ग्वाटेमालामध्ये ज्वालामुखीचा हाहाकार
महा एमटीबी   04-Jun-2018

२५ नागरिकांचा मृत्यू तर ३०० हून अधिक जखमी ग्वाटेमाला सिटी : मध्य अमेरिकेतील ग्वाटेमाला या देशामध्ये ज्वालामुखीच्या स्फोटामुळे तब्बल २५ नागरिकांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. तसेच अनेक जण बेपत्ता असून नागरिकांच्या शोधासाठी स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान ज्वालामुखीच्या आसपासच्या प्रदेशातील सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून जखमींवर उपचार सुरु करण्यात आले आहे.

ग्वाटेमालाची राजधानी असलेल्या ग्वाटेमाला सिटीपासून पश्चिमेकडे काही अंतरावर असलेल्या 'फ्युगो' या ज्वालामुखीचा काल अचानकपणे भीषण स्फोट झाला. या स्फोटाबरोबरच ज्वालामुखीमधून मोठ्या प्रमाणात राख आणि लावा बाहेर येऊ लागला. या भीषण स्फोटामुळे ज्वालामुखीमधील गरम कित्येक फुट उंचावर उडाली, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये दूरपर्यंत पसरली. याचवेळी ज्वालामुखीच्या पायथ्याजवळ पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांच्या अंगावरही राख पडल्यामुळे अनेक जण गंभीररित्या जखमी झाले. स्फोटानंतर लावा चहुबाजूला पसरल्यामुळे नागरिकांचा एकच गोंधळ उडाला होता. यामध्ये काही नागरिकांच्या गाड्या देखील लावामध्ये जळून गेल्याच्या तसेच राखेमध्ये देखील काही पर्यटकांच्या गाड्या अडकून पडल्याच्या घटना घडल्या.

यानंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने आपत्ती व्यवस्थापन विभागाला याठिकाणी तैनात करत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश दिले. तसेच जखमी नागरिकांना उपचारासाठी म्हणून रुग्णालयामध्ये दाखल करण्यास सांगितले. दरम्यान ज्वालामुखीमुळे विस्थापित झालेल्या नागरिकांसाठी मदत शिबिरे सुरु करण्यात आली असून सरकारतर्फे नागरिकांना सर्वप्रकारची मदत दिली जात आहे.

दरम्यान गेल्या महिन्यामध्येच प्रशांत महासागरातील हवाई बेटावरील एक ज्वालामुखीचा अशाच प्रकारे स्फोट झाला होता. तब्बल दोन आठवडे या ज्वालामुखीमधून लावा आणि राख बाहेर येत होती. परंतु सुदैवाने यामध्ये कसल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नव्हती. परंतु या स्फोटामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात जीवित तसेच वित्तहानी झाली आहे.