कर्नाटकात "काला"च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
महा एमटीबी   06-Jun-2018

चित्रपटाला संरक्षण देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

 
 
 
 
नवी दिल्ली : प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते रजनीकांत यांच्या आगामी "काला" या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच या चित्रपट प्रदर्शनाप्रसंगी कोणतेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चित्रपटाला संरक्षण देण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाकडून कर्नाटक सरकारला देण्यात आले आहेत.
 
रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेला "काला" हा चित्रपट ७ जून २०१८ रोजी कर्नाटक राज्यात प्रदर्शित होणार आहे. कावेरी नदी जलवाटपावरुन तमिळनाडू कर्नाटक या राज्यातील वाद आणि त्यावर रजनीकांत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी कर्नाटका चेंबर ऑफ कॉमर्स या संघटनेकडून करण्यात आली होती. याविरोधात वंडरबार फिल्म्स निर्माते कंपनी रजनीकांत यांचे जावई धनुष आणि त्यांची मुलगी ऐश्वर्या यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
 
या याचिकेवर सुनावणी करताना कोणतेही राज्य चित्रपटांवर अशाप्रकारची बंदी घालू शकत नाही, असे स्पष्टीकरण देत सर्वोच्च न्यायलयाने ही बंदी मागे घेऊन चित्रपटाला संरक्षण देण्याचे आदेश आज दिले आहेत. त्यामुळे कर्नाटकातील तामीळ जनतेने आणि रजनीकांत यांच्या चाहत्यांनी सूटकेचा श्वास सोडला आहे.