एकदिवसीय मालिकेत भारताची १-० ने आघाडी
महा एमटीबी   13-Jul-2018

इंग्लंडविरोधातील पहिला एकदिवसीय सामना देखील भारताच्या खिशात

रोहित शर्माचे नाबाद शतक ; इंग्लंडवर ८ गडी राखून विजय
नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारताने आठ गडी राखून जिंकला आहे. भारताचा स्फोटक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्मा याच्या नाबाद १३७ धावांच्या खेळीच्या बळावर इंग्लंड संघाने दिलेले २६८ धावांचे आव्हान भारतीय संघाने लीलया पार केले आहे.

ट्रेन्ट ब्रिज मैदानावर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर मैदानात आलेल्या इंग्लंड संघाने ४९.५ षटकांमध्ये सर्व बाद २६८ धावांची मजल मारली होती. यासाठी इंग्लंडकडून जोस बट्लर (५३), बेन स्टोक (५०), जेसन रॉय (३८), जॉनी बेयरस्टो यांनी ३८ धावा केल्या. तर या बदल्यात भारताकडून एकट्या कुलदीप यादव याने १० षटकांमध्ये २५ धावांच्या बदल्यात तब्बल ६ बळी घेण्याचा विक्रम केला. कुलदीप पाठोपाठ उमेश यादव याने २ तर चहलने १ गडी बाद केला.


यानंतर मैदानात आलेल्या भारतीय संघाने नेहमीप्रमाणे अत्यंत स्फोटकरित्या आपल्या खेळाला सुरुवात केली. भारताकडून सलामीसाठी आलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी संघाला उत्तम सुरुवात करून दिली. परंतु थोड्याच वेळात शिखरला ४० धावांवरच परत फिरावे लागले. यानंतर मैदानात आलेले विराट कोहलीने शर्माच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी तब्बल १६७ धावांची भागीदारी रचली. रोहितने देखील त्या उत्तम साथ देत नाबाद १३७ धावांची खेळी केली व संघाला विजय मिळवून दिला.