जगातील माध्यमांचे सद्य स्वरूप आणि त्यांचे उत्पन्नाचे विविध मार्ग
महा एमटीबी   09-Jun-2018 

माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात घडलेल्या क्रांतीनंतर माध्यमांचे एकूण स्वरूप बदलले आहे. त्यामुळे माध्यम समूहांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रवेश केला आहे. टीव्ही, रेडिओ, वेगवेगळी प्रकाशाने. चित्रपट, इंटरनेट, सोशल नेटवर्किंग या सर्व गोष्टींमध्ये मोठ्या मध्यम समूहांनी प्रवेश केला. त्यामुळे एकूण माध्यमांचे चित्र बदलले.
 
जगातील माध्यमांच्या बाजारपेठांबद्दल ज्या वेळेला आपण विचार करतो, तेव्हा जगातील जवळ जवळ ९०% माध्यमांवरती, प्रमुख अशा केवळ २० कंपन्यांचे स्वामित्व आपल्याला दिसून येते आणि या मोठ्या कंपन्या सतत आपल्या व्यवसायांमध्ये नवनवीन माध्यमांचा समावेश करत असतात किंवा माध्यमांव्यतिरिक्त इतरही व्यवसाय/उद्योगधंद्यांमध्ये या मोठमोठ्या कंपन्या आता प्रवेश घेत आहेत किंवा जोमाने कार्य करत आहेत, असे चित्र आपल्याला सध्या दिसून येते. मुळात पूर्वी ज्या वेळेला केवळ मुद्रित माध्यमांचे वर्चस्व होते, त्यावेळेला माध्यमांची मालकी किंवा माध्यमांचे वर्चस्व याला एक मर्यादा होती आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या माध्यमांचे प्रभुत्व दिसून यायचे. मात्र जागतिकीकरण आणि उदारीकरणानंतर गेल्या ३० वर्षांमध्ये माध्यम मालकीच्या स्वरूपामध्ये बदल झाला आहे आणि माध्यम मालकीचे केंद्रीकरण झाल्याचे आपल्याला दिसून येते. त्याच बरोबर अनेक नवे माध्यम समूह उदयास आले आहेत किंवा अस्तित्वात असलेल्या माध्यम समूहाचे जाळे आणखी मोठ्या प्रमाणावर वाढले आहे, असे आपण म्हणू शकतो. यामध्ये अनेक मोठ्या माध्यमांनी छोट्या छोट्या माध्यमांवर वर्चस्व मिळवले आहे, एकत्र अशा माध्यमांचे अनुकरण केले आहे, किंवा अनेक ठिकाणी भागीदारी केली आहे आणि त्यामुळे काही विशिष्ट माध्यम समूहाचचे वर्चस्व जागतिक माध्यम बाजारपेठेमध्ये दिसून येते.
 

माध्यम विश्वाचे सद्यस्वरूप आणि सोशल मीडिया 

माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात घडलेल्या क्रांतीनंतर माध्यमांचे एकूण स्वरूप बदलले आहे. त्यामुळे माध्यम समूहांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रवेश केला आहे. टीव्ही, रेडिओ, वेगवेगळी प्रकाशाने. चित्रपट, इंटरनेट, सोशल नेटवर्किंग या सर्व गोष्टींमध्ये मोठ्या मध्यम समूहांनी प्रवेश केला. त्यामुळे एकूण माध्यमांचे चित्र बदलले. डिजिटल क्रांती झाल्यानंतर अनेक माध्यमे एकतर बंद झाली किंवा त्या डिजिटल क्रांतीमाध्येच स्वतःचा समावेश करून घ्यावा लागला. आणि आंतरक्रियेला सुरुवात झाली. वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साईट्स सुरू झाल्या आणि त्याचा संपूर्ण माध्यम जगतामध्ये अंतर्भाव झाला. Facebook, twitter, Google plus, my space, instagram, youtube अशा अनेक वेगवेगळ्या वेबसाईट/सोशल मीडिया साईट्स सुरू झाल्या. याखेरीज Big adda, classmates.com, photolog, Hotlist, India Times, Skype अशा वेगवेगळ्या साईट्स सुरू झाल्या आणि त्यांचा एकूणच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संचार होऊ लागला.

 

या वेगवेगळ्या नवीन माध्यमांमध्ये आंतरर्क्रिया म्हणजेच Two-Way Communication ला सुद्धा सुरुवात झाली आणि या आंतरक्रियेच्या माध्यमातून या नवीन माध्यमांना उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली. उदाहरणार्थ एक सर्च इंजिन म्हणून google वरून आपल्याला वेगवेगळी माहिती मिळतेच, पण त्याचबरोबर आपण जे सर्च करतो, त्यामधून google ला उत्पन्न कसं मिळतं हे बघणं फार रोचक आहे किंवा मध्यंतरी facebook वरचा डेटा चोरी झाली, किंवा तो विकला गेल्यावरून बरेचसे वाद झाले किंवा त्यासाठी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याने माफीसुद्धा मागितली. तर एकूण facebook चा डेटा जो आहे, तो कसा संग्रहित केला जातो? त्याचा उपयोग पैसे मिळवण्यासाठी कसा होतो? facebook वर जाहिरात द्यायला किती पैसे लागतात? मोफत उपलब्ध असलेल्या गूगल मॅपची जाहिरात का केली जाते? गूगलचा उत्पन्न मिळवण्याचा मार्ग कसा आहे? youtube वरून Video share केल्यावर आपल्याला काय लाभ होतो? youtube चे उत्पन्नाचे स्रोत काय आहेत? त्यात आपली भागीदारी कशा प्रकारची असते? youtube वरील जाहिरातींचे दर कसे असतात? Linkdin वर वेगवेगळ्या लोकांचे प्रोफाईल जोडल्यानंतर त्याचा linkdin ला काय फायदा होतो? या वेगवेगळ्या कंपन्यांचे अधिग्रहण कसे होते? वेगवेगळ्या माध्यमांचा एकत्रीकरण कसे झाले आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणं अतिशय रोचक आहे. वाचकांना याबाबत जाणून घेणं नक्कीच उपयुक्त ठरेल.

 

जगातील वेगवेगळ्या माध्यम समूहांचे वर्चस्व, मालकी पद्धत, वेगवेगळ्या माध्यमांच्या उत्पन्नाचे विविध मार्ग, भारतातील प्रमुख माध्यमे, त्या प्रमुख माध्यमांचा इतिहास, सद्यस्थिती आणि भविष्य जाणून घेणे वाचकांना नक्कीच उपयुक्त आणि रोचक ठरेल, असा विश्वास व्यक्त करून, या स्तंभामध्ये अशा वेगवेगळ्या माध्यमांचा परामर्श घेतला जाईल. तसेच या वेगवेगळ्या माध्यमाच्या संदर्भातले प्रश्न किंवा वाचकांच्या प्रश्नांची उत्तरेदेखील या सदरातून दिली जातील.

 

- गजेंद्र देवडा