एकटाच लढतोय...
महा एमटीबी   12-Jul-2018‘एकटाच लढतोय...’ असे म्हणणारे नाशिकचे ७४ वर्षीय ‘अँग्री ओल्ड मॅन’ रमेश विश्वनाथ जुन्नरे... का आणि कशाविरोधात आहे त्यांचा लढा, ते जाणून घेऊया...

 

आपल्याकडे वर्षानुवर्षे सातत्याने विधायक काम करीत असलेल्या चांगल्या संस्थांची मोठी परंपरा आहे. सार्वजनिक क्षेत्रात सांस्कृतिक, साहित्यिक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था कार्यरत असतात. या संस्थांमधून कामकाज कसे चालते, याचे अनेक नमुने आणि बरी-वाईट उदाहरणे पाहायला मिळतील. नाशिकमध्ये देखील अशा संस्था आहेत. मात्र, या संस्थांतून चालणाऱ्या कामाबाबत हल्ली प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते.

 

सांस्कृतिक संस्था किंवा पतसंस्था, सहकारी संस्था, वाचनालये यांतून काम करणारे पदाधिकारी नेमके कोणत्या उद्देशाने काम करतात? याबाबत विचार करण्याची गरज आहे. खरोखर नि:स्वार्थपणे काम हे लोक करतात का, असा सवाल विचारला जातो. मात्र, हा प्रश्न उपस्थित करणारे लोक कमी आहेत. त्यामुळे अनेकदा त्यांना एकटेपणाने हा लढा द्यावा लागतो असे दिसते. मात्र, अशा ‘एकटाच लढतोय’ असे म्हणणारे नाशिकचे ७४ वर्षीय ‘अँग्री ओल्ड मॅन’ रमेश विश्वनाथ जुन्नरे यांच्या कार्याची ओळख करून घेतली, तर त्यांच्याबाबत अधिक कुतूहल निर्माण करणारी माहिती हाती येऊ लागली. कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नसताना ते लढा देत आहेत. शिवाय, असा कायदेशीर लढा देणे हे कठीण आणि परीक्षा पाहणारे काम असते. त्यात अनेक अडचणी असतात. मात्र, त्याची पर्वा न करता जुन्नरे यांचे कार्य सुरु आहे हे विशेष.

 

आपल्या डोळ्यांसमोर सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या व्यक्तींची म्हणजे लो. टिळक, आगरकर आदींची नावे समोर येतात. तसेच लोकहितवादी देशमुख, न्या. रानडे, सार्वजनिक काका आदी नावे आठवतात. मात्र, त्यांचे आजच्या काळातले प्रतिनिधी म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील काम करणारे लोक काय करीत आहेत, हे पाहिले, तर आपण कुणाच्या हाती ही जबाबदारी सोपविली आहे आणि त्यामुळे समाजाचे काय भले होणार आहे? अशा निरुत्तरीत प्रश्नांचे विक्राळ स्वरूप दिसू लागते. त्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. मात्र, नाशिकमध्ये असे काम करण्यासाठी रमेश जुन्नरे पुढे आले असून, गेल्या अनेक वर्षांपासून ते एकतर्फी लढा देत आहेत.

 

रमेश जुन्नरे यांचे पदवीपर्यंत शिक्षण झालेले आहे. त्यांनी एच.ए.एल.मध्ये स्टोअर कीपरची नोकरी केली. नोकरी करत असताना त्यांनी सांस्कृतिक काम सुरू केले. पावणे दोनशे वर्षांची दीर्घ परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालयात त्यांनी १९६८ पासून कार्य सुरु केले. २०१७ पर्यंत ते वाचनालयाच्या कार्यकारिणीवर होते. वाचनालयांना अनेकांनी अत्यंत नि:स्वार्थ भावनेने मोठ्या देणग्या दिलेल्या आहेत. देणग्या दिलेली माणसेदेखील खूप पैसेवाली नव्हती. मात्र, या पैशांच्या विनियोगाचा विचार जेव्हा होतो, तेव्हा कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्याचा नीट वापर केला पाहिजे, अशी जुन्नरे यांची भावना आहे. जुन्नरे यांनी महात्मा गांधींजी आले होते , अशा वसंत व्याख्यानमालेतदेखील वर्षानुवर्षे काम केले आहे. सार्वजनिक क्षेत्रात कामाची आवड असल्याने त्यांनी नेहमी आपली नोकरी करताना अधिक वेळ काम करणे टाळले. आपल्याला पैशांचा मोह नाही. वाचनालय आणि व्याख्यानमाला या ठिकाणी अनेक दिग्गज मंडळींचा सहवास मिळाला. त्यातून खूप काही शिकायला मिळाले. चांगले संस्कार मिळाले अशी त्यांची भावना आहे. त्यातून त्यांच्या कुटुंबाने चांगली प्रगती केली. मुलगा बी.ई. होऊन पुण्यात अभियंता आहे, तर मुलगी आणि सून डॉक्टर आहेत. दुसरी मुलगीदेखील सुस्थितीत आहे.

 

सामाजिक काम करताना २००६ मध्ये अशा घटना घडल्या की, त्यामुळे जुन्नरे व्यथित झाले. सार्वजनिक वाचनालयाच्या पैशांचा दुरुपयोग होत आहे, असे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी त्या विरोधात आवाज उठविण्यास सुरुवात केली. अत्यंत गंभीर गैरव्यवहार त्यांनी उघडकीस आणून संचालक मंडळ आणि पदाधिकारी यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. त्यासाठी त्यांनी पदरमोड केली. धर्मदाय आयुक्त आणि न्यायालय तसेच शासकीय अधिकारी यांच्याकडे अर्ज-विनंत्या केल्या. विविध कार्यालयांचे उंबरठे झिजवले. त्यानंतर त्यांचे लक्ष ‘वसंत व्याख्यानमाले’कडे गेले. तिथेदेखील त्यांनी २०१२ पासून आपली मोहीम सुरु केली. एखाद्या संस्थेत किंवा सरकारी कामात, कंत्राट घेतल्यावर सर्वजण लाभार्थी होतात. त्यामुळे व्यवहार स्वच्छ ठेवणे कोणालाही नको असते. त्यामुळे असा लढा जेव्हा एखादा माणूस देतो, तेव्हा अन्य लोक बोटचेपीची भूमिका घेतात. हा अनुभव जुन्नरे यांना देखील आला. अनेकांनी त्यांना विरोध केला. अनेकांनी त्यांना आमिषे दाखविली, तडजोड करा, असे सुचविले. मात्र, “आपले चारित्र्य शुद्ध असून सर्व ठिकाणी आपण काहीही करू शकत नाही. मात्र, वाचनालय हे सरस्वतीचे मंदिर आहे. येथे गैरव्यवहार चालू देणार नाही,“ असे सांगून त्यांनी लढा सुरूच ठेवला आहे. ‘वसंत व्याख्यानमाले’त देखील त्यांनी हा लढा सुरु ठेवला असून सरकारदरबारी ‘लाल फितीचा’ सामना देखील त्यांना करावा लागत आहे. मात्र, आपली जिद्द सोडण्यास ते तयार नाहीत.

 

हा कायदेशीर लढा देताना त्यांच्याकडे कागदपत्रांचा साठा जमा झालेला आहे. त्यांची पाहणी केली असता, सार्वजनिक संस्थांतून देखील किती माया जमा करता येईल, याचा अंदाज येऊ शकतो. असे गैरव्यवहार होऊ शकतात, असे प्रथमदर्शनी दिसून येते. स्वत:चे पैसे खर्च करून, मनस्ताप सहन करून त्यांनी सुरु केलेला लढा निर्णायक स्वरूप केव्हा घेणार? हा एक प्रश्नच आहे. मात्र, नेटाने ते त्यासाठी कार्यरत आहेत, हे नक्की.

 
 - पद्माकर देशपांडे