कोरियन द्विपकल्पातील शांतता प्रक्रियेत भारताचा सहभाग
महा एमटीबी   10-Jul-2018
नवी दिल्‍ली : भारत आणि दक्षिण कोरियात मंगळवारी १० महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. यातील एका करारामुळे कोरियन द्विपकल्पातील शांतता प्रक्रियेत भारताच्या सहभागाचा मार्ग मोकळा झाला.

 

भारत भेटीवर आलेले दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जी इन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात धोरणात्मक सहकार्यासह द्विपक्षीय हिताच्या विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. संरक्षण व सुरक्षा, कृत्रिम गुप्‍तचर यंत्रणा स्थापन करणे, व्यापाराला प्रोत्साहन देणे, प्रादेशिक शांततेकरिता एकत्रित काम करणे आणि महासंहारक शस्त्रांचा प्रचार रोखणे यासारखे महत्त्वाचे मुद्दे चर्चेत उपस्थित झाले होते. सर्वंकष आर्थिक भागीदारीच्या कराराची व्याप्‍ती वाढविण्याच्या दस्तावेजावर स्वाक्षरी करतानाच, परस्पर सहकार्याच्या अन्य १० करारांवरही पंतप्रधान मोदी आणि मून जी इन यांच्या उपस्थितीत स्वाक्षर्‍या करण्यात आल्या.

 

यानंतर संयुक्‍त पत्रपरिषदेला संबोधित करताना मोदी यांनी पाकिस्तानला अण्वस्त्रांचा पुरवठा करण्यात उत्तर कोरियाच जबाबदार असल्याची अप्रत्यक्ष टीका केली. याच एकमेव कारणामुळे भारत शांतता प्रक्रियेत सहभागी होत असतो, असे पंतप्रधान म्हणाले. ”बैठकीतही मी मून जी इन यांना हेच सांगितले की, अण्वस्त्रांच्या प्रसारात ईशान्य आशिया आणि दक्षिण आशिया यांचा संबंध भारतासाठी चिंताजनक बाब आहे. ही स्थिती घातक अशीच असून, शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत आवश्यक ती सर्वच पावले उचलेल, असे पंतप्रधान म्हणाले.