चिह्न निमित्त – निमित्त चिह्न भाग क्र. ९
महा एमटीबी   05-Jun-2018
 
बहुविध संबोधनानी अलंकृत देवी सरस्वती, चौथ्या–पाचव्या शतकापासून जैन धर्म साहित्यात फार महत्वाची देवता मानली गेली. देवीची शिल्पे-चित्रप्रतिमा-मूर्ती या बरोबरच देवीची आराधना-प्रार्थना-पूजा विधीच्या अनेक संकल्पना, आरत्या, स्तोत्र, मंत्र, सरस्वती चालीसा असे उत्तम साहित्य, संस्कृतसह, ब्राम्ही-पाली-अर्धमागधी-हिंदी अशा तत्कालीन भाषातून विपुलतेने उपलब्ध झाले. देवीच्या भक्तांसाठी सश्रद्ध प्रार्थना-आरत्या-गीते-स्तोत्र रचली गेली आणि विद्वान कवी आणि लेखकांनी देवीच्या स्तुतीकवनांच्या माध्यमातून तिचा महिमा सांगणाऱ्या रचना सर्व तत्कालीन भाषांमधे लिहिल्या.
 
देवीच्या संयुक्त प्रतिमेत अंकित केलेल्या अन्य सजीव-निर्जीव वस्तूंचे चिह्नसंकेत आणि सूक्ष्म चिह्नार्थ याची साक्षरता निरक्षर श्रद्धाळूला समजावी म्हणून या आरत्या-गीते-स्तोत्र रचनांमधे देवीच्या मूर्ती आणि सर्व विग्रह प्रतिमांमधे, देवीने धारण केलेल्या सर्व आयुधे-शास्त्र-चिह्ने-अवजारे यांचा संक्षिप्तरूपाने आणि विस्ताराने सुद्धा उल्लेख केला गेला. देवी महिमा आणि स्तुती रचनांच्या अशा भक्तीमार्गी ‘श्राव्य’ माध्यमातून श्रद्धाळू समाजाला देवी सरस्वती आणि तिच्या सर्व विग्रहांचा योग्य परिचय शतकानुशतके होत राहिला.
 
जैन साहित्यातील अशाच स्तुतीपर रचनांमधून २६ चिह्ने –
चिह्नसंकेतांच्या देवी संदर्भातील रूपकमुल्यांचा परिचय होतो. डोक्यापासून पायापर्यंत – शरीर अवयवांची आणि आयुधे-अलंकारांची संकेतमुल्य श्रध्दाळू भक्ताला ऐकता आली. मात्र एका गोष्टीची जाणीव ठेवायला हवी कि जैन साहित्यात आणि वेद-उपनिषदे अशा साहित्यातून उपलब्ध होणारे चिह्नसंकेत आणि चिह्नार्थ, यांत खूप भिन्नता आहे.
 
 
हिंदू धर्मातील आराध्य प्रमुख देवी-देवतांच्या शिल्प- मूर्ती आणि प्रतिमांमधे त्यांच्या शरीरमुद्रा चतुर्भज आहेत. या चार हातांचे चिह्नसंकेत आणि चिह्नार्थ प्राचीन जैन साहित्यात आणि संस्कृत उपनिषदांमधे विस्ताराने लिहिलेले आहेत. जैन मुनी आचार्य समन्तभद्र यांच्या सरस्वती देवीच्या स्तुती प्रार्थनेमधे तिच्या चार हातांना; प्रथमानुयोग, करणानुयोग, चरणानुयोग, द्रव्यानुयोग अशा चार अनुयोगांचे प्रतीक असा चिह्नार्थ संकेत दिला गेला आहे. हे चार अनुयोग म्हणजे जैनधर्म नीतिशास्त्रात वर्णन केल्यानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक-कौटुंबिक-सामाजिक पातळीवरील योग्य आचरण आणि सुसंस्कृत-संतुलित जीवनशैलीचे मार्गदर्शन करणाऱ्या चार प्रमुख ज्ञानशाखा. मात्र चिह्नार्थ संकेतांची वर उल्लेखित तुलना फक्त देवी सरस्वतीच्या प्रतिमेच्या संदर्भात आहे. देवीच्या सर्वशक्तिमान – सार्वभौमित्वाचे संकेत प्रतीक अर्थातच सजीवांच्या जाणीवेतील मानस – बुद्धी – अहंकार आणि चित्त असे देवीच्या चार हातांचे उपनिषदांमधील चिह्नार्थ संकेत, याचे सविस्तर विश्लेषण मागील लेखांत केलेच आहे.
 
देवीदेवतांच्या चतुर्भुज शरीरमुद्रेसंदर्भात, भारतीय मूर्तिशास्त्र एक सल्ला निश्चितपणे देते. मूर्ती कोणाची आहे, त्या देवीदेवतेची व्यष्टी वैशिष्ट्य काय आहेत, तिची उपासना कशासाठी केली जाते आहे, मूर्तीची स्थापना कुठे केली आहे, तिची शरीरमुद्रा कशी आहे, मूर्तीचे मुखदर्शन कुठल्या दिशेने आहे अशा अनेक गोष्टींचा संदर्भ घेऊनच, मूर्तीच्या हातांच्या चिह्नार्थ संकेतांचे विश्लेषण केले जाते. यातील प्रत्येक प्रतिमेत वेगळी आयुधे असल्यामुळे मूर्तीसापेक्ष अभ्यासाची इथे अपेक्षा असते. मूर्तीच्या अशा वैशिष्ट्यांमुळे मूर्तीना वेगवेगळी संबोधने प्राचीन भारतीय मूर्तिशास्त्रामधे दिली गेली. योगमूर्ती – भोगमूर्ती – वीरमुर्ती – उग्रमूर्ती – अभिसारिकामूर्ती अशी ही मूर्तींची संबोधने. याचा संकेतविस्तार पुढील लेखांमधे केला जाईल.
 
इतके विविध भावदर्शन आणि शरीरमुद्रा असणाऱ्या मूर्तींचे चार हात निश्चितपणे खूप भिन्न चिह्नसंकेत देत असतात. ब्रम्ह्देवापासून निर्माण झालेली ब्रम्हदेवाची सहचारिणी देवी सरस्वती, तिच्या चार हातामधून, पृथ्वीवरील सजीव+निर्जीव+वनस्पती+खनिजे यांचे वास्तव जीवन संतुलित ठेवणाऱ्या चार शक्तींचा संकेत देत असते. पहिल्या हातात सर्व समावेशक ब्रम्हाचा संकेत, दुसऱ्या हातांत पालनकर्त्या ईश्वराचा संकेत. प्रत्येक सजीवाला जन्मत: प्राप्त होणाऱ्या, तिसऱ्या हातात, या पृथ्वीलोकात जगण्यासाठी आवश्यक अशी मुलतत्व निसर्गत: आपल्याला देणाऱ्या हिरण्यगर्भाचा संकेत. हिरण्यगर्भ हे सूर्याचे एक विशेषण आहे. हे विज्ञानरूप असून, प्रत्येक सजीवाला निसर्गतःच प्राप्त होणारे ज्ञानस्वरूप आहे. देवीचा चौथा हात आपल्या पृथ्वीच्या पलीकडच्या विराट विश्वाच्या अस्तित्वाचा परिचय करून देतो. देवीच्या मूर्तीत चार हातांच्या संकेतातून, सजीवाला समजेल असा या अफाट विश्वाचा परिचय, आपल्या विद्वान पूर्वजांनी काही सहस्त्र वर्षांपूर्वी आपल्याला करून दिला.
 
 
उपनिषदांमधे देवीच्या चार हातांचे अन्य संकेतही उपलब्ध आहेत. जागृतावस्था – स्वप्नावस्था – सुशूप्तवस्था – तुर्यावस्था अशा सजीवांच्या जीवन – ज्ञान – वास्तव अशा जागृतीच्या चार अवस्था, या चार हातांचे संकेत आहेत. सजीवांच्या चार प्रवृत्ती किंवा मनोधारणा, सत्य – तप – दया – दान, या चार हातांचे चार संकेत आहेत. हेच चार हात, मैत्री – करूणा – मुदिता – उपेक्षा अशा चार महत्वाच्या मनोभावनांचे संकेत देत आहेत. सर्वांच्या परिचित पुरुषार्थाचे, काम – अर्थ – धर्म – मोक्ष या कुटुंबवत्सल गृहस्थाची चार कर्तव्ये म्हणजे हेच चार हात, असाही संकेत उपलब्ध आहे. चिह्न, चिह्नसंकेत, चिह्नार्थ विषयातील आपल्या पूर्वजांचा अचंबित करणारा प्रगल्भ अभ्यास, असाच आणि इतकाच या सर्व वर्णनाचा अंतिम निष्कर्ष काढायला हवा...!!
 
 

 
 
जगद्गुरू श्री आदी शंकराचार्यांनी आठव्या शतकांत स्थापन केलेल्या दक्षिनाम्नया श्री शृंगेरी मठातील श्री देवी शारदाम्बा अर्थात देवी सरस्वतीची सुंदर विग्रह प्रतिमा. निरखून पाहिले तर देवीची हि संयुक्त प्रतिमा आहे असे लक्षात येईल. देवीच्या संयुक्त प्रतिमांचा उल्लेख करताना आपण तिच्या प्रतिमेतील मोर, हंस, कमळ आणि वीणा यांच्या रूपकांचा संदर्भ पहिला. या प्रतिमेत, देवी शारदाम्बेच्या हातांत वीणा धारण केलेली नाही. देवीच्या पुढच्या डाव्या हातात पुस्तक, वरच्या डाव्या हातात कमंडलू, पुढचा उजवा हात आशीर्वाद स्वरूप आहे आणि वरच्या जपमाळ धारण केलेल्या उजव्या हातावर एक पोपट बसलेला आहे, असे लक्षात येईल. हा पोपट हे या संयुक्त प्रतिमेचे वैशिष्ठ्य आहे. फक्त शृंगेरी मठातील देवीची प्रतिमा अशा वैशिष्ट्याची आहे. प्राचीन हिंदू धर्म तत्वज्ञान आणि वेदांसह सर्व उपनिषदांमधे, चिह्नसंस्कृतीचा, चिह्नसंकेतांचा फार मोठा प्रभाव आहे असे अनुभवता येते. देवीच्या या प्रतिमेतील चिह्नसंकेत विलक्षण आहेत. पुढील वर्णनाचे कथन करणारा एक संस्कृत श्लोक सुद्धा आहे.
 
 
देवीच्या उजव्या हातातील जपमाळेकडे, त्याच हातावर बसलेला हा पोपट लक्षपूर्वक पहात असतो. प्रत्यक्षात हा पोपट सजीवांच्या अज्ञानाचे प्रतिक आहे. देवीच्या बोटांच्या नखांचा गुलाबी वर्ण, त्या सौम्य आवर्तने करणाऱ्या मोत्यांच्या जपमाळेवर परावर्तीत होऊन, पोपटाला ते मोती जणू डाळिंबाचे दाणेच असावेत असा भ्रम होतो. आपण हे दाणे कसे खावे याचा विचार पोपट करतो आहे हे, सर्वशक्तिमान – सर्वज्ञ देवीच्या लक्षांत येते आणि देवी सुहास्य मुद्रेने त्या अज्ञानी पोपटाकडे पहाते. यामुळे, देवीच्या शुभ्र दंतपंक्तीची प्रभा, त्या पोपटावर पडते. साक्षात देवी सरस्वतीचे सुहास्य मुखदर्शन झाल्यामुळे, त्या पोपटाचे म्हणजेच अज्ञानी सजीवाचे अज्ञान क्षणार्धात नष्ट होते आणि त्याला ज्ञान प्राप्ती होते. यामुळे डाळींबाच्या दाण्यांचा पोपटाचा मोह नष्ट होतो.
विद्याभ्यास, कलोपासना यात गांभीर्याने लक्ष केंद्रित केल्याने सजीवांना होणाऱ्या ज्ञानप्राप्तीमुळे मोहभावनेपासून मुक्त होऊन विवेकाची प्राप्ती निश्चित होतेच याचा हा विलक्षण चिह्नसंकेत...!!
 
 
 
 
अरुण फडके