हिंदू दहशतवादानंतर आता 'हिंदू पाकिस्तान' ; कॉंग्रेसचा नवा शोध
महा एमटीबी   12-Jul-2018तिरुवनंतपुरम :
'आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा जर विजय झाला, तर भारत हा 'हिंदू पाकिस्तान' होईल' असे वादग्रस्त विधान माजी परराष्ट्र मंत्री तसेच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी केले आहे. तिरुवनंतपुरम येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

'२०१९ मध्ये जर केंद्रामध्ये भाजपची सत्ता आली, तर ते भारतीय संविधान नष्ट करून त्याऐवजी आपल्या विचारांवर आधारित नवीन संविधान तयार करतील. जे संविधान हिंदू राष्ट्र या संकल्पनेवर आधारित असेल. त्यानंतर या देशामध्ये अल्पसंख्यांकांना कसल्याही प्रकारचे अधिकार आणि हक्क मिळणार नाहीत. भाजपच्या या कृतीमुळे भारताचा 'हिंदू पाकिस्तान' होईल,' वक्तव्य त्यांनी यावेळी केले. तसेच महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद यांच्यासारख्या स्वातंत्र्यवीरांना अशा भारताची कधीही कल्पना केली नव्हती. त्यामुळे आपण सर्वांनी हे रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन देखील थरूर यांनी यावेळी केले.

दरम्यान थरूर यांच्या या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्षाने देखील थरूर यांना त्यांच्याचे भाषेत उत्तर दिले आहे. कॉंग्रेस हा आपल्या राजकीय स्वार्थासाठी म्हणून दररोज अशी नवीन नाटके करत असून हिंदू समाजाला बदमान करण्याचा एकही प्रयत्न कॉंग्रेस पक्ष सोडत नाही. हिंदू समाजाला बदमान करण्यासाठी म्हणून अगोदर 'हिंदू दहशतवादा'चे बुजगावणे उभारण्यात आले. परंतु ते फोल ठरल्यानंतर आता 'हिंदू पाकिस्तान'चे आणखी एक सोंग उभे केले जात आहे, असे भाजपने म्हटले आहे.