डाक विभाग आणि...
महा एमटीबी   08-Jun-2018

 


भारतात रेल्वे आणि डाक विभागाचे जाळे मोठे आहे. आज मोबाईल फोन आणि इतर संपर्कमाध्यमे आल्याने संपर्कक्रांती झाली आहे. कोणे एके काळी एखादा पोस्टमन आला म्हणजे चांगली बातमी आली, असे समीकरण ठरले होते. विशेषतः ९० पर्यंत जन्माला आलेल्या पिढीत अनेकांच्या जन्माच्या बातम्या या पोस्टानेच मिळाल्या आहेत. पूर्वी तार आली की एखादी वाईट बातमी आली, म्हणून लोक गंभीर होत. पोस्टमन हा घरचाच सदस्य असल्याची भावना लोकांमध्ये होती. आज डाक विभागाचे कार्य तसे आक्रसले आहेत. संपर्क क्रांतीमध्ये पत्र कालबाह्य झालेली आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये. नुकतंच केंद्र सरकारने ग्रामीण डाकसेवकांच्या भत्त्यात भरघोस वाढ केली आहे.
 

ग्राम डाकसेवक हे एकूणच सरकारी नोकरांमध्ये पगारवाढीसाठी सर्वाधिक पात्र कर्मचारी आहे. त्याची कारणे दोन. पहिले कारण की वर्षानुवर्षे काम करूनही या डाकसेवकांचे वेतन हे अगदीच कमी होते. पूर्वी एका डाक सेवकाचे वेतन जिथे २,२९५ रुपये इतके होते ते आता वाढून १० हजार रुपये इतके झाले आहे. ही वाढ चौपट म्हणजेच ५६% इतकी आहे. आज शहरी भागातील लोकांना प्रश्न पडत असेल, की संवादाची माध्यमे वाढत असताना पोस्टाची गरजच काय? शहरी भागात खाजगी कुरिअरची सेवा चांगली आहे, पण ग्रामीण भागात पोस्टाच्या माध्यमातूनच वस्तू पाठवता येतात. सरकारी पत्रे त्यात नियुक्त्या असो वा समन्स या प्रामुख्याने पोस्टानेच पाठवल्या जातात. ग्रामीण भागात पेंशन पोस्टानेच जाते. तर ही पोस्टाची ही व्यवस्था जरी जुनी असली तरी कालानुरूप सरकारने काही बदल केल्याने, ही व्यवस्था आजही टिकून आहे. आज या डाकसेवकांना योग्य वेतन मिळाल्याने त्यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. फक्त वेतनवाढ नाही, तर ही वेतनवाढ ही २०१६ पासून लागू करण्यात आली आहे. याचा अर्थ गेल्या दोन वर्षांतील पगाराचा अनुशेषही त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. पोस्टाचे महत्त्व हे उत्तरोत्तर वाढत जाणार, त्याचे कारण आज ऑनलाईन बहुतांश वस्तू उपलब्ध असतात. त्या ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्टाचे जाळे उपयोगी पडेल. तसे प्रयत्न आज झालेही आहेत. पुढील काळात याच प्रमाण वाढत जाईल यात शंका नाही.

 

दहावीचा निकाल आणि पुढची कारकीर्द

 

आज दहावीचा निकाल. अनेक पौगंडावस्थेतील मुलामुलींच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा दिवस आहे. दहावीचा निकाल म्हटला की विद्यार्थ्यांसह पालक धास्तीवर असतात. त्यात टक्केवारी आणि आवडीचे विद्यालय मिळणार की नाही यासाठी पालक आणि विद्यार्थी दोघे भिंतीच्या सावटाखाली असतात. शाळा पुस्तकात नायक या दिवसाचे वर्णन करताना म्हणतो की, 'निकालाच्या दिवशी अगदी गोठल्यासारखं होतं.' पूर्वी पालक म्हणतील त्या शाखेला प्रवेश घेण्याकडे कल वाढला आहे. किमान आपल्या अपेक्षा, आकांक्षा आणि स्वप्ने लादण्याचे प्रमाण कमी झाले, म्हणून ही २१ व्या शतकातील पिढी तशी नशीबवान. अनेक विद्यार्थ्यांना अपेक्षित गुण मिळाले नाही, म्हणून विद्यार्थ्यांनी निराश होण्याचे कारण नाही हे लक्षात घेतले पाहिजे. त्याचे कारण आज कागदांवरील गुणांपेक्षा अंगभूत गुणांना आज जास्त महत्त्व आहे.

 

परीक्षार्थी होण्यापेक्षा ज्ञानार्थी होण्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष दिले पाहिजे. आपला कल, आपली क्षमता ओळखून, पुढील कुठल्या कार्यक्षेत्रात आपण काम करू याची जाणीव लवकरात लवकरात होणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या पालकांसह त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करण्याची तयारी हवी. आज कुठेही नोकरी मिळवण्यासाठी शैक्षणिक वर्षात किती गुण मिळाले याची विचारणा केली जात नाही. कौशल्याधिष्ठित कार्याला महत्त्व आहे म्हणून कौशल्य कशी आत्मसात करावी यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील असले पाहिजे. कितीतरी अशा बहुआयामी व्यक्ती या शाळेत फार हुशार नव्हत्याच जिज्ञासूंनी नापास मुलांची गोष्ट हे पुस्तक आवर्जून वाचावे. एडिसनचे एक वाक्य सुप्रसिद्ध आहे. एडिसन म्हणतो की 'उद्या माझी परिक्षा आहे, पण मी फार चिंतेत नाही कारण एक कागदाचा तुकडा माझे भविष्य घडवू शकत नाही.' उद्या या दहावीचे निकाल लागतील. सकाळी किती गुण मिळाले हे कळलेही असेल. दोन दिवसांत गुणपत्रिका तुमच्या हातीही येतील, पण हा कागदाचा तुकडा तुमचे भविष्य ठरवू शकत नाही याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.