मत्स्योद्योगाला धोका...
महा एमटीबी   14-Jul-2018


 
समुद्राच्या रचनेतील बदल, पाण्याच्या तापमानातील वाढ, समुद्राच्या पातळीतील वाढ, पर्जन्यमानातील बदल, वादळीवारे यांचा संबंध हवामान बदलाशी आहे. या समस्यांमुळे प्रजातींच्या उत्पादक प्रक्रियेत बदल होत आहे. तसेच समुद्री जिवांना अनेक रोग होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
 

तत्याने बदलणाऱ्या हवामानाचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतोच. त्याशिवाय निसर्गातील प्राणी-पशूपक्षी यांच्यावरही हवामान-तापमान बदलांचे परिणाम जाणवतात. जागतिक तापमान वाढीच्या चटक्यांपासून समुद्रीजीवही सुटलेले नाहीत. यासंबंधी शास्त्रज्ञांच्या एका समुहाने नुकतेच अभ्यासपूर्वक मत नोंदवले आहे.त्यानुसार, ही समस्या कायम राहिल्यास २०५० पर्यंत मत्स्योद्योगात १२ टक्क्यांपर्यंत घट होऊन त्यावर अवलंबून असलेल्या सुमारे ६० दशलक्ष लोकांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होऊ शकतो. हे भाकीत शंभर शास्त्रज्ञांच्या समूहाने वर्तविले असून याबाबतचा विश्लेषण अहवाल जागतिक अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) नुकताच प्रसिद्ध केला. हवामान बदल आणि मत्स्योद्योग याबाबतची जागतिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झालेली माहिती, विश्लेषण, संदर्भ याचा आधार घेत ‘एफएओ’ ने भविष्यातील हवामान बदलाच्या परिणामांबाबतची शक्यता वर्तवली आहे. हवामान बदलाचा गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनावरही परिणाम होत आहे. हवामान, लोकसंख्या आणि पाण्याचा वापर याचा १४९ देशांवर कसा परिणाम होईल आणि आशियातील यांगत्सी, गंगा, मेकाँग, आफ्रिकेतील काँगो, युरोपातील फिनलँड इनलँड लेक्स, दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन नदी खोऱ्यातील भविष्यातील चित्र काय असेल, यावर अहवालात भाष्य करण्यात आले. अंतर्देशीय जलप्रणालीमधील दहा प्रमुख देश दरवर्षी ११.६ दक्षलक्ष टन मत्स्य उत्पादन घेऊन त्याचा मानवी आहारासाठी पुरवठा करतात. मात्र, हवामान बदलामुळे मत्स्योत्पादनाला फटका बसणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.

 

समुद्राच्या रचनेतील बदल, पाण्याच्या तापमानातील वाढ, समुद्राच्या पातळीतील वाढ, पर्जन्यमानातील बदल, वादळीवारे यांचा संबंध हवामान बदलाशी आहे. या समस्यांमुळे प्रजातींच्या उत्पादक प्रक्रियेत बदल होत आहे. तसेच समुद्री जिवांना अनेक रोग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. हवामान बदलाच्या समस्येमुळे महासागर, तलाव, नद्या यांच्या रचनेत कसा बदल होत आहे, यावर नवीन संशोधन करून उपाय शोधण्याची गरज असल्याचे या अहवालामध्ये नमूद करण्यात आली आहे. जागतिक हवामान बदलाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी पॅरिस हवामान करार करण्यात आला. या कराराची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाल्यास हवामान बदलाच्या समस्येती तीव्रता कमी होईल, असेही मत व्यक्त करण्यात आले. गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक लोक मत्स्य उत्पादनाचा व्यवसाय करत आहेत. हा व्यवसाय म्हणजे त्यांच्यासाठी रोजगाराचे एकमेव साधन आहे, परंतु अलीकडच्या काळात बदलेल्या परिस्थितीमुळे मासेमारी करताना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच पावसाळ्यामध्ये सुरक्षिततेचा उपाय म्हणून मासेमारीवर बंदी घातली जात असल्याने त्यांना आर्थिक अडचण सतावत आहे.

 

एका सर्वेक्षणानुसार ५९ टक्के समुद्री पक्ष्यांमध्ये आणि सर्व समुद्री कासवांमध्ये प्लास्टिक आढळून आले आहे. दरवर्षी या प्रमाणात वाढ होत असल्याने समुद्री जीवसृष्टीच्या दृष्टीने ते घातक ठरते आहे. कचऱ्याच्या माध्यमातून विषारी पदार्थ शरीरात गेल्याने कित्येक सील, व्हेल, डॉल्फीन माशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मासेमारीच्या जाळ्यांचे अवशेष किंवा प्लास्टिकमध्ये अडकून अनेक समुद्री पक्षी, मासे, कासव आदींना प्राण गमवावे लागतात. हे टाळण्यासाठी वेळीच उपाययोजना करून समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य कसे जपता येईल, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. याचबरोबर माशांच्या अस्तित्वाला, त्याच्या जीवाला धोका पोहोचणार नाही यासाठी प्रदूषणाची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करणेही गरजेचे आहे.