थायलंडमधील गुहेत अडकलेल्या मुलांची अखेर सुटका
महा एमटीबी   11-Jul-2018
बँकॉक : थायलंडमधील थाम लुआंग या गुहेमध्ये तब्बल दोन आठवडे अडकून पडलेल्या त्या १२ मुलांची अखेर आज सुटका झाली आहे. तब्बल सहा दिवसांची शोध मोहिमे आणि बचाव कार्यानंतर या सर्व मुलांना वाचवण्यात यश आले असून मुलांसह त्यांच्या प्रशिक्षकाला देखील सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान या सर्वाना आरोग्य तपासणीसाठी म्हणून जवळील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी या मुलांच्या सुटकेनिमित्त थायलंड सरकारचे अभिनंदन केले आहे. तसेच मुलांच्या आरोग्यासाठी प्रार्थना देखील केली आहे. मुलांना वाचवण्यासाठी भारत सरकारने देखील थायलंडला मदत केली होती. यामदतीसाठी थायलंडने देखील भारताचे आभार मानले आहेत.


गेल्या दोन आठवड्यांपूर्वी फुटबॉल सामना खेळल्यानंतर ही सर्व मुले फिरण्यासाठी म्हणून या गुहेमध्ये आले होते. यावेळी त्यांच्यासह त्यांचे प्रशिक्षक देखील याठिकाणी आले होते. परंतु अचानक मुसळधार पाऊस सुरु झाल्यामुळे हे सर्व जण गुहेमध्ये अडकून पडले. यानंतर मुसळधार पावसामुळे गुहेच्या तोंडात मोठ्या प्रमाणे पाणी शिरल्यामुळे गुहेचे तोंड हे पूर्णपणे बंद झाले. यानंतर मुलांच्या पालकांनी मुले बेपत्ता असल्याची पोलिसांमध्ये तक्रार केली. या तक्रारीनंतर राबवण्यात आलेल्या शोधमोहिमेत ही सर्व मुले या गुहेमध्ये अडकल्याचे समोर आले.यानंतर तब्बल देशांच्या मदतीने या मुलांच्या सुटकेसाठी खास मोहीम राबवण्यात आली होती. तब्बल दोन दिवसांच्या शोधानंतर मुलानाचा शोध लागला व त्यानंतर मुलांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. यामध्ये थायलंडच्या नौदलाच्या एका जवानाचा देखील मृत्यू झाला होता. परंतु अखेर सर्वांच्या प्रयत्नांना यश आले असून या सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.