भारत, फुटबॉल आणि...
महा एमटीबी   06-Jun-2018
 
 
१४ जूनपासून सुरू होणाऱ्या ’फिफा वर्ल्डकप’मुळे भारत फुटबॉलमय होणार आहे. फुटबॉल म्हटले की रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी ही नावे सातत्याने कानावर पडतात. भारत आणि फुटबॉल म्हटले की, बायचुंग भुतियाचेच नाव पहिले डोक्यात येते. या ऊलट क्रिकेट म्हटले तर टीमची नावे तर माहित असतात, पण राखीव प्लेअर्स, कोच, बीसीसीआयचे अध्यक्ष, अम्पायरची नावे सर्व काही गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांना पक्के माहित असते. भारतात फुटबॉलसाठी जी ड्युरान्ड कप स्पर्धा घेतली जाते, ती जगातील जुन्या फुटबॉल स्पर्धांमधली तीन नंबरची स्पर्धा आहे. हेही आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.
  
भारताचा सध्याचा वलयांकित फुटबॉलपटू सुनील छेत्रीचा सोमवारी झालेला शंभरावा आंतरराष्ट्रीय सामना वेगळ्याच कारणासाठी चर्चेत राहिला. त्या सामन्यात भारताने केनियाचा ३-० असा पराभव केला आणि छेत्रीने दोन गोलही केले. आंतरखंडीय चषकनामक या स्पर्धेत तैवान आणि न्यूझीलंड हे इतर दोन संघ खेळत आहेत. मुळात अशी स्पर्धा सुरू आहे, याची कल्पनाच बहुसंख्य फुटबॉलप्रेमींना नव्हती, पण छेत्रीने ट्विटरच्या माध्यमातून मुंबईकर प्रेक्षकांना कळकळीचे आवाहन केले. टीका करा, नावे ठेवा, पण किमान सामना पाहायला तरी या ना, या त्यांच्या आवाहनाने कित्येकांच्या हृदयाची तार छेडली. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सानिया मिर्झा यांनीही साद घातल्यानंतर पावसाळी सायंकाळी मुंबईकरांनी फुटबॉल सामन्याला तुडुंब गर्दी केल्याचे अद्भुत दृश्यच पाहायला मिळाले, पण एकूणच ही घटना म्हणजे भारतीय फुटबॉलची दिशा आणि दशा दर्शवणारीही ठरली.
 
आपल्या देशातील बहुसंख्य फुटबॉलप्रेमी हे देशी नव्हे, तर परदेशी फुटबॉलचे चाहते आहेत. युरोपातील प्रमुख लीगमधील सामने पाहिल्यानंतर त्यांना आता पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे वेध लागलेले आहेत. त्या अर्थाने भारत हा नेहमीच फुटबॉलवेड्यांचा नव्हे, तर फुटबॉलप्रेमींचा देश राहिलेला आहे. बंगाल, केरळ, गोवा, ईशान्येकडील राज्यांमध्ये पूर्वापार व्यावसायिक फुटबॉल खेळला जातो. त्यातून गेल्या दशकात ‘आय लीग’ अर्थात व्यावसायिक भारतीय लीगचा प्रारंभ झाल्यानंतर मुंबई, पुणे, बंगळुरु, दिल्ली, चेन्नई या शहरांमध्येही उत्सुकतेपोटी का होईना, कोलकाता, कोची, पणजी, शिलाँगसारखी फुटबॉल सामन्यांना गर्दी होऊ लागली.
 
एखाद्या खेळाचा सर्वंकष विकास होण्यासाठी व्यावसायिकता आणि लोकप्रियता यांची वाटचाल हातात हात घालून व्हावी लागते. लोकप्रिय आहे, पण व्यावसायिक शाश्वती नाही, तर युवावर्ग आकर्षित कसा होणार? लोकप्रियता आणि व्यावसायिकतेची सांगड काही वर्षांपूर्वी ओएनजीसीसारख्या मातब्बर कंपनीच्या पाठबळावर सुरू झालेल्या आय-लीगच्या माध्यमातून घातली गेली होती. भारतीय फुटबॉलला खऱ्या अर्थाने एक ओळख निर्माण झाली होती. यातूनच राष्ट्रीय संघासाठी चांगले फुटबॉलपटू मिळण्याची शक्यताही निर्माण झाली होती. मात्र, त्यातून उमेद सरलेले, पेन्शनीतले आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू येऊन खेळू लागले आणि चमकू लागले. प्रेक्षक त्यांना पाहायला सामन्यांना गर्दी करू लागले. यातून भारतीय देशी फुटबॉलपटूंच्या प्रगतीचा आलेख पूर्णतः झाकोळला गेला. याचा परिणाम भारताच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील प्रगतीवरही झालेला दिसून येतो. क्रिकेटमधील आयपीएलची फुटबॉलमधील प्रतिकृती म्हणून 'इंडियन सुपर लीग’ आली आणि लोकप्रिय झाली. 'आय-लीग’साठी खेळाडू मिळेनात, पण ’सुपर लीग’साठी खोऱ्या ने खेळाडू जाऊ लागले. भारतीय फुटबॉलचा समतोल बिघडला, दिशाही चुकली. अशा परिस्थितीत ’सुपर लीग’साठीचे ‘पॅकेज टूर’वाले प्रेक्षक भारताच्या सामन्यांना कशाला गर्दी करणार? छेत्रीने ही परिस्थिती ओळखूनच ट्विटरवरून आवाहन केले. त्यातून एकदा प्रेक्षक आले, पुन्हा येतील का हे सांगता येत नाही. छेत्रीची अगतिकता ही भारतीय फुटबॉलची अगतिकता आहे. ती दूर करण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. अन्यथा भारतीय फुटबॉल आणि छेत्री यांचे भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित होईल. पुढील आठवड्यात ’फिफा वर्ल्ड कप सुरू होणार आहेच. त्याच आवडीने भारतीय फुटबॉल पाहिल्यास त्यातून नक्कीच देशालाही फायदा होईल.