स्मृतिसुगंध...
महा एमटीबी   11-Jul-2018


 
स्वामींनी भारतभ्रमण पायी केले. पायात चप्पल न घालता, वाहनात न बसता सर्वत्र पदयात्रा करणारे टेंबेस्वामी! त्यांचा शिष्यपरिवार भारतभर पसरलेला आहे. त्यांच्या कृपेने कृतार्थ झालेले अनेक भक्त आहेत.

 

कोकणमधील माणगाव गावामध्ये वासुदेव भट हे सद्‍गृहस्थ वास्तव्याला होते. सावंतवाडीजवळील या माणगावपासून जवळच निर्मला नावाची नदी वाहते. या गावातील मुख्य देवता यक्षिणी आहे. हरीभट टेंबे हे वासुदेवांचे आजोबा. गणेशभट व रमाबाई हे वासुदेवांचे माता-पिता. हे कुटुंब सात्विक व सदाचार संपन्न होतं. घराण्यात अनेक पिढ्यांपासून दत्तभक्ती चालत आलेली होती. पुण्यकर्मात सदैव रत असणारं हे कुटुंब. शास्त्रानुसार आचरण करणारं व वेदशास्त्रात पारंगत असणारं घराणं लाभलेलं होतं. त्रिकाल स्नान-संध्या करणारे, नेमस्त असणारे वासुदेव म्हणजेच प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी!  सदाचारपूर्वक प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी सगळं अध्ययन केल्यामुळे त्यांचे वेदमंत्र सिद्ध झाले होते. साप, गाय अशा विविध प्राण्यांच्या वृत्तींमध्ये बदल घडवून आणण्याची शक्ती त्यांच्या मंत्रांमध्ये होती. भूत-भविष्याचं ज्ञान असल्याने अनेक लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलं.शेकडो लोकांना रोगमुक्त केलं. अनेक लोकांना भूत-पिशाच्च बाधेतून मुक्त केलं. पीडीत, संकटग्रस्त लोकांना समस्यामुक्त केलं. टेंबेस्वामी महाराज कडक व्रताचरण करुन साधना करणारे होते.
 

त्यांचं जीवन सागराप्रमाणे अथांग आहे. हे सर्व सामान्य माणसाच्या आकलना पलीकडील आहे. बालपणी दारिद्य्र असूनही त्याचं ज्ञानाचं वैभव अफाट होतं. त्यांच्या साधनेतून व शुद्ध आचरणातून त्यांच्या ठायी तेज विलसताना दिसे. गुरू दत्तात्रेयांचा नित्य सहवास लाभलेले व त्यांच्याशी नित्य संवाद साधणारे टेंबेस्वामी होते. ते दत्तगुरुंच्या आज्ञेनुसार, आदेशानुसार आचरण करणारे होते. अत्यंत कठोर तपाचरण, व्रताचरण करणारे होते. त्यांच्या प्रत्येक शब्दात अफाट ताकद होती. त्यांचा एकही शब्द कधीही असत्य ठरला नाही. त्यांनी एकूण तेवीस चातुर्मास वेगवेगळ्या स्थळी केले. श्रीक्षेत्र उज्जैनीला पहिला चातुर्मास केला, तर शेवटचा श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथे केला. शके १८१३ ते १८३५ या कालावधीत चातुर्मास संपन्न करुन त्यांनी अनेक लोकांना उपदेश केला.

 

प.प. वासुदेवानंद सरस्वतींनी एकोणीसावा चातुर्मास विदर्भातील पवनी येथे केला. पांडुरंगाच्या मंदिरात वास्तव्य करुन गुळवणी महारांजाना दीक्षा दिली. या पावन मंदिराचा जीर्णोद्धार प.पू. सद्‍गुरुदास स्वामींनी करुन, त्या मंदिराला उर्जितावस्था प्रदान केली आहे. दत्त संप्रदायातील वासुदेवानंद सरस्वती स्वामी, विष्णुदास स्वामी आणि सद्‍गुरुदास स्वामी हे थोर संत. या तिघांनी दत्तभक्तीचा प्रसार सामान्य लोकांमध्ये करुन, दत्तात्रेयांच्या भक्तीभोवतीच्या गूढ वलयाला दूर करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलेलं आहे. ‘प्रभू दत्तात्रेय’ हे स्मरण केल्याबरोबर भक्तांच्या मदतीला धावून जाणारं दैवत असल्याचं आवर्जून कथन केलं. भोग आणि योग दोन्ही प्रदान करणारे दत्तप्रभू आहेत. त्यांची भक्ती शीघ्रफलदायी आहे, हे त्यांनी स्वआचरणातून समाजासमोर ठेवलं.

 

प.प. टेंबेस्वामींनी वेगवेगळ्या नद्यांच्या तीरावर साधना केली. त्यावेळी त्यांच्या मुखातून विविध नद्यांची स्तोत्रे स्फुरली. त्याचप्रमाणे देवभाषा असणार्‍या संस्कृतमधील अनेक ग्रंथ त्यांच्या प्रतिभेतून साकार झाले. प्रचंड सामर्थ्यसंपन्न असणारा तारकमंत्र ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा’ हा प.पू. टेंबे स्वामींनी दिला. आजही शेकडो लोकांना संकटातून तारणारा आणि पारमार्थिक शक्ती प्राप्त करुन देणारा हा प्रभावी मंत्र आहे. त्याची अनुभूती प्रत्येक भक्ताने घ्यायला हवी. लौकिक आणि पारलौकिकाच्या प्राप्तीसाठी हा मंत्र उपयुक्त आहे. नर्मदेच्या प्रशस्त काठावर वसलेलं गरूडेश्‍वर गाव. पावित्र्य, वैराग्य याचा सुरेख संगम या स्थानी झालेला आहे. शांत व निवांत अशा या स्थानी, दत्तभक्तीमध्ये रममाण झालेल्या स्वामींनी याच स्थानाची निवड केली. आपला देह नर्मदेमध्ये विसर्जित करण्याचं त्यांनी ठरवलं. अखेरची साधना, भक्तांना उपदेश केला. स्वकर्मानेच अंतःकरण शुद्ध होते व मग उपासना स्थिर होते. त्यामुळे मनाला शांती प्राप्‍ती होते. त्यानंतर आत्मज्ञानाची प्राप्‍ती होऊन मोक्षाचा लाभ होतो. त्यांच्या या उपदेशाचा अमूल्य लाभ झालेले भक्त भाग्यवानच होय. आषाढ शुद्ध प्रतिपदेला, मंगळवारी, आर्द्रा नक्षत्रामध्ये उत्तरायणात टेंबेस्वामींनी देवाकडे पाहून त्राटक करून श्‍वासनिरोध केला आणि दीर्घ प्रणवाचा उच्चार करून देहाचं विसर्जन केलं. ब्रह्मरूपात लीन झाले. स्वामींच्या आदेशानुसार, त्यांच्या दंडाचे तीन तुकडे करून मांडीवर ठेवले. कमंडलूला मध्यभागी भोक पाडून, तो कमेरला बांधला. दोर्‍याने देहाला दगड बांधून अत्यंत पवित्र मंगलमय देह नर्मदामातेला अर्पण केला.

 

नर्मदामातेचं अंतःकरण भरून आलं. तिने आपल्या अलौकिक पुत्राला प्रेमाने जवळ घेतलं. वैराग्यपूर्ण असणारी नर्मदामाता अंतर्बाह्य थरारली. हजारो लोकांना सांभाळणारा, सावरणारा, सामर्थ्यसंपन्न असणारा पुत्र तिच्या कुशीत कायमचा विसावला. त्यामुळे प्रत्येक स्वामीभक्त व दत्तभक्ताला या स्थानाची ओढ असते. गरूडेश्‍वर तीर्थक्षेत्र होऊन झालं. श्रीगुरूचरित्राचे पारायण, करूणात्रिपदी आळवणं, दिगंबराचा जप करणं यासाठी अत्यंत शक्तिशाली स्थान म्हणजे गरूडेश्‍वर होय. नर्मदेच्या जलामध्ये टेंबेस्वामींची शक्ती जाणवते. भारावलेला परिसर तसेच येथे शिवमंदिर, दत्तमंदिर आणि स्वामींचं समाधीस्थान आहे. या स्थानाचं माहात्म्य अनुभवण्याजोगे आहे. टेंबेस्वामी महाराजांची समस्त भक्‍तांवर असीम कृपा आहे आणि त्याचा प्रत्यय आजही येत आहे. त्यांनी अनेक दत्तस्थानं दत्तत्रेयांच्या कृपेने उजेडात आणली. स्वामी म्हणजे वैराग्य, उत्कट दत्तभक्ती, लोकांच्या उद्धारासाठी झटणारे जीवन आशयघन करणारे, दत्तप्रभूचं दर्शन घडूवन मोक्षाच्या मुक्कामापर्यंत घेऊन जाणारी विभूती होय.

-कौमुदी गोडबोले