अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसला अपघात
महा एमटीबी   12-Jul-2018

१३ जण जखमी ; मदतकार्य सुरु 
उधमपूर : अमरनाथ यात्रेतील भाविकांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला आज सकाळी उधमपूर येथे अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकूण १३ भाविक जखमी झाले असून जखमी नागरिकांना उपचारासाठी म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान उधमपूरचे खासदार असलेले केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विषयी तत्काळ माहिती घेत रुग्णांच्या योग्य उपचाराचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.

उधमपूरजवळील बिरमा पुलाजवळ ही दुर्घटना घडली आहे. आज सकाळी बिरमा पुलाजवळ एक मालवाहतूक करणार ट्रक उभा होता. त्यावेळी अमरनाथ भाविकांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसने अत्यंत वेगाने येत, याठिकाणी उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये बसमध्ये असलेले तेरा भाविक जखमी झाले. बस चालकाने मात्र याठिकाणाहून तत्काळ पळ काढला. यानंतर स्थानिक पोलिसांना याविषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान बस चालकाच्या हलगर्जीपणामुळेचा हा अपघात झाला असल्याचे प्राथमिक तपासामधून समोर आले आहे. बसमधील प्रवाशांनी देखील याला दुजोरा देत बस चालकामुळेच हा अपघात झाला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या फरार बस चालकाचा सध्या शोध घेतला जात आहे.गेल्या महिन्याच्या २८ तारखेला सुरु झालेल्या अमरनाथ यात्रेला आज चौदा दिवस पूर्ण झाले आहेत. या चौदा दिवसांमध्ये आतापर्यंत जवळजवळ ९ हजार भाविकांनी आतापर्यंत अमरनाथचे दर्शन घेतले आहे.