पावसाळा सुरू झाला, वाहन विमा आहे ना?
महा एमटीबी   28-Jun-2018

पावसाळ्यात वाहनांची साहजिकच सर्वाधिक काळजी घ्यावी लागते. त्यातही रस्त्यात पाणी साचल्यावर इंजिन खराब होणे, पूरपरिस्थितीत गाडीत पाणी शिरणे, रस्त्यावर पार्क केलेल्या गाडीवर झाड कोसळणे वगैरे अपघातही संभवतात. नुकतीच वडाळ्यालाही रस्ता खचून अशीच दुर्घटना घडली, ज्यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी झाली. तेव्हा, पावसाळ्याच्या काळात वाहनांच्या नुकसानीचा हा संभाव्य धोका वाहन विम्याच्या माध्यमातून निश्‍चितच कमी होतो. म्हणूनच आजच्या भागात वाहन विम्याचा पावसाळी अपघातांच्या दृष्टीने घेतलेला हा आढावा...

पावसाळ्याला तोंड देण्यासाठी वाहनमालक इंजिन, ऑईल, टायर इत्यादींची तपासणी करून घेतात, पण त्याचबरोबर वाहन विमा असणेही आवश्यक आहे. इंजिन दोषांपासून, वाहनात पाणी भरण्यापासून ते झाड पडण्यापासून संरक्षण देणार्‍या तरतूदीही विमा पॉलिसीत समाविष्ट करून घ्यायला हव्यात. या खास पावसापासून संरक्षण देणार्‍या तरतुदींमुळे सुमारे ३० ते ३५ टक्के नेहमीच्या प्रीमियमपेक्षा अधिक प्रीमियम द्यावा लागेल, पण चांगले संरक्षण मिळेल.

 

पावसामुळे तुंबलेल्या पाण्यात वाहन बराच काळ उभे राहिल्यास वाहनात पाणी शिरून इंजिन खराब होऊ शकते. तुंबलेल्या पाण्याची पातळी जर टायरच्या उंचीपेक्षा जास्त असेल, तर शक्यतो वाहन चालविण्याचा प्रयत्न करू नये. वाहन बंद करून ठेवावे. तसेच अशा परिस्थितीतील वाहन धक्‍का मारून चालू करण्याचा प्रयत्न करू नये. त्यामुळे वाहनाचे इंजिन व इलेक्ट्रिक सिस्टिम खराब होऊ शकते घसरत्या रस्त्यांवर तसेच उतरणीवर पावसाळ्यात वेगावर नियंत्रण ठेवावे व टायर सुस्थितीत आहेत ना, याची तपासणी करावी. वसाळ्यासाठी विमा कंपन्या जास्त प्रीमियम आकारून ’अ‍ॅड ऑन’ संरक्षण देतात.

 

इंजिन प्रोटेक्शन संरक्षण

नेहमीच्या वाहन विमा पॉलिसीत पाण्यामुळे इंजिन खराब झाल्यास दावा संमत होत नाही. जर तुम्ही नेहमी पाणी तुंबणार्‍या भागात राहात असाल तर तुम्हाला हे ‘अ‍ॅड ऑन’ संरक्षण घेतलेच पाहिजे. हे विमा संरक्षण घेतल्यानंतर पाण्यामुळे झालेले इंजिनचे नुकसान, पाण्यामुळे झालेले गिअरबॉक्सचे नुकसान, पाण्यामुळे झालेली इंधनाची गळती यांच्यामुळे झालेल्या नुकसानीचे दावे संमत होऊ शकतात.

 

रस्त्यावरील साहाय्य

(रोडसाईड असिस्टन्स)

वाहनचालकांसाठी हे आणखीन एक ‘अ‍ॅड-ऑन’ संरक्षण उपलब्ध आहे. ’बे्रकडाऊन’ होऊन तुमचे वाहन जर रस्त्यावर उभे असेल तर यावेळी हे ‘अ‍ॅड ऑन’ संरक्षण फार उपयोगी पडू शकते. अशा परिस्थितीत विमा कंपनीतर्फे वाहनांचे टायर बदलणे, छोट्या छोट्या दुरुस्त्या रस्त्यावर करून देतात. इंधन भरायची गरज असल्यास तेही भरून दिले जाते. वाहन तत्काळ व रस्त्यावर दुरुस्त होणे शक्य नसल्यास, तुमच्यासाठी पर्यायी वाहन उपलब्ध करून दिले जाते. टोईंग सेवा दिवसाचे २४ तास व आठवड्याचे सात दिवस उपलब्ध करून दिली जाते. शून्य घसारा (नील डेप्रिसिएशन)हे ‘अ‍ॅड ऑन कव्हर’ वाहनाच्या सुट्या भागाचा घसारा विचारात न घेता सुट्या भागाच्या पूर्ण रकमेचे संरक्षण देते. वाहनचालकाने वाहनातील प्लास्टिक, फायबर, रबर, काच यांचा नुकसानीमुळे दावा केल्यास पूर्ण रकमेचा दावा संमत केला जातो. यांचे घसारा मूल्य विचारात घेतले जात नाही. तसेच वाहन किती जुने आहे, हा मुद्दाही हा दावा संमत करताना विचारात घेतला जात नाही. नेहमीच्या विमा पॉलिसीत घसारा मूल्य लक्षात घेऊन दावा संमत करण्यात येतो. त्यामुळे दुरुस्तीवर झालेल्या खर्चापेक्षा विम्याचा दावा कमी रकमेचा संमत होतो. त्यामुळे वाहनचालकाने हे ’अ‍ॅड ऑन संरक्षण’ पाच वर्षांहून जुन्या वाहनांना देत नाहीत.

 

‘अ‍ॅक्सेसरिज संरक्षण’

हे संरक्षण घेतल्यास पावसामुळे केबिनमध्ये पाणी शिरून वाहनातली सिट कव्हर्स, एलईडी, म्युझिक सिस्टिम वगैरे नादुरुस्त झाली तर यांची नुकसानभरपाई मिळू शकते.

 

रिटर्न टु इनव्हॉईस

हे संरक्षण जर वाहन पूर्ण नादुरुस्त आहे, दुरुस्त होण्यापलीकडे गेलेले आहे, समजा वाहनावर झाड पडून वाहनाचे पूर्ण नुकसान झालेले आहे तर अशाची नुकसानभरपाई ’रिटर्न टु इनव्हॉईस’ या ‘अ‍ॅड ऑन कव्हर’ने मिळू शकते. यात वाहनाची एक्स शोरूम किंमत व इन्शुअर्ड डिक्‍लेअर्ड व्हॅल्यू यात रजिस्ट्रेशन शुल्क, रोड टॅक्स, विम्याचा हप्ता वगैरे समाविष्ट करून जी रक्‍कम येईल ती रक्कम व एक्स शोरूम रक्कम यातील जो फरक असेल ती रक्‍कम दावा म्हणून संमत केली जाईल. इंजिनात नादुरुस्ती झालेले दावे विमा कंपन्या फार मोठ्या प्रमाणावर नाकारतात. हा दावा वादविवादाचा विषय शकतो. वाहन चालकाने पाण्याने इंजिन खराब होऊ नये म्हणून योग्य काळजी घेतली होती, हे त्याला सिद्ध करावे लागते. समजा, वाहनचालक तुंबलेल्या पाण्यात वाहन चालवित असेल व पाणी एअर इन्टेक सिस्टिममधून इंजिनात शिरले व त्यामुळे वाहनाला हैड्रोस्टॅस्टिक लॉक बसले तर विमा कंपन्या हा अपघात समजून, दावा संमत करतील. वाहन पार्क केलेले आहे व तेथे पावसामुळे पाणी तुंबले असताना वाहनचालकाने वाहन सुरू करण्याचा बर्‍याच वेळा प्रयत्न केला व त्यामुळे पाणी आत शिरून इंजिन खराब झाले तर अशा परिस्थितीत विमा कंपनी दावा संमत करणार नाही. कारण, वाहनचालकाच्या निष्काळजीमुळे इंजिन खराब झालेले आहे. इंजिन नक्की कशामुळे खराब झाले, याचा निष्कर्ष काढणे विमा कंपन्यांना फार कठीण जाते. वाहनचालकाने पावसाळ्यात शक्यतो सुरक्षित जागी वाहन पार्क करावे व पाणी बर्‍यापैकी ओसरल्यावर परत परत वाहन चालू करण्याचा प्रयत्न करू नये.

 

‘अ‍ॅड ऑन संरक्षण’ घेतल्यामुळे किती जास्त प्रीमियम भरावा लागतो?

याचे उदाहरण द्यायचे तर मारुती स्विफ्ट एल एक्स आय २०१८ या वाहनाची नेहमीच्या विम्याच्या प्रीमियमची रक्कम १२ हजार ४७५ रुपये असून अ‍ॅड ऑन संरक्षण घेतल्यास जीएसटीसह १५ हजार ९०९ रुपये प्रीमियम भरावा लागेल. होडा अमेझ ई पेट्रोल २०१८ या कारचा नेहमीच्या पॉलिसीचा प्रीमियम १३ हजार ६१७ रुपये असून ‘अ‍ॅड ऑन’ संरक्षण घेतल्यास जीएसटीसह प्रीमियम १७ हजार ८४७ रुपये पडतो. त्यामुळे रुपयांच्या वाहनांचे नुकसान झाल्यास योग्य तरतुदी असलेले विमा संरक्षण असल्यास वाहनचालकाचे निदान आर्थिक नुकसान तरी कमी होऊ शकते.