साधू वासवानी मिशनचे प्रमुख दादा वासवानी यांचे निधन
महा एमटीबी   12-Jul-2018
पुणे : साधू वासवानी मिशनचे प्रमुख जे.पी.वासवानी अर्थात दादा वासवानी यांचे आज वृद्धापकाळाने पुणे येथे निधन झाले आहे. ते ९९ वर्षांचे होते. साधू वासवानी मिशनकडून आज सकळी याविषयी माहिती देण्यात आली आहे. आज सकाळी ९ वाजून १ मिनिटांनी दादा वासवानी यांनी अखेर श्वास घेत जगाला अखेरचा निरोप दिला आहे.

अध्यात्म, शाकाहारी जीवन, पशु अधिकार आणि समाजसेवा या विषयी त्यांनी अनेक वर्ष काम केले असून देशात आणि विदेशात त्यांचा मोठा शिष्यवर्ग देखील आहे. त्यामुळे त्यांच्या अशाप्रकारे जाण्याने त्यांच्या शिष्य वर्गातून हळहळ व्यक्त केली जात आहे. शेवटच्या वेळी देखील त्यांनी आपल्या शिष्यांना अखेर मार्गदर्शन करताना, 'सर्वांवर प्रेम करा' असा संदेश दिला.दादा वासवानी यांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये जवळपास १५० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. तसेच साधू वासवानी मिशनचे काम देशासह विदेशात देखील पोहोचवले आहे. त्यांचे गुरु साधू वासवानी यांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी जीवनभर समाजसेवेचे काम केले आहे. दरम्यान येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये २ तारखेला ते आपल्या जीवनाचे शंभर वर्ष पूर्ण करणार होते, परंतु त्या अगोदरच त्यांनी या जगाला निरोप दिला आहे.