दुर्योधन चिंतेत
महा एमटीबी   07-Jun-2018
दुर्योधनाने भीमावर हल्ला करण्यास मगध राजाला पाठविले. तो प्रचंड हत्तीवर बसून आला आणि त्याने अभिमन्यूवर चाल केली

आज द्धाचा चौथा दिवस. भीष्मांनी शत्रुसैन्याचा अर्धा तरी विनाश करायचा निश्चय केला होता. त्यांना साथीला द्रोण, दुर्योधन, असे अनेक वीर होते. भीष्म अर्जुनावर चाल करून गेले. अर्जुनानेही वेळीच पाहून, त्यांना अर्ध्या वाटेवरच गाठले. अर्जुनाच्या मदतीला अभिमन्यू आला. द्रोण, विव्बिन्षति, कृप, शल्य, सोमदत्त, दुर्योधन यांच्याशी तो लढला. त्याच्यावर भूरीश्रवस्, अश्वत्थामा, शल्य, चित्रसेन आणि शाल्वाचा पुत्र यांनी हल्ला केला. त्याला धृष्टद्युम्न याने मदत केली. त्रिगर्त देशाचे सैन्य अर्जुनावर चालून आले. सुशर्मा आणि त्याचा पुत्र लढत होते. धृष्टद्युम्न अर्जुनाच्या मदतीला आला. कौरवांकडून कृप, कृतवर्मा आणि शल्य त्रिगर्तांना येऊन मिळाले. शाल्वपुत्र पण सामील झाला. धृष्टद्युम्नाने क्रोधित होऊन, गदेच्या प्रहाराने शाल्वपुत्राचे डोके फोडले. मग शाल्व रागाने धृष्टद्युम्नावर चालून आला. शल्यही त्याला मदत करत होता. शल्य व धृष्टद्युम्न यांच्यात घनघोर युद्ध झाले, हे पाहून अभिमन्यू धृष्टद्युम्नाच्या मदतीस आला. आता दुर्योधनाचे अनेक भाऊ युद्धात उतरले. भीम हे सर्व पाहत होता. ही लढाई समान ताकदीच्या योद्ध्यांमध्ये नाही हे त्याला कळले. तो धावत तिथे आला, कारण दुर्योधनाचे अनेक भाऊ त्याला एकत्र हवेच होते. दुर्योधनाला पाहून तर त्याने आपली गदा उंचावली. त्याला पाहून दुर्योधनाचे भाऊ भयभीत झाले. . अभिमन्यूने त्याच्या हत्तीला ठार केले. भीम तर सिंहासारखा लढत होता. त्याने कौरवांचे कित्येक हत्ती मारले. तांडव नृत्य करणार्‍या शंकरासारखा तो दिसत होता.

अचानक भीमाला जाणवले की आपण भीष्मांच्या समोर आलो आहोत. सात्यकी भीमाच्या मदतीला आला. कौरव राजपुत्रांना अलाम्बुश नावाचा राक्षस येऊन मिळाला, पण सात्यकीने त्याचा पराभव केला. भीम त्वेषाने लढत होता, त्याने गदेच्या फटक्याने दुर्योधनाचा एक भाऊ ठार केला. तो मनात म्हणाला, आता फक्त नव्याण्णव! नंतर एकामागून एक असे दुर्योधनाचे आठ भाऊ भीमाने काही क्षणात ठार केले. भीष्म सारे पाहत होते. ते म्हणाले, ”भीम आज खूप संतापला आहे. त्याने आणखी नुकसान करण्याआधी काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे! त्यांनी भगदत्ताला पाठविले. तो खूप कसलेला योद्धा होता. इतक्यस्स्व पर्ग्ज्योतीश राजाने फेकलेला एक भाला भीमाला लागून, तो मूर्च्छित झाला. आपला पिता पडला हे घटोत्काचाने पाहिले. तो धावून आला. भगदत्ताला घटोत्कच भारी पडला. भीष्म मग म्हणाले, आता भगदत्ताची सुटका करून घेणे भाग आहे. घटोत्कच तर बेभान होऊन कौरवांचे सैन्य नष्ट करत होता. भीष्म म्हणाले हा घटोत्कच इतका संतापला आहे, की त्याला आता रुद्र किंवा इंद्र पण पराभूत करू शकत नाही. सूर पण मावळतीस आला आहे आपण आपले सैन्य मागे घेण्यात आता शहाणपणा आहे. आपण उद्या पाहू. नेहमीपेक्षा कौरवांनी अगोदरच सैन्य मागे घेतले हे पांडवांच्या लक्षात आले. आजचा वीर घटोत्कच ठरला! त्याला युधिष्ठिराने आलिंगन दिले.

इकडे दुर्योधनाला काही केल्या झोप येईना. त्याचे आठ भाऊ त्याच्या डोळ्यांदेखत मारले गेले होते. त्याला भविष्यची चिंता लागली होती. त्याला दु:शासनाचा मृत्यू दिसू लागला! न राहवून तो भीष्मांच्या तंबूत गेला आणि म्हणाला, ”आजोबा मी खूप दु:खी आहे. तुम्ही, द्रोण, अश्वत्थामा, कृप, कृतवर्मा, भूरीश्रवस्, भगदत्त आणि विकर्ण एवढे सारे असताना माझे आठ भाऊ मारले गेले! तुम्ही ते टाळू शकत होता! रोज रोज पांडव कसे जिंकतात?

भीष्म हसून म्हणाले, ”इतके दिवस मी तुला हेच सांगत आलोय, आताही सांगतो, मनावर दगड ठेवून, युधिष्ठिराशी सलोखा कर! पांडवांना आता हरविणे शक्य नाही. अरे प्रत्यक्ष कृष्ण त्यांच्या बाजूने आहे. म्हणून पांडव अजिंक्य आहेत. तो विष्णूचा अवतार आहे आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी त्याने हा अवतार घेतला आहे. जोवर कृष्ण त्यांच्या बाजूला आहे, तोवर तेच जिंकणार! पण दुर्योधनाने ऐकून न ऐकल्यासारखे केले आणि तो तिथून निघून गेला. हे पाहून भीष्मांना वाईट वाटले.

सुरेश कुलकर्णी

9821964014