व्हेनेझुएला अस्ताच्या मार्गावर
महा एमटीबी   11-Jul-2018 


अमेरिका व त्याचे इतर युरोपियन राष्ट्र यांची व्हेनेझुएलामधील तेल खाणीत असणारी प्रचंड गुंतवणूक शाबूत राखणे हा प्रमुख उद्देश आहे. मात्र, द. अमेरिकेच्या आजवरच्या इतिहासावर नजर टाकली तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, जेव्हा कधी अमेरिकेने हस्तक्षेप केला आहे, तेव्हा तेव्हा परिस्थिती सुधारण्याची शक्यता अधिकच मावळली. यामुळे व्हेनेझुएला अस्ताच्या मार्गावर तर नाही ना, हा प्रश्न समोर उभा ठाकला आहे.

 

व्हेनेझुएला आजमितीस प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अर्थात ‘आयएमएफने केलेल्या निरीक्षणानुसार, व्हेनेझुएलामधील महागाई २०१९ साल सुरू होईपर्यंत तब्बल १३ हजार टक्क्यांनी वाढणार आहे, तर नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांनी तेथे राजकीय स्थैर्य प्रस्थापित करण्याकामी प्रसंगी लष्कराची मदत घ्यावी लागेल, असे सूचक वक्तव्य केले. व्हेनेझुएलाच्या कोसळत चाललेल्या अर्थव्यवस्थेला मागील तीन महिन्यांतील घडामोडींनी जरा जास्तच घरघर लावली. २०१३ मध्ये ’युनायटेड सोशालिस्ट पार्टी ऑफ व्हेनेझुएला या राजकीय पक्षावर आपले नियंत्रण मिळवून ह्युगो शावेझ यांचे पट्टशिष्य आणि उत्तराधिकारी निकोलास मादुरो हे देशाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. मात्र, आजमितीस व्हेनेझुएलाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात ते अपयशी ठरले आहेत. बॉलिव्हार फ्युयेर्ते या व्हेनेझुएलातील चलनाचा अधिकृत विनिमयदर ८० हजार बॉलिव्हार = १ युएस डॉलर असा असला तरी काळ्या बाजारात हाच दर २० लाख बॉलिव्हार = १ युएस इतक्या उच्च पातळीवर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे जवळपास सर्वच व्हेनेझुएलावासीयांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यात अन्नधान्याचा तुटवडादेखील जाणवत आहे. देशातील दारिद्य्ररेषेखालील नागरिकांची संख्या आजमितीस ९० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. प्रचंड चलन फुगवट्यापुढे नागरिकांचे वेतन हे कवडीमोल ठरत आहे. अगदी उदाहरण द्यायचे झाल्यास अर्धा किलो मटण घेण्यासाठी तेथील नागरिकांना अडीच (२.५) युएस डॉलर इतके मूल्य अदा करावे लागते. त्यातच गेल्या वर्षभरात स्थलांतरितांचा प्रश्न पुढे आला आहे आणि त्यांच्याही संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

 

मे २०१८ च्या अध्यक्षीय निवडणुकांपूर्वी पॉप्युलर विल पक्षाचे सदस्य व मुख्य विरोधक लिओपोल्डो लोपेझ यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने व्हेनेझुएलामध्ये झाली. मात्र, मादुरो सरकारने ही सर्व आंदोलने दडपली आणि अनेकांना अटक व स्थानबद्ध केले. त्यानंतर मादुरो सरकारने मोठ्या शिताफीने निवडणुका जाहीर केल्या आणि केवळ ४६ टक्के इतक्या कमी मतदानाच्या जोरावर मादुरो यांनी २१ मे २०१८ रोजी पुढील सहा वर्षांकरिता अध्यक्ष म्हणून आपल्या कारकिर्दीस प्रारंभ केला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २२ मे रोजी ट्रम्प प्रशासनाने व्हेनेझुएलावर निर्बंध लादले. यानुसार अमेरिकेतील व्यावसायिक वा व्यक्ती यांना कच्चे तेल वगळता व्हेनेझुएलाशी कोणत्याही स्वरूपाचे व्यवहार करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली. त्यानंतर युरोपियन संघाने हाच कित्ता पुढे गिरवत याच स्वरूपाचे निर्बंध लादले. दक्षिण अमेरिकेतील ‘लॅटीन लिमा या व्यापारी संघटनेने ज्यात अर्जेंटिना, ब्राझील, कॅनडा, चिली, कोलंबिया या प्रमुख देशांचा समावेश आहे, त्यांनीही निवडणुकीत पारदर्शकता नसणे आणि लोकशाही मूल्यांची पायमल्ली हे कारण देत मादुरो सरकारला अधिकृत मान्यता दिली नाही. पर्यायाने ‘लॅटीन लिमाचे व्यापारी संबंध व्हेनेझुएलाशी खंडित झाले.

 

तसेच केवळ कच्च्या तेलाच्या निर्यातीवर आगेकूच करू पाहणाऱ्या व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेने गत चार वर्षांत झालेल्या तेलाच्या घटत्या उत्पादनामुळे धापा टाकायला सुरुवात केली आहे. आजमितीस ‘पेट्रोली ओस दे व्हेनेझुएला ही सरकारी तेल कंपनी आणि सरकारी कोषागाराच्या नावे तब्बल ५० अब्ज युएस रोख्यांची थकबाकी जमा झाली आहे आणि विशेष म्हणजे मुद्दल तर सोडा, केवळ व्याज भरणेदेखील त्यांना आजवर शक्य झालेले नाही. सद्यस्थितीत प्रतिदिन दहा लाख पिंपे तेल काढणे, हाच व्हेनेझुएलासमोर या संकटातून बाहेर पडण्यासाठी एकमेव मार्ग आहे. तसेच मित्रराष्ट्र असलेल्या चीनने नव्याने कच्च्या तेलाच्या आयातीस नकार दिल्याने व्हेनेझुएलासमोरील संकट अधिक गडद झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर व्हेनेझुएलातील अशांतता नजीकच्या काळात शमेल, असे दिसत नाही. त्यातच ट्रम्प यांनी लष्करी हस्तक्षेपाची भाषा आता सुरू केली आहे. त्यामागे अमेरिका व त्याचे इतर युरोपियन राष्ट्र यांची व्हेनेझुएलामधील तेल खाणीत असणारी प्रचंड गुंतवणूक शाबूत राखणे हा प्रमुख उद्देश आहे. मात्र, द. अमेरिकेच्या आजवरच्या इतिहासावर नजर टाकली तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, जेव्हा कधी अमेरिकेने हस्तक्षेप केला आहे, तेव्हा तेव्हा परिस्थिती सुधारण्याची शक्यता अधिकच मावळली. यामुळे व्हेनेझुएला अस्ताच्या मार्गावर तर नाही ना, हा प्रश्न समोर उभा ठाकला आहे.

- प्रवर देशपांडे