"कोल्हापूर पॅटर्न" राज्यात राबविणार : गिरीश बापट
महा एमटीबी   30-Jun-2018

 
 
कोल्हापूर : अन्न, वस्त्र,निवारा ही माणसाची मूलभूत गरज आहे. सर्वसामान्य गोरगरीबांना अन्न पुरविणे हे शासनाचे प्रथम कर्तव्य आहे. हेच पुण्याईचे काम कोल्हापूर जिल्ह्याने अत्यंत चांगल्या पध्दतीने केले असून, प्रत्येक गोरगरीबाला त्यांच्या दारापर्यंत धान्य पोहचविण्यात कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम राहिला. कोल्हापूर जिल्ह्याचे हे काम आता "कोल्हापूर पॅटर्न" म्हणून प्रसिध्द झाले आहे. हाच 'कोल्हापूर पॅटर्न' राज्यात राबववण्याची घोषणा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केली. कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉल येथे जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेमार्फत राज्यस्तरीय सन्मान मेळावा व Ae- PDS प्रणाली कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते.
 
 
 
यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, पुणे विभाग पुरवठा उपायुक्त निलीमा धायगुडे, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, राष्ट्रीय सचिव विश्वंभर बसू ,अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकान संघटनेचे अध्यक्ष डी. एम. पाटील, सचिव चंद्रकांत यादव आदी उपस्थित होते.