राज्यातील २ हजार १०० पुलांचे ऑडिट - राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील
महा एमटीबी   12-Jul-2018
 
 
 

नागपूर : राज्यात गेल्या वर्षी २  हजार १०० पुलांचे ऑडिट करण्यात आले असून ज्या भागात धोकादायक पूल आहेत, तेथे तात्काळ नवीन पुलाची बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
 
सदस्य राजाभाऊ वाजे यांनी अस्वली स्टेशन, तालुका इगतपुरी येथील ब्रिटिशकालीन पुलाची पुनर्बांधणी करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री म्हणाले, या पुलाची उंची जास्त असल्याने कंपने जाणवत आहेत. या पुलाचे ऑडिट झाले असून पुलाच्या रुंदीकरणाच्या कामास मार्च २०१८ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याला तांत्रिक मंजुरी देणे बाकी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
 
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य श्रीमती सीमा हिरे, निर्मला गावित, सर्वश्री वैभव नाईक, दीपक चव्हाण, इम्तियाज जलिल यांनी सहभाग घेतला.