इच्छुकांची लगबग, कार्यकर्त्यांची झुंबड
महा एमटीबी   12-Jul-2018
 
 
जळगाव :
महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन-पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (दि.११) इच्छूक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग चालली होती, तर यावेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या अनेक उत्साही कार्यकर्त्यांची महापालिकेबाहेर झुंबड उडाली होती.
 
 
निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेची युती होणार की, नाही याविषयी स्थानिक नेते, पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम असल्याने अनेकांचे अर्ज मंगळवारपर्यंत दाखल होऊ शकले नव्हते. भाजपासहीत शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यापैकी एकाही पक्षाला आपल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करता आली नव्हती. त्यामुळे इच्छुकांनी मंगळवारचा दिवस प्रतीक्षा करण्यात घालविला. बुधवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. अर्ज ऑनलाईन भरून त्याची प्रिंटआऊट महापालिकेत सादर करायची होती. त्यासाठी सर्वच पक्षांच्या इच्छुकांची लगबग चालली होती. यात आजी-माजी नगरसेवक व त्यांच्या परिवावारातील सदस्यांचाही समावेश होता. अपक्ष उमेदवार मोठ्या संख्येने होते.
 
महापौरांचे समर्थक शिवसेनेत
अर्ज भरण्यासाठी शिवसेनेचे नितीन लढ्ढा, शरद तायडे, विष्णू भंगाळे हे दुपारी १२.१० वाजता आले होते. भाजपाचे विद्यमान नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक सेनेचे गजानन मालपुरे यांच्यासोबत येवून शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मनसेचे बंटी जोशी हे माजी महापौर ललित कोल्हे यांचे कट्टर समर्थक होते. त्यांनी शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज भरला. भगत बालाणी, शिवचरण ढंढोरे आणि माजी महापौर ललित कोल्हे यांनी दुपारी १.४५ वाजता भाजपाकडून अर्ज दाखल केला. आम्ही ५० जागा जिंकू, असा विश्‍वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
  
पृथ्वीराज सोनवणे यांचा भाजपाला ‘रामराम’
भाजपाचे नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने बुधवारी पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा बुधवारी, महानगर जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे यांच्याकडे सादर केला. गेल्या २५ वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. मावळत्या टर्ममध्ये भाजपाकडून नगरसेवकपदही भूषविले. सभागृहात चांगली कामगिरी करून दाखविली तरीही तिकीट न मिळाल्याची नाराजी त्यांनी राजीनामापत्रात व्यक्त केली. नगरसेवकपदाचा राजीनामा त्यांनी महापालिका आयुक्तांकडे सादर केला.
प्रत्येकाचे व्हिडिओ शूटिंग
ये-जा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था होती. महापालिकेचे विशेष पथक प्रत्येकाचे व्हिडिओ शूटिंग करत होते. नागरिकांना मनपात प्रवेश दुपारी ४ वाजेपर्यंत बंद होता. दाखल होणार्‍या अर्जांची संख्या मोठी असल्याने यंत्रणेवरही ताण आला होता.
 
आयुक्तांकडून पोलिसांचे कौतुक
पोलिसांच्या दक्षतेमुळे शेवटचा दिवस सुरळीत पार पडल्याची भावना महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
अतिचौकशीचा त्रास
पोलिसांकडून होणार्‍या ‘अति चौकशी’चा मात्र, अनेकांना जाच झाला. बॅरिगेट्सच्या आत होमगार्ड व पोलीस तैनात होते. तेथूनच चौकशीचे सत्र सुरू व्हायचे. दोन अथवा चारच्या ग्रुपने कुणी येताना दिसल्यास कुठे चालला? काय काम आहे? अशा प्रश्‍नांची सरबत्ती पोलीस व होमगार्डकडून व्हायची. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कार्यकर्ते व उमेदवारांची पुन्हा चौकशी केली जात होती. नवखा उमेदवार असल्यास त्याला आपण अर्ज दाखल करण्यासाठी आलो असल्याचे पटवून द्यावे लागत होते. दिग्गजांना मात्र, लागलीच प्रवेश मिळत होता. प्रवेशद्वाराशी पोलीस कर्मचार्‍याने एकदा चौकशी केल्यावर लागलीच त्याच्या मागे उभा असलेला दुसरा कर्मचारीही पुन्हा तीच चौकशी करत होता. यामुळे काहींचे पोलिसांशी वादही झाले. पोलिसांचा नाहक जाच असल्याची भावना कार्यकर्त्यांमधून उमटली.
नेहरू चौक ते भगवती स्वीटपर्यंतचा रस्ता बंद
शेवटच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन नेहरू चौक ते भगवती स्वीटपर्यंतचा रस्ता बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आला होता. त्यामुळे केवळ एका बाजूनेच वाहतूक सुरू होती. संरक्षित भागात होमगार्ड व पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात होता.
 
प्रत्येक टप्प्यावर इत्यंभूत चौकशी
अर्ज दाखल करण्यासाठी येणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते यांना महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच अडविले जात होते. येथे पोलिसांकडून प्रत्येक व्यक्तीची चौकशी जात होती. त्यांच्याकडे असलेल्या पिशव्या उघडून बारकाईने तपासल्या जात होत्या. कार्यकर्त्यांना महापालिका प्रांगणात प्रवेश दिला जात नव्हता. केवळ सूचक व अनुमोदक यांनाच आत येऊ दिले जात होते.