कम्युनिस्ट पक्षही अखेर रामाच्या चरणाशी !
महा एमटीबी   11-Jul-2018


 

थिरूवनंतपुरम : धर्म ही अफूची गोळी मानणाऱ्या मार्क्सच्या विचारधारेनुसार चालणारा, आणि त्यातही विशेषतः हिंदू धर्मावर जरा अधिकच राग असणारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षदेखील अखेर प्रभू रामचंद्रांना शरण आला आहे. कम्युनिस्टांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या केरळमध्ये सर्वच्या सर्व १४ जिल्ह्यांमध्ये माकपने चक्क ‘रामायण महिन्या’चे आयोजन केले असून यामाध्यमातून काही संस्कृत तज्ज्ञ रामायणावर गावोगावी व्याख्याने देणार आहेत व रामनामाचे पठणही करणार आहेत. केरळमध्ये सध्या माकपप्रणीत डाव्या आघाडीचीच सत्ता आहे.
 

केरळच्या पारंपारिक मल्याळी वर्षानुसार दि. १७ जुलै ते १६ ऑगस्ट दरम्यान ‘कारकीडकम’ हा महिना असतो. या महिन्याला ‘रामायणा मासम्’ असे म्हणण्यात आले आहे. या महिन्यात केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर रामायण ग्रंथाचे पठण केले जाते. या काळात रामायणाचे पठण केल्यास गरिबी दूर होते, सुदृढ आरोग्य प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. मल्याळी जनतेच्या मनातील हाच श्रद्धाभाव लक्षात घेत एरवी हिंदुविरोधी भूमिका घेणाऱ्या कम्युनिस्टांनी चक्क रामायण पठणाचे कार्यक्रम पक्षातर्फे आयोजित केले आहेत. केरळमधील काही स्थानिक तसेच इंग्रजी वृत्तपत्रांनी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्तांनुसार, संस्कृत संगम या संस्थेचे अभ्यासक माकपच्या सदर उपक्रमाद्वारे राज्यभर व्याख्यानेही देणार आहेत.

 

गेल्या काही वर्षांपासून केरळसारख्या राज्यातही राष्ट्रीय राजकारणाचे वारे पोहोचले असून भारतीय जनता पक्षाला येथे वाढता पाठींबा मिळत आहे. त्यातच, कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप व संघ परिवारातील अनेक कार्यकर्त्यांच्या निर्घृण हत्या केल्याने कम्युनिस्ट पक्षांची आधीच हिंदुविरोधी असलेली प्रतिमा आणखी ठळक झाली होती. यामुळे राज्यातील बहुसंख्य हिंदू समाजाला अशाप्रकारे दुखावून चालणार नाही, अन्यथा आगामी निवडणुकीत याचे गंभीर परिणाम होतील, हे लक्षात आल्यानेच बहुधा कम्युनिस्ट पक्षाने रामायण कार्यक्रम घेऊन ‘सॉफ्ट हिंदुत्वा’चा राग आळवण्याचे ठरवले आहे. म्हणूनच माकपने २०१७ साली संस्कृत संगम या संस्थेची स्थापना केली तसेच, गोकुळाष्टमीही साजरी केली होती. देशभरात कम्युनिस्ट जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर असून प. बंगाल, त्रिपुरा आदी त्यांच्या बालेकिल्ल्यांतूनही त्यांना आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. त्यामुळे आता केरळसारख्या शेवटचे आशास्थान असलेल्या राज्यात आपले अस्तित्व टिकवण्याची धडपड माकप सध्या करत असून, त्यासाठीच आता हा पक्ष रामाच्या चरणाशी लीन झालेला दिसत आहे.