मी हरणार नाही, माझी जागा मी सोडणार नाही...
महा एमटीबी   04-Jun-2018 

आजवरची साधना पुका घालणार नाही, मी हरणार नाही, मी ढळणार नाही, माझी जागा मी सोडणार नाही,’ असे म्हणत अनेक अपयश पचवून स्नेहलतेने आयुष्यात जागा मिळवलीच...
 
 

‘‘काय हो तुमच्या पाच मुली कशा नक्षत्रासारख्या सुंदर, पण तुमची ही स्नेहलता इतकी कशी काळी? तुम्हाला जबरदस्त हुंडा द्यावा लागेल. बुडवणार ही पोर तुम्हाला. कोण इतक्या काळ्या पोरीशी लग्न करेल?” त्र्यंबक स्वामींना एक नातेवाईक बोलत होता. हे सगळं चौथीत असलेली स्नेहलता ऐकत होती. आपला काळा रंग, आपण सुंदर नसल्यामुळे आई-बाबांना त्रास होतो. आपलं लग्न होणार नाही, झालंच तर भरपूर हुंडा गोळा करावा लागणार. स्नेहलताच्या इवल्याशा मनावर लोकांच्या टोमण्यांचे क्रूर ओरखडे उठले. तिने मरून जायचे ठरवले. ती धाय मोकलून रडू लागली. पण, तिच्या बाबांनी तिला जवळ घेतले. ते म्हणाले, “बाळ, रंगरूप आपल्या हातात नसते, पण आपले कर्तृत्व आपल्या हातात आहे. तू इतकी मोठी होशील की, लोकांना तुझ्या रंगरूपाबद्दल नाही, तर तुझ्या कर्तृत्वाबद्दल बोलताना गर्व वाटेल.” त्या दिवसापासून स्नेहलताने ठरवले की, आपण आयुष्यात काहीतरी करायचे.

प्रत्येक वर्षी ती शाळेत प्रथम क्रमांक मिळवायची. पुढे महाविद्यालयीन जीवनात ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची कार्यकर्ती म्हणून काम करू लागली. अभाविपच्या ‘प्रतिभा साहित्यसंगम’मध्ये तिच्या साहित्यिक प्रवृत्तीला धुमारे फुटू लागले. तिच्या स्वप्नांना ध्येयाचे पंख लागले. तिने डॉक्टर व्हायचे ठरविले. पुढे बारावीनंतर मेडिकलमध्येही तिचा प्रवेश निश्चित झाला, पण इतके पैसे आणायचे कुठून? बाबा तर ती चौथीत असताना शिक्षकी पेशातून निवृत्त झालेले. घर, आर्थिक परिस्थिती यथातथाच. शेवटी प्रथम क्रमांकाने मेडिकलमध्ये प्रवेश मिळवू इच्छिणार्‍या स्नेहलतेला नाईलाजाने डीएडला प्रवेश घ्यावा लागला. डीएडच्या दुसऱ्या वर्षी तेलंगणजवळच्या सांबय्या स्वामी या गुणवान तरुणाशी तिचा विवाह झाला. नववी शिकलेला आणि रिक्षा चालवणारा सांबय्या हा रा. स्व. संघाचा प्रचारक राहिलेला तरुण. त्याचे जीवन साधे, पण विचार उच्च होते.

 
आपल्या नवविवाहित पत्नीची बुद्धिमत्ता त्याने हेरली. त्याने सांगितले, “तुझी बुद्धिमत्ता अशी वाया जाऊ देणार नाही.” त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा फॉर्म आणला. तो भरला. स्नेहलताने त्याच वेळी लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायचे ठरविले. ती पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाली. मुख्य परीक्षेसाठी कुणीतरी सुचवले की पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये शिक. वर्षानुवर्षे साठविलेले पाच हजार घेऊन, सांबय्या आणि स्नेहलता पुण्याला ज्ञानप्रबोधिनीमध्ये आले. पण तिथे १९ हजार शुल्क भरायचे होते. काय करणार? परत जावे का? स्नेहलताने दुःख अनावर होऊन वडिलांना फोन लावला. म्हणाली, “बाबा, मी चौथीत असताना तुम्ही मला स्वप्न दिले की मला रंगरूप नसले, तरी मी कर्तृत्व सिद्ध करू शकते. पण कसे करू?” यावेळी बाबांनी साथ दिली. स्नेहलताने परीक्षा दिली. परीक्षा झाली आणि बातमी आली की ज्या केंद्रामध्ये स्नेहलताने परीक्षा दिली होती, त्या केंद्रामधील सर्वच विद्यार्थ्यांना सरकारने काही तांत्रिक अडचणींमुळे तपासणीप्रक्रियेतून वगळले होते. जीवाचा आटापिटा करून इथपर्यंत आलेल्या स्नेहलताच्या काळजाचे पाणी पाणी झाले. पण, तरीही तिने जिद्द सोडली नाही. पतीने तिला पुन्हा साथ दिली, पण प्रश्न स्नेहलताच्या नऊ महिन्यांच्या मुलीचा होता. तिला पुण्याला कसे घेऊन जायचे. स्नेहलतेच्या आईने हाही प्रश्न सोडवला. नातीला घेऊन ती गावी निघून आली आणि स्नेहलता पुण्याला.

पुढे स्नेहलता परीक्षेत पास झाली, मात्र मुलाखाती सोळा गुणांनी तिची पोस्ट गेली. त्या रात्री तीन वाजेपर्यंत स्नेहलता रडत होती. दुसर्‍या दिवशी पुन्हा लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार होती. प्रज्ञाबोधिनीच्या सचिन हिसवणकरांनी तिच्याशी संपर्क साधला आणि ते म्हणाले, “जिद्द सोडू नकोस. प्रयत्न का सोडतेस! कदाचित यश तुझ्या जवळ आले असेल.” त्यांच्या शब्दाखातर दुसर्‍या दिवशी स्नेहलताने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. पासही झाली. स्नेहलता मग पुन्हा नांदेडला परतली. तिथे खाजगी शिकवणी घेऊ लागली. तिला इंटरव्ह्यूसाठी बोलावणे आले. त्यावेळीही स्वामी दाम्पत्याकडे पाचशे रुपयेच होते, पण पुण्याच्या प्रवीण यांनी मदत केली. ज्ञानप्रबोधीनीचे सविता कुलकर्णी, विवेक कुलकर्णी तसेच आयएएस ऑफिसर अजित जोयी या सर्वांनी स्नेहलताच्या मुलाखातीची तयारी करून घेतली. साधी कॉटनची साडी नेसून, स्नेहलता इंटरव्ह्यूला गेली. मुलाखातकारांनी विचारले तुम्ही कविता करता. एखादी कविता वाचा. इतके प्रयत्न करूनही प्रत्येक वेळी माघार घ्यावी लागणाऱ्या स्नेहलताच्या मनातून कविता उमटली,

गौतमालाही सोसाव्या लागल्या झळा

बुद्ध होण्यासाठी...

माझाही पेटलाय दिवा आता

कटिबद्ध राहण्यासाठी...

ध्येय गाठण्यासाठी काळीज

दगडाचं करावं लागतं...

माझी धडपड कदाचित

तुम्हाला कळणार नाही...

पण मी हरणार नाही!

मी ढळणार नाही!

माझी जागा मी सोडणार नाही!

पुढची २१ मिनिटे स्नेहलतेची मुलाखत झाली. काही दिवसांत निकाल आला. स्नेहलता मुलाखतीत उत्तीर्ण झाली होती. ती आता नाब तहसीलदार नांदेड राजपत्रित अधिकारी झाली होती.

आपल्या यशाबद्दल बोलताना स्नेहलता सांगते, मी अभाविपची कार्यकर्ती आणि आता ‘सामाजिक समरसता मंच’ची कार्यकर्ती आहे, तर पती रा. स्व. संघाचे प्रचारक राहिलेले. त्यामुळे जीवनाला एक ध्येयशील आशावाद लाभला आहे. मला इतकेच कळते, की माझ्या देशातली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे आणि तिला जर माझ्याकडून काही मदत हवी असेल, तर ती मला करायलाच हवी. स्नेहलतेचे मनोगत आणि माणूस म्हणून स्नेहलतेच्या जीवनाचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.