एक वेगळी वाट...एक वेगळी दिशा
महा एमटीबी   13-Jul-2018एखाद्या क्षेत्रामध्ये पुरुषाचं वर्चस्व असतानादेखील आपलं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करून जरीना स्क्रूवाला यांनी उत्तम अशी कामगिरी करून दाखवली. त्यांच्याविषयी....

 

एखाद्या नवीन क्षेत्रामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करणं, नाव कमावणं, ही बाब इतकी सोपी नसते. स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या वेगवेगळ्या लोकांच्या मानसिकतेचा प्रचंड त्रास होतो. पण, तरीदेखील त्यावर मात करून त्या नवख्या क्षेत्रामध्ये आपली ओळख निर्माण करण्याचे धाडस करण्याची ताकद काही व्यक्तींमध्ये असते. त्यापैकी एक जरीना स्क्रूवाला. १९९० च्या काळामध्ये तसं म्हणायला गेल्यास अनेक क्षेत्रांमध्ये पुरुषांची मक्तेदारी होती. त्यावेळी महिला प्रगतीच्या उंबरठ्यावर होत्या, परंतु त्यांचं प्रमाण नगण्य होतं. अशाच परिस्थितीमध्ये पुरुषांचं वर्चस्व असलेल्या एका क्षेत्रामध्ये जरीना स्क्रूवाला या पारशी महिलेने एक स्वप्न उराशी बाळगलं आणि त्यांनी रॉनी स्क्रूवाला यांच्यासोबत १९९० मध्ये ‘यूटीव्ही’ची स्थापना केली. दोन दशकानंतर वॉल्ट डिस्ने यांनी ४५० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स मोजून यू टीव्ही खरेदी केले. जरीना या मूळच्या मुंबईच्या. मुंबईच्या एका खासगी शाळेमधून त्यांनी शिक्षण घेतलं. खरंतर या शाळेच्या मुख्याध्यापिका या स्वतंत्र विचारसरणीच्या होत्या. महिलांनी समाजामध्ये वेगळी प्रतिमा तयार केली पाहिजे, असं त्यांना नेहमी वाटायचं. जरीना यांच्या मनात मुख्याध्यापिकांनी रूजवलेले विचार त्यांना नवीन काम करायला प्रेरित करायचे. त्यांच्यानंतरचे त्यांचे दुसरे गुरू म्हणजे पर्ल पदमसी. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकाची प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून जरीना यांचा प्रवास सुरू झाला. ‘मशहूर महल’साठी सहायक दिग्दर्शिका म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली आणि इथूनच त्यांचा प्रवास सुरू झाला. मीडिया आणि टेलिव्हिजन हे क्षेत्र त्यांना खुणावत गेलं.

 

यशस्वी होण्याचा प्रवास सुरू असताना त्यांना अनेक अडथळे आले, पण त्या डगमगल्या नाहीत. कोणत्याही क्षेत्रामध्ये सुरुवातीला अपयश येतं. पण, आपला हेतू साध्य करण्यासाठी त्याला प्रयत्नांची जोड ही हवीच. यूटीव्हीपासून २०११ मध्ये त्या वेगळ्या झाल्या. नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी त्या पूर्णपणे सज्ज होत्या. याचवेळी ‘स्वदेस फाऊंडेशन’चा विचार त्याच्या मनात आला. लोकांना गरिबीतून बाहेर काढणे, हा त्यांचा हेतू होता. त्यांनी संपूर्ण लक्ष ग्रामीण भागावर केंद्रित केले होतं. ग्रामीण भागात राहणाऱ्यांना पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो, ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. शिवाय शिक्षणाचं प्रमाण कमी होतं. या विषयावर त्यांनी भरपूर विचारमंथन केले. सामूहिक एकत्रिकरण, कृषी, शिक्षण तसेच आरोग्य यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करायचं त्यांनी ठरवलं. यासाठी १०८ सदस्यांच्या टीममधले ८० जण कायम तळागाळात असायचे. ग्रामीण सशक्तीकरणावर त्यांनी आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले. लोकांना सशक्त बनविण्याबरोबरच स्वत:साठी पर्याय शोधण्यासाठी मदत करणे, हेच काम असल्याचे जरीना सांगतात. त्या म्हणतात की, “आम्ही यूटीव्हीच्या माध्यमातून देशात एक अत्यंत आधुनिक आणि नाविन्यपूर्ण व्यवसाय उभारला. २००४ मध्ये आम्ही संपूर्णपणे मुलांना वाहिलेली ‘हंगामा’ ही वाहिनी सुरू केली. ‘यूटीव्ही बिंदास’ची गोष्टही अशीच काहीशी आहे.” ‘हंगामा’ नंतर परदेशातही अशा प्रकारच्या वाहिनी सुरू करण्यास आम्ही मदत केली असल्याचे जरीना सांगतात. आयुष्याच्या प्रवासातल्या प्रत्येक टप्प्यावर आलेल्या आव्हानांना सामोरं जाण्याची तयारी केली पाहिजे.

 

जरीना सांगतात की, "एक चांगली व्यावसायिक व्यक्तीच पुढे उद्योजक म्हणून यशस्वी होते. ती ऊर्जा, ते समर्पण आणि टिकून राहण्याची जिद्द याला सर्वाधिक महत्त्व आहे. जेव्हा मी कुणाला नोकरी देते, त्यावेळी मी त्या व्यक्तीची नीट पारख करून घेते. त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, एखादी समस्या निर्माण झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी त्याची कितपत तयारी आहे, हे पाहते. एखाद्या धक्के पचवलेल्या व्यक्तीला मी प्राधान्य देते. महत्त्वाची बाब म्हणजे, ती व्यक्ती सकारात्मक वृत्तीची हवी. काही लोकांकडे उत्तम व्यावसायिक अनुभव असतो. तसंच ते आपल्या कामातही कुशल असतात. पण, शेवटी सकारात्मक वृत्तीमुळे अनेक गोष्टींवर मात करता येते. चांगली टीम बनवणे हाच माझ्या आयुष्याचा उद्देश आहे. मला हवी असलेली गुणवत्ता ज्याच्या अंगी आहे आणि यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी जवळ असलेल्या व्यक्तींच्या शोधात मी नेहमी असते. एका यशस्वी टीमच्या निर्मितीसाठी संवादाची मोठी आवश्यकता असते. हा संवाद कायम राहावा याची खबरदारी घेतली गेली पाहिजे. त्याचबरोबर लोकांशी आदर आणि सन्मान ठेवूनच व्यवहार करायला हवा. यामधूनच चांगल्या टीमची निर्मिती होते.” जरीना सर्वांनाच स्वत:साठी, आपल्या परिवार आणि मित्रांनाही वेळ द्या, बाजूला काढलेला वेळ याच व्यक्तींसोबत गेला पाहिजे याची काळजी घ्या. त्याचबरोबर तुमचा व्यक्तिगत वेळ स्वत:वर खर्च करणेही अत्यंत आवश्यक आहे. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही कितीही कष्ट करा, पण या गोष्टींची अंमलबजावणी केली तरच यशस्वी होऊ शकाल.”