्हा सोशल मीडिया काय असतो आणि तो कसा वापरायचा हे सुद्धा त्याला माहिती नव्हतं. मात्र आज सोशल मीडियावर वावरणाऱ्यांना सत्तार शेख माहिती नाही असा व्यक्ती क्वचितच सापडेल. एवढं मोठं नेटवर्क त्याने ८ वर्षात उभं केलंय. अर्थात हे सगळं करण्यामागे काहीतरी कारणं असणारच, तर सत्तार हा गेली ११ वर्ष झाली विविध माध्यमामध्ये पत्रकारिता करत आलाय. लहानपणापासून घरी आलेला पेपर वाचूनच त्याला पत्रकारिता करण्याची आवड तयार झाली. सत्तारच लहानपण गरिबीत गेलं, त्यामुळे तो लहानपणापासूनच हळव्या व संवेदनशील प्रवृत्तीचा. समाजातील वंचितांना पाहून त्याच मन तुटायचं, आपण काहीतरी केलं पाहिजे असं नेहमी मनात यायचं पण नेमकं काय करायचं हे सापडत नव्हतं. पत्रकारिता करत असताना तो वंचितांच्या प्रश्नाला वाचा फोडायचा, मात्र त्यातून शाश्वत मार्ग निघत नसल्याने सत्तारला मनोमन वाईट वाटायचं, मग यातूनच तो स्वतःहून त्यांची मदत करायचा. त्यांचा तात्पुरता प्रश्न मार्गी लावायचा. यातूनच हळूहळू त्याचा ओढा सामाजिक कामाकडे वाढत गेला आणि त्याने नव्याने आलेल्या सोशल मीडियाचा फायदा करून घ्यायचं ठरवलं आणि स्वतःच सामाजिक नेटवर्क तयार करायला सुरुवात केली.

 

ऑपरेशनसाठी इतका इतका खर्च आहे. त्यासाठी इच्छुकांनी संबंधितांच्या खात्यावर मदत जमा करा.’, ‘अमूक तमूक ठिकाणी रक्ताची गरज आहे, संपर्क करा, ‘अमूक मुलांसाठी गरम कपडे हवेत, शाळेसाठी वह्या पुस्तके हवीत, सायकली हव्यात.असे एक ना अनेक प्रकारचे वाहन तो फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून करायला लागला. हळूहळू सत्तारला इतर तरुणांची साथ मिळायला लागली. आज घडीला गरजूंच्या मदतीला धावून जाणारे हजारो असले तरी त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी त्याने जवळपास ४० कार्यकर्ते तयार केलेत. अशातच सत्तार हा राहुल साळवी या तरुणाच्या संपर्कात आला आणि दोघांनी मिळून २०१२ साली रक्ताची चळवळ सुरु केली. याच चळवळीतून आज त्यांनी जवळपास १५०० गरजू रुग्णांना रक्ताची गरज पुरवली किंवा त्यांना दाते मिळवून दिले आहेत. एवढंच नाही तर १५ पेक्षा जास्त गरजू रुग्णांना त्यांनी आर्थिक मदत मिळवून दिली. इथूनच खरी त्याच्या समाजसेवेची सुरुवात झाली आणि गरजूंसाठी आपण काय करू शकतो या प्रश्नांचं उत्तर सत्तारला मिळालं.

 

काय करायचं हा प्रश्न सुटल्यानंतर सत्तारने महाराष्ट्रभर सामाजिक प्रकल्पांना भेटी देण्याचं ठरवलं. जवळपास तीन वर्षं तो स्वखर्चानं महाराष्ट्रात भटकला, सामाजिक काम आणि वंचितांचे प्रश्न जाणून घेतले. यातूनच पुढे प्रयोगवन परिवार, संडे स्कुल, शेतकरी सन्मान परिषद, सायकलदान महादान इत्यादी सामाजिक उपक्रमांची सुरुवात झाली. सत्तारने शेतकरी सन्मान परिषदे अंतर्गत हळगाव या आपल्या गावी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पहिली शेतकरी सन्मान परिषद आयोजित केली. यातून पुढे बीज संकलन ही संकल्पना पुढे आली. गेल्या चार वर्षात सत्तार व त्याच्या सोशल मीडियावरील सहकाऱ्यांनी दिड कोटी बिया संकलन करून त्याचं बीजारोपण केलं आहे. यावर्षीही तो ५ लाख बीजारोपण हवेच्या माध्यमातून करणार आहे. सत्तारने गरजू मुलांसाठी सायकल दान मोहिमेची सुरुवात केली. गेल्यावर्षी त्याने २० गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप केली. तर या वर्षी ह्युमन सोसायटी व प्रयोगवन परिवार मिळून सायकल दान महाअभियान राबवलं असून जवळपास १०० गरजू विद्यार्थ्यांना सायकल दान करण्यात येणार आहे.

 

सत्तार स्वतः प्रयोगवन परिवार ही सामाजिक संस्था चालवतो. शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण ही त्याच्या संस्थेच्या कामाची परिक्षेत्रे आहेत. या अंतर्गत त्याने आतापर्यंत २०० गरजू विद्यार्थ्यांना गणवेश, शाळेसाठी आर्थिक मदत, शाळेची दप्तरे, वह्या-पुस्तके आदी मदत केली आहे. या अंतर्गतच चालणारं उल्लेखनीय काम म्हणजे संडे स्कुलही पारधी समाजातील मुलांसाठी चालवत असलेली शाळा. पिढ्यानपिढ्या कधी शाळेचं तोंड पाहिलेलं नसणाऱ्या या जमातीतील मुलांना तो त्यांच्या पाड्यावर जाऊन शिकवतो. अक्षर ओळख एवढंच या शाळेचं महत्व नसून या वंचित समाजातील मुलांनी मुख्य प्रवाहात यावं यासाठी तो अनेक प्रयोग राबवत आहे. म्हणूनच जात, धर्म, पंथ या पलिकडे जाऊन माणूस म्हणून काम करणारा हा निस्वार्थी तरुण खरा माणूसठरतो. 

- विजय डोळे