त्यांच्या कष्टाचे चीज झाले!
महा एमटीबी   09-Jun-2018

 

 
राष्ट्र सेविका समितीच्या लहाणपणापासून सेविका असलेल्या, समितीच्या मुंबई प्रदेश कार्यवाहिका व अखिल भारतीय सहबौद्धिक प्रमुख ही पदे भुषविलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सुशीला महाजन यांच्या 'डाव मांडियेला’ या पुस्तकाच्या तृतीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा राष्ट्र सेविका समिती, सांस्कृतिक विभागाच्या (धार्मिक विभाग) संमेलनात आज पार पडला. ‘मुंबई तरुण भारत’च्या स्तंभलेखिका आणि अध्यात्म विषयावरील व्याख्यात्या कौमुदी गोडबोले यांच्या हस्ते या पुस्तकाच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन ठाण्यात करण्यात आले. या पुस्तकातील एका प्रकरणाचा अंश खास ‘मुंबई तरुण भारत’च्या वाचकांसाठी येथे देत आहोत.
 

जनसंघ स्थापन झाला १९५१ मध्ये. त्यावेळी माझे लग्न झाले नव्हते; पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक नवीन राजकीय पक्ष स्थापन करीत आहे हे कानावर होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींनी हिंदू महासभेचा त्याग केल्यानंतर त्यांच्याबरोबर सरसंघचालक नव्या पक्षाच्या स्थापनेबद्दल विचार करीत आहेत, हे घरातल्या बोलण्यांमधून, वर्तमानपत्रांमुळे मला समजले होते. या नव्या पक्षाबद्दल मनात खूपच उत्सुकता होती. त्याची माहिती पुढे लग्न झाल्यावर मधुकररावांच्या तोंडून ऐकायला मिळाली, ती अशी गांधींच्या वधानंतर संघावर अन्यायकारक बंदी लादली गेली. राजकारणापासून संपूर्णपणे अलिप्त राहूनही स्वकीय राज्यकर्त्यांकडून कार्य बंद केले जाऊ शकते किंवा कार्यात अडथळे आणले जातात हे सिद्ध झाले. रा. स्व. संघ ही जीवनव्यापी संघटना आहे आणि राजकारण हे जीवनातील एक महत्त्वाचे अंग असल्यामुळे संघप्रणीत जीवनव्यवहारात राजकारण अनपेक्षित नाही. तेव्हा व्यावहारिकदृष्ट्या संघकार्यात येणाऱ्या अडचणींविरुद्ध आवाज उठविण्यासाठी लोकसभेत कोणी ना कोणी आपली माणसे असणे आवश्यक आहे, हे संघाच्या लोकांच्या पक्के लक्षात आले; म्हणून नवीन राजकीय पक्ष काढण्याचा विचार बळावला. त्यानुसार जनसंघाची स्थापना २० ऑक्टोबर १९५१ रोजी दिल्लीत झाली. त्यावेळी म्हणजे १९५० मध्ये संघप्रचारक म्हणून काम थांबविण्याचे यांनी ठरविले होते, पण निदान एक वर्षापुरते राजकीय क्षेत्रात काम करण्याचा यांना आग्रह झाला आणि एक वर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर हिंडून, आगामी निवडणुकांत आपल्याला कितपत भाग घेता येईल याची चाचपणी करण्याची जबाबदारी दिली गेली. दि. १ जुलै १९५१ च्या जिल्हा संघचालकांच्या बैठकीत मधुकररावांचा परिचय करून देऊन, महाराष्ट्रात जनसंघ स्थापनेसंबंधीचे काम मधुकररावांकडे दिले असल्याचे जाहीर केले गेले. मधुकरराव अगदी टापटीप, शिस्तीचे आणि अभ्यासू. त्यांना भोसेकर व गोखले हे जोडीदार दिले गेले. यांनी त्यांना तीन प्रकारे माहिती गोळा करायला सांगितली. १) निवडणुकीसंबंधी- सरकारी नियम, कायदे वगैरे. २) इतर पक्षांचा प्रचार- विशेषत: आपल्यावरील आक्षेप. ३) जनसंघाची माहिती. थोडे दिवस नियमित काम केल्यावर त्या दोघांनी काम कमी केले. महाराष्ट्रभर बैठकी घेण्यासाठी जावे लागत असल्याने त्यांच्याकडून कामाचा आग्रह धरता आला नाही. त्यानंतर रात्रंदिवस जागून, आवश्यक ती माहिती गोळा करण्याचे काम हे एकटेच करीत असत.

 

कार्यवाहाच्या सहकार्याने काही जबाबदार व्यक्ती यांनी नियुक्त केल्या. पक्षबांधणीच्या दृष्टीने या लोकांशी यांनी सतत संपर्क व पत्रव्यवहार चालू ठेवला. १९५२ च्या निवडणुका समोर आल्या आणि त्यामध्ये संघाची व जनसंघाची भूमिका सांगण्यासाठी बैठका सुरू झाल्या. प्रस्तुत कार्य आपल्या कामाच्या मर्यादेत येते किंवा नाही याबद्दल संघबंधूच्या मनात संशय होता. त्यामुळे स्वयंसेवकांच्या मनोवृत्तीची प्राथमिक तयारी करणे आवश्यक होते. मा. मोरोपंत पिंगळे; मा. बाबाराव भिडे यांची बैठकीतील उपस्थिती अनेक खुलासे करणारी ठरली. या सर्व बैठकींना महाजन स्वतः उपस्थित होते. त्यामुळे किती लोकांना, कुठून उमेदवारी देता येईल याचा अंदाज त्यांना आला. महाराष्ट्र प्रदेशातील कामाला चालना देण्यासाठी भोवतालच्या राजकीय व्यक्तिमत्वांच्या प्रतिक्रिया आजमावणे आवश्यक होते. त्यासाठी यांनी काँग्रेस, शेकाप, रामराज्य परिषद, हिंदू महासभा यांच्या पदाधिकार्यांच्या भेटी घेतल्या. तसेच स. का. पाटील, जयंतराव टिळक, चिंतामणराव देशमुख, रामराज्य परिषदेचे रामशास्त्री जोशी यांनाही हे भेटले व समाजमनाचा कानोसा घेतला. अशा प्रकारे 'भारतीय जनसंघ’ महाराष्ट्रात स्थापन करावा यासाठी प्रयत्न सुरू झाले. पक्षाला साजेसा नेता निवडणे हेही एक प्रमुख काम होते. त्याकरिता मुंबईचे गोपाळराव देशमुख यांची यांनी भेट घेतली. ते स्वतः अपक्ष म्हणून उभे राहणार होते. त्यांचे म्हणणे, स्वतंत्रपणे निवडणूक लढवली तर निवडून येण्याची अधिक शक्यता आहे, तेव्हा निवडणुकीनंतर मी जनसंघात सामील होईन. श्री. गोपाळरावांशिवाय अन्य बर्यापैकी पुढारी त्यावेळी तरी डोळ्यासमोर आला नाही. यांच्या मते, म्हणूनच जनसंघाची महाराष्ट्रात स्थापना करणे लांबणीवर पडले. जनसंघाच्या स्थापनेच्या वेळी महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून मधुकरराव महाजन व विनायकराव आपटे असे दोघे जण दिल्लीला गेले होते. दिल्लीभेटीचे, स्थापनादिनाचे सर्व वृत्त यांनी डायरीत नोंद करून ठेवले आहे.

 

दि. १८ ला रात्री हे विनायकरावांबरोबर झंडावाला मंदिराच्या कार्यालयात गेले. तेथे मा. वसंतराव ओक, मा. माधवराव मुळे, मा. बलराज मधोक अशा प्रमुख कार्यकर्त्यांच्या व त्यांच्या गाठी पडल्या. शिवाय अटलजी, दीनदयाळजी, कुशाभाऊ ठाकरे अशा वेगवेगळ्या प्रांतांतील तरुण कार्यकर्त्यांची नावे यांच्या कानावर आली. दिल्लीकर मंडळींकडून महापालिकेच्या निवडणुकीचे अनुभव यांना ऐकायला मिळाले. काँग्रेसने सर्व युक्तायुक्त साधनांचा निवडणुकीत कसा उपयोग केला, हे यांच्या लक्षात आले. दि. १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी महापालिकेमधील विजयी व अयशस्वी अशा सर्वच उमेदवारांची मा. हंसराज गुप्ता यांच्याकडे बैठक झाली. सुमारे १,००,१२५ प्रौढ प्रतिष्ठित मंडळी तेथे होती. हे म्हणत असत, की संघकार्याचा परीघ विस्तृत असल्याची जाणीव मला तेव्हा प्रथम झाली. रंगबिहारीलाल यांच्यातर्फे ही बैठक बोलावली होती. दि. २० ऑक्टोबर रोजी दुपारी कार्यकारिणी बैठकीला महाजन हजर होते. जाहीरनामा व घटना मान्य करून घेण्यात आली. राजकारणाशी अपरिचित लोकांना एक एक मुद्दा पटवून देण्याच्या डॉ. श्यामाप्रसादांच्या कौशल्याचा यांच्यावर त्यावेळी फारच प्रभाव पडला होता. रविवार, दि. २१ रोजी उद्घाटनाचा कार्यक्रम होता. व्यवस्था अप्रतिम होती. दुपारच्या निमंत्रितांच्या सभेला सुमारे दोन हजार लोक होते. भारतीय जनसंघाच्या स्थापनेमागील भूमिका डॉ. श्यामाप्रसादांनी अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केली. गोकुळचंद नारंग यांचे थोडा वेळ भाषण झाले. निःस्वार्थी व तरुण कार्यकर्त्यांची ही संघटना यश मिळविणारच असा त्यांचा विश्वास होता. प्रचंड उत्साही तरुणवर्ग पाहून, ते भारावले आणि त्यांचा संघटनेवरील विश्वास सांगतांना यांचे डोळे पाणावत असत. हे तसे मनाने खंबीर आणि अलिप्तसुद्धा, पण श्यामाप्रसाद किंवा डॉक्टरांच्या आठवणी सांगताना त्यांचा कंठ नेहमी दाटून येत असे. या सभेत जनसंघाच्या घटनेवरील चर्चेमध्ये महावीरजी, बलराज मधोक, धर्मवीरजी यांची भाषणे झाली.

 

दि. २१ रोजी सायंकाळी गांधी मैदानावर डॉ. श्यामाप्रसादांचे जाहीर भाषण होते. ५०,००० वर लोक आले होते. हे नेहमी म्हणत, की तेथे एवढ्या मोठ्या सभा फार क्वचितच होत असत. दुसऱ्या दिवशी त्या मैदानाजवळ काँग्रेसची सभा होती. काकासाहेब गाडगीळ, मोरारजीभाई व इतर प्रांतांतील प्रमुख मंत्र्यांची भाषणे असूनही उपस्थिती अत्यल्प होती. डॉ. श्यामाप्रसादांनी आपल्या भाषणात जनसंघाची भूमिका विशद करून, प्रचलित राज्यकारभारावर कडक टीका केली. त्यांच्या भाषणातून दिलेली जनसंघावरील आक्षेपांची उत्तरे अतिशय तर्कशुद्धही होती. विशेष म्हणजे आज पन्नास वर्षे होत आली, पण आक्षेप मात्र बदलले नाहीत. म्हणजे आपले स्पष्टीकरण काही टीकाकारांना समजूनच घ्यायचे नाही हेच खरे! श्यामाप्रसादांच्या त्या भाषणातील सडेतोड वक्तव्ये यांनी पुढेही आम्हाला अनेकदा ऐकवली असतील. त्यामुळे जनसंघाचे राजकीय धोरण, संघाशी नाते या गोष्टी मनात अगदी स्पष्ट झाल्या.

 

१९५०-५२ मध्येही फाळणीच्या जखमा अगदी ताज्या होत्या. आमची जेठी देवानी किंवा हशू अडवाणी यांच्यासारखी हजारो सिंधी मंडळी आपला देश सोडून, इकडे आली होती. अखंड हिंदुस्थान हे त्यांचे आणि आमचेही स्वप्न होते. त्यामुळे ही मंडळी संघाच्या अधिक जवळ आली होती. डॉ. श्यामाप्रसाद म्हणाले की, 'हिंदुस्थान-पाकिस्तान एकत्र करण्याची भाषा काहींना मूर्खपणाची तर काहींना भीतीदायक वाटत असते, परंतु अखंड हिंदुस्थानचा विचार करण्यात काहीही गैर नाही.” हे त्यांनी जनसंघ स्थापनेच्या सभेत नि:संदिग्धपणे स्पष्ट केले. त्यावेळी ते म्हणाले, 'आल्स्टरची मागणी कारणारे आयर्लंड मूर्ख आहे काय? कोरियाचा उत्तर भाग एकत्र जोडला जावा, असे म्हणण्यास अमेरिका कचरत नाही. पॅलेस्टाईन आमचा आहे असे म्हणून ज्यूंनी तो परत मिळविला व त्याला जगाची मान्यता मिळाली. मग हिंदुस्थान व पाकिस्तान एक करण्याचे ध्येय ठेवण्यात काहीही गैर नाही. जगाचे यामुळे काहीही नुकसान नाही. याबरोबर जनसंघावरील दुसरा आरोप जातीयतेचा. दुर्दैवाने आजही सर्वात मोठा पक्ष असूनही हाच आरोप धरून ठेवून, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, खाली खेचण्यासाठी सर्व राजकारणी धडपडत आहेत आणि तेवढीच भाजपची लोकप्रियता वाढत आहे. आपल्या पहिल्याच सभेत श्यामाप्रसादजींनी ठणकावून सांगितले की आमच्यावर जातीयतेचा आरोप करणारे जातीयता म्हणजे काय तेही सांगू शकत नाहीत. जनसंघात कोणीही येऊ शकतो, मग तो जातीय कसा? यात फारसे मुसलमान नाहीत म्हणून याला जातीय म्हणाल, तर स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसला तरी कोठे मुसलमानांचा पाठिंबा होता? मुसलमानांच्या राखीव जागेवर किती काँग्रेसवाले निवडून येत असत याची त्यांनी आठवण करावी. चार-दोन डोकी इकडेतिकडे मिरवण्यापुरती असली, म्हणजे सेक्युलर होत असेल, तर जनसंघालाही तेवढ्या संख्येच्या मुसलमानांचा आजही पाठिंबा आहे.

 

त्या सभेमुळे हे तर खूपच प्रभावित झाले होते. भारतीय जनसंघासारख्या नवीन राजकीय पक्षाला सर्वस्वी योग्य असा पुढारी मिळाला आहे, असा विश्वास हे नेहमी बोलून दाखवत असत. त्याच वेळी दि. २२ रोजी महाराष्ट्रात जनसंघाची स्थापना करण्यासंबंधी मधुकररावांचे डॉ. श्यामाप्रसादांशी बोलणे झाले. महाराष्ट्रात जनसंघ किती लवकर स्थापन करावा हे महाराष्ट्रातील संघटनेच्या परिस्थितीवर अवलंबून आहे, असे सांगून, त्यांनी यांना वसंतराव ओक यांचे मार्गदर्शन घेण्याचे चाणाक्षपणे सुचविले. त्यानंतर वसंतरावांशी यांचे बोलणे झाले. महाराष्ट्रातील आपल्या कामाचा व राजकारणाचा विचार करता, जनसंघ काढण्याची घाई करू नये, असे वसंतरावांनी सांगितले. पक्षाला जेव्हा योग्य नेता मिळेल व कार्याची धुरा वाहणारा तरुणवर्ग आहे असे दिसेल; तेव्हाच नवीन पक्ष काढण्याचे ठरले. दिल्ली भेटीमुळे यांच्या मनात जनसंघ स्थापनेच्या कल्पना अगदी स्पष्ट झाल्या आणि महाराष्ट्राचा संघटनमंत्री म्हणून काम करताना अधिक नेटकेपणा आला. तसेच नंतर दीड महिना श्यामाप्रसादजींबरोबर हे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्यात, अनेक गावांत हिंडले, सभा-बैठका घेतल्या. जनसंघ स्थापनेतील या अशा अनेक घडामोडी लग्नानंतर हे मला आवर्जून सांगत. समितीच्या सेविकांना जनसंघ या राजकीय पक्षाचे महत्त्व समजले, तर आपले काम अधिक जोमाने वाढेल असा यांना विश्वास होता. यांच्या पहिल्या स्मृतिदिनी मा. नानाजी देशमुख यांनी सांगितले होते की, 'मधूचे पहिल्यापासूनच म्हणणे होते, की नवीन राजकीय पक्षात महिलांना आपण योग्य ते स्थान दिले पाहिजे. स्त्रियांबद्दल त्यांचा दृष्टिकोन नेहमीच उदारपणाचा होता. स्त्रियांच्या शक्तीवर त्याचा पूर्ण विश्वास होता.'

 

यांच्या या स्त्रीशक्तीच्या जाणिवेचा अनुभव मी नेहमीच घेतला आहे. पक्षाच्या जडणघडणीबद्दल ते माझ्याशी आवर्जून बोलत आणि मलाही त्यात रस असल्यामुळे मी सहभागी होत असे. म्हणूनच छोट्याशा जागेत, मर्यादित प्रतिनिधींच्या उपस्थितीत यशस्वीपणे पार पडलेले जनसंघाचे ते पहिले अधिवेशन आजही माझ्या डोळ्यांसमोर जसेच्या तसे उभे आहे. अध्यक्ष मौलिचंद्र शर्मा यांनी 'मधुकर' या नावावरून यांच्या रूपगुणाचा आपल्या समारोपाच्या भाषणात केलेला उल्लेख अजूनही मला आठवतो आहे. त्या पार्श्वभूमीवर हे भव्य अधिवेशन पाहून भाजपची ही यशाकडे चालेली वाटचाल हिंदुराष्ट्राकडे नेणारी ठरेल याची तेव्हाच खात्री वाटली होती. त्यावेळच्या, आज हयात असलेल्या व नसलेल्या सर्व कार्यकर्त्यांची धडपड आज मूर्त स्वरूपात बघायला मिळाली. त्यांच्या कष्टाचे चीज झाले, अटलजी पंतप्रधान झाले!