मानव जन्माचं सार्थक
महा एमटीबी   06-Jun-2018 
 त्याग करणारा मानव, जीवनात असार काय आहे आणि सार काय आहे हे जाणून घेण्यासाठी साधना करणारा मानव, सत्याचा शोध लावून, असत्याची अभिलाषा न बाळगणारादेखील मानवच.
 
 
धार-उजेड, अज्ञान-ज्ञान, पाप-पुण्य या जोड्या जुळवून, त्यामधील अयोग्य व योग्य याची निवड करण्याची क्षमता मानवामध्ये आहे. चांगलं-वाईट, सत्यासत्य, सार-असार यामधून उत्तम, उदात्त, उत्तुंगतेकडे वाटचाल करणारा मानव हा एकमेव प्राणी आहे. अंधःकाराकडून उजेडाकडेे वाटचाल करण्याचा यशस्वी प्रयास करणारा मानव, अज्ञानाचा नाश करून, ज्ञानाची कास धरणारा मानव, पापाला प्रयत्नपूर्वक दूर सारून, पुण्याला जाणून घेऊन, त्याला जवळ करणारा मानव, अयोग्याला थारा न देता, योग्य गोष्टी जीवनात उतरवणारा मानव, चांगलं ग्रहण करून, वाईटाचा 

८४ लक्ष योनींमधील सर्वश्रेष्ठ योनी म्हणजे मानव योनी. भगवंताने शोध घेऊन, संशोधन करून, त्यानुसार आचरण करणारी योनी निर्माण केली. हा शोध घेण्याचा प्रवास म्हणजेच परमार्थ. समर्थ रामदासस्वामी सांगतात,

’विवेके क्रिया पालटावी’

समस्त सृष्टीमधून योग्य, चांगलं, सार, सत्य याची निवड करण्यासाठी विवेकाची गरज विवेक जागृत ठेवला की जीवनातील निद्रा संपुष्टात येते.

सद्विचार मग सदाचार आणि वासनांपासून निवृती आणि मग त्यामधून फुललेलं वैराग्य. वासनांचा क्षय होण्यासाठी साधना उपासना आवश्यक असते. वासना आणि षड्रिपू यांची दाट मैत्री! ही मैत्री मानवाला सत्यापासून फार दूर नेते. पापाकडे ओढते. अज्ञानाला जवळ करण्यास प्रवृत्त करते. त्यामुळे मूळ सुख प्राप्त न होता, दुःख पदरी पडतं. नाशाकडे नेऊन, विनाश घडवून आणणारी मैत्री काय कामाची?

सुविचारातून सदाचार घडण्यासाठी वासना व षड्रिपूंची मैत्री न करता, विवेकासह वैराग्याशी मैत्री करणं आवश्यक आहे. कशाचीही वासना निर्माण झाली नाही, की दुःखापासूनही निवृत्ती मिळते. सर्वत्र भरून उरलेल्या चैतन्याला जाणून घेण्यासाठी अंधार, अज्ञान, पाप, वाईट गोष्टींना थारा न देणं आवश्यक आहे. हे सहजसाध्य नाही. म्हणून भगवंताचं पूजन, अर्चन, नामस्मरण करणं गरजेचं आहे. भजन, कीर्तन, प्रवचन या त्रयीद्वारे भगवंताविषयी प्रेम निर्माण होतं. हळूहळू लौकिकातील गोष्टींचा हव्यास संपुष्टात येतो. भक्तीमध्ये रस निर्माण होतो. अखंड भक्ती साधली, की चैतन्यमय परमात्मा साध्य होऊ शकतो.

असाध्य ते साध्य करण्यासाठी नित्यनेमाची नितांत आवश्यकता असते. उत्तम गाणं गळ्यामधून येण्यासाठी नित्य रियाज करावा लागतो, तशाच असाध्य असणार्‍या परमात्म्याला जाणून घेऊन, त्याच्या प्राप्तीसाठी अखंड उपासनेचा, साधनेचा सराव करावा लागतो. प्रपंचामध्ये अडकून पडून, असार गोष्टीमागे ऊर फुटेपर्यंत धावून काहीही लाभ नसतो. मनाचं ‘न-मन’ साधलं, की नको त्या गोष्टीत मन रमतच नाही. मग आपोआप विरक्ती येते. जन्मापासून तो परमात्मा प्राप्त होईपर्यंत लौकिकाच्या निरर्थक पसार्‍यात न राहता, अर्थपूर्ण आयुष्य जगता आलं की झालं! खरी अर्थपूर्णता उपासनेमधून अंगी बाणवता येते.

संत तुकाराम महाराजांची बायकामुलं दुष्काळामुळे उपासमार होऊन, मृत्युमुखी पडली. वाण्याचा धंदा बुडाला, दिवाळं निघालं. तेव्हा तुकाराम महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडलेˆ

“बरे झाले देवा निघाले दिवाळे”

ते भगवंताला म्हणतात की, ”अरे, या लौकिकातील गोष्टींचं दिवाळं निघालं, ते चांगलंच झालं. त्यामुळे मला प्रपंचाची निरर्थकता जाणवली. परमार्थाची वाट चालण्यास सहाय्य मिळालं. खरी आशयघनता देवा तुझ्या चैतन्यरूपात असल्याची प्रचीती आली. तुझ्या नामात असलेली ताकद जाणवली. भंडारा डोंगरावर एकांतात साधना साधली. त्यामधला आनंद जाणवू लागला. प्रपंचातल्या नाशिवंत गोष्टींचा उबग आला. सर्वत्र तूच भरून उरल्याची जाणीव प्रगल्भ झाली. पांडुरंगा! तू अत्यंत दयाळू, स्नेहाळू, कृपाळू असल्याचा आनंददायी प्रत्यय येत गेला. तुझ्या कृपेनं अंतस्फूर्तीमधून अभंग स्फुरले. ते अभंग इंद्रायणीच्या पाण्यात अज्ञानी लोकांनी बुडवण्याचा प्रयास केला, परंतु तू प्रेमाचा सिंधू आहेस! सरितेमधलं चैतन्य साकार झालं आणि गाथा कोरडीच राहिली. लोक त्याला चमत्कार म्हणतात, परंतु तू भक्तांचा कैवारी असल्याची सुखद अनुभूती दिलीस!

परमात्मा परमेश्‍वराला अतीव समाधान झालं. ज्या हेतूने त्याने मानवी योनी निर्माण केली होती, तो हेतू पूर्ण झाला. अपूर्णाला पूर्णत्व प्राप्त करून देणार्‍या परमात्म्याचं सुंदर लेणं म्हणजे मनुष्य! अनेक अलौकिक गुणसंपदा मानवाला प्रदान करणारा परमात्मा! इतर कोणत्याही योनींमध्ये नसणार्‍या उत्तमता उत्तुंगता आणि उदात्तता या गुणांचा समन्वय मानवामध्ये समाविष्ट करणार्‍या परमात्म्याला परमानंद देण्यासाठी प्रत्येक माणसाने उपासना केली पाहिजे. उपासनेची कास धरली, की मानवाला मंगलमय परमात्मा भेटतो. भगवंत भक्त एकमेकांना उराउरी भेटले, की दोघांना साफल्याचा लाभ होतो. भगवंताला भक्ताशिवाय आणि भक्ताला भगवंताशिवाय चैन पडत नाही. दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. अपूर्णाकडून पूर्णत्वाकडे होणारा परिपूर्ण प्रवास म्हणजेच परमार्थ!

कौमुदी गोडबोले

9702117914