'नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहिजे'
महा एमटीबी   12-Jul-2018

नाणारवरून विरोधक आक्रमक, स्थगन प्रस्तावावर तत्काळ चर्चेची मागणी   

नागपूर : पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधकांनी नाणार प्रकल्पावरून जोरदार गदारोळ घातला आहे. विधीमंडळाबाहेरच नाणार प्रकल्प रद्द व्हावा, यासाठी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाने जोरदार आंदोलन केले असून आज सभागृहामध्ये नाणार प्रकल्पाचाच मुद्दा गाजणार हे विरोधकांच्या भुमिकेवरून आज स्पष्ट झाले आहे.


सभागृहाच्या कामकाजाच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या आमदारांनी सरकारविरोधात विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यामध्ये हातामध्ये वेगवेगळे फलक घेऊन सरकारच्या धोरणांवर टीका केली. यामध्ये नाणार प्रकल्पामध्ये सध्या मांडवली सुरु असून सरकारमधील अनेकांना यामध्ये दलाली मिळत असल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला. तसेच जनतेची फसवणूक करून नाणार प्रकल्प जनतेचा गळ्यात टाकण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे, परंतु सरकारच्या या प्रयत्नांना कधीही यश येऊ देणार नसल्याचे म्हणत हा प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे.
याचबरोबर सरकारने शेतकऱ्यांची देखील फसवणूक केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. शेतकऱ्यांना पिक विम्याच्या रक्कम आणि कर्जमाफीची रक्कम अजून देखील मिळालेली नाही. त्यामुळे सरकारने यावर लवकरात लवकर भूमिका घेत शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी देखील विरोधकांनी केली आहे.