‘नामधारी बाई...कामधारी माणूस’
महा एमटीबी   12-Jul-2018
 
 
 
श्यामराव, या बाई कोण हो? तुमच्याच गावच्या ना?
हावं. ह्या आमच्या गावच्या अग्गोबाई! पालिका सदश्या बरं का. गेल्यायेळी निवडून आलत्या. म्या केलतं मतदान त्यायले. आमच्या घरी आलत्या. मत देजा सांगायले. त्या गेल्या अन् त्यायचा नवरा आला खाऊ घेऊनसन. खाऊ? माहित हाय ना खाऊ तुम्हाले? आरं बाबा मतदानाच्या आधी नाही तं, आदल्या राती मिळतो त्यो खाऊ. काय परेम म्हणावं माणसाचं आपल्या बायकुवर. ती निवडून याया पायजे म्हणुन किती मरत व्हता त्यो. खरंच नवरा बायकुचं परेम असाव ते आसं.
 
असं व्हय. निवडून आल्या होत्या का मग?
हा मंग. आलत्या की निवडून. लय मोठी मिरोणूक काडली व्हती बगा. तिच्या नवर्‍याले गाडीवरुन फिरवलं व्हतं भाऊ पुर्‍या गावात.
 
नवर्‍याला? का बरं हो श्यामराव?
हा. आता समदं जे काय कराचं ते नवर्‍यानच केलतं न्हवं. लोकाले भेटणं. खाऊ देणं. मत मागणं. समदं समदं केलतं त्यानं. बाई फकस्त कॉलनीतच फिरली व्हती मिरोणुकीत.
 
असं का. मंग लोकांच्या समस्या, कामं बाईनं केली की ती पण नवर्‍यानंच?
आता काय सांगाव भाऊ तुम्हाले. आवं हे तं समदीकडी असंच हाय न्हवं. बायका फकस्त नावाले उभ्या राहत्या निवडणुकीमधी. पण काम समदी माणसालेच करणं पडत्या. बाई कसं काय जाईन हो लोकामधी. लोक पर्तिनीधी हाये म्हणून काय झालं. त्यात माणसाले बी आपल्या बाईवर तवढा ईस्वास पायजे. म्हणून तं समद्या बैठकाले, कार्यक्रमाले, उदघाटनाले समदीकडं माणूसच राहतो. बाई फकस्त नामधारी हाय. फकस्त सही करापुरती.
 
श्यामराव,पण त्या बाईला एवढं असुरक्षित का वाटावं. लोक चांगली नाहीत काय?
नाही हो आप्पा. असुरक्षित असं काय नाय. लोक चांगली हाय बगा. पण बाईले बाहेर पाठवाले माणूसच धजत नसन. बाईले आजुक बी पुरं स्वातंत्र्य मिळालं नाई बगा. ते उगीच ५० टक्के आरक्षण हाय म्हणून पक्ष्यावाल्यांले बाईमाणूस उभं कराया लागतंय. न्हाई तं बाईले कश्याले उमेदवार म्हुन उभं केलं असतं हो कोणं.
 
खरं आहे श्यामराव तुमचं. ही परिस्थिती काही तुमच्याच गावात नाही बरं का. आमच्या गावालासुद्धा असंच चालतंय. बाईचं काम फक्त सही करायचं. बाकी समदं माणूसच करतोय. याचा अर्थ बाई अडाणी हाय असं नाही बर का. पण माणूस काही अजून मानसिक परिपक्व झाला नाही. कोणाला निवेदन देणं असो नाहीतं लोकांच्या अडचणी जाणून घेणं असो. सगळ्या ठिकाणी बाईचा पतीच असतो. बर्‍याच लोकांना तर हे पण माहित नसतं की आपला नगरसेवक हा माणूस आहे की याची बायको. कारण बाहेर त्या माणसालाच सगळा मान सम्मान मिळतो. जसं काही तोच नगरसेवक. बाईच्या नावाखाली माणूसच सगळीकडं दिसतो. सगळे निर्णयही तोच घेतो. कोणत्या पक्षात जायचं? कोणता सोडायचा? सगळंच. बाई काय माणसाच्या हातातली कठपुतळी आहे काय? हवं तसं वागवायला. तिला ना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य, ना लोकांचं दु:ख यातना जाणून घेण्याचं. ग्रामपंचायतपासून पालिकेपर्यंत हीच परिस्थिती. ज्या कारणासाठी बाईला आरक्षण दिलं ते सपशेल फोल ठरलंय एवढं नक्की. ‘बाई नामधारी’ अन् ‘माणूस कामधारी’ अशीच परिस्थिती झालीय बघा सगळीकडे. कधी बदलीन तं बदलो.
- कल्पेश गजानन जोशी