बीईंग अतुलनीय!
महा एमटीबी   28-Jun-2018
मराठी माणसाने सातासमुद्रापार झेंडा रोवल्याची तशी अनेक उदाहरणे. त्यापैकीच एक म्हणजे अतुल गावंडे. तीन आघाडीच्या कंपन्या एकत्र येऊन सुरु करणार असलेल्या आरोग्य कंपनीच्या प्रमुखपदी त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

 

बर्कशायर हॅथवे, अॅमेझॉन.कॉम आणि जे. पी. मॉर्गन चेस या जगातील तीन आघाडीच्या कंपन्या एकत्र येऊन नवीन आरोग्य कंपनी सुरू करणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी झळकली. या तीन दिग्गज कंपन्या एकत्र येऊन आरोग्य क्षेत्रात काहीतरी नवीन करणार आहेत, पण विशेष म्हणजे त्याची जबाबदारी ही एका मराठी माणसाच्या खांद्यावर असणार आहे. मग कोण आहे ही मराठीमोळी व्यक्ती? जागतिक व्यापारातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या या कंपन्यांनी आणि याच व्यक्तीची निवड का केली?

 

अमेरिकेत बोस्टन शहरात या आगामी कंपनीचे कार्यालय असेल. या कंपनीच्या स्थापनेमागे खोऱ्याने नफा कमावण्याचा उद्देश नसल्याचेही तिन्ही कंपन्यांनी प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट केले आहे. आपल्या अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना कमी दरात चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, हा नव्या कंपनीच्या स्थापनेमागे उद्देश. या नव्या कंपनीच्या प्रमुखपदी असलेली ती मराठी व्यक्ती एंडोक्राईन शस्त्रक्रियेत तज्ज्ञ आहे, लेखकही आहे तर ती व्यक्ती आहे अतुल गावंडे.

 

कंपनीच्या प्रमुखपदी या अतुल यांची निवड करण्यात आली आहे. अतुल गावंडे हे वैद्यकीय क्षेत्रात प्राध्यापक म्हणून कार्यरत असून आरोग्य क्षेत्रातील गैरप्रकारांवर त्यांनी नेहमीच टीका केली आहे. ‘बीईंग मॉर्टल’ हे त्यांचे पुस्तक चांगलेच गाजले. म्हातारपण आणि मृत्यू या दोन्हींविषयी आपल्याला भीती असते आणि अतुल यांनी त्यांच्या या पुस्तकात वाढत्या वयाचे आणि अटळ मृत्यूचे आपल्याला भेडसावणारे मुद्दे स्पष्टपणे, पण तितकेच हळुवारपणे मांडले आहेत. शास्त्रीय अभ्यासांचे दाखले आणि आकडेवारी आपल्याला विचारप्रवृत्त करते आणि सोबतच अनावश्यक भीतीसुद्धा कमी करते. त्यामुळे स्वतःच्या म्हातारपणाचे काल्पनिक चित्र समोर उभं राहण्याऐवजी आपलं लक्ष महत्त्वाच्या मुद्द्यांकडे केंद्रीत होते.

 

डॉ. अतुल यांचा जन्म अमेरिकेतील असला तरी भारतीयत्वाची नाळ कायम जोडून ठेवणारे ते मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडजवळच्या उटीचे. या गावातील पहिले डॉक्टर होण्याचा मान अतुल यांचे वडील आत्माराम गावंडे यांनी मिळवला. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या गावंडेंनी उच्च शिक्षणासाठी अमेरिका गाठली व तिथेच ओहायो प्रांतात स्थायिक झाले. ऑक्सफर्डमधून पदवी, तर हार्वर्डमधून ‘लोक आरोग्य’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले डॉ. अतुल पहिल्यांदा प्रकाशझोतात आले, ते त्यांनी लिहिलेल्या एका लेखामुळे. वैद्यकीय क्षेत्रातील नफेखोरी, असा त्यांच्या लेखाचा विषय होता. या लेखाने अमेरिकेत एकच खळबळ उडाली. वाद-प्रतिवाद झडले. त्यापासून प्रेरणा घेत डॉ. अतुल यांनी याच विषयावर भविष्यात अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.

 

वैद्यकीय उपचाराचा दर्जा व खर्चाचे प्रमाण व्यस्त कसे? यावर संशोधन करत त्यांनी ‘सर्जिकल कॉम्प्लिकेशन’ यासह अनेक पुस्तके लिहिली. आधी ‘न्यूयॉर्क’ व नंतर ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये त्यांनी चालवलेली सदरे कमालीची लोकप्रिय ठरली. डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते अल् गोर यांनी त्यांना राजकीय वर्तुळात आणले. एका निवडणुकीत त्यांचे स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या अतुल यांना बिल क्लिटंन यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांच्या प्रशासनात आरोग्यविषयक सल्लागार म्हणून नेमले. अमेरिकेत नाव कमावले तरी गावंडे कुटुंबाने भारताशी नाते कायम ठेवले. त्यांच्या वडिलांनी उमरखेडला ३० वर्षांपूर्वी गोपिकाबाई गावंडे महाविद्यालय सुरू केले. त्याच्या उभारणीत अतुल यांचे मोठे योगदान राहिले आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. तरीही ते नियमितपणे या शिक्षणसंस्थेला भेट देत असतात. या संस्थेतील विद्यार्थ्यांना ‘रोटरी एक्स्चेंज प्रोग्राम’च्या माध्यमातून अमेरिकेतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून देणे, ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जगाशी जोडणे असे अनेक प्रयोग डॉ. अतुल यांनी उमरखेडच्या संस्थेत सुरू केले आहेत. मामा डॉ. यादव राऊत यांच्या समन्वयातून त्यांनी या तालुक्यातील काही आरोग्य केंद्रांत वैद्यकीय उपचारासाठी अत्याधुनिक सोयीसुद्धा उपलब्ध करून दिल्या आहेत. आरोग्यविषयक प्रश्नावर ‘स्लेट’ या ऑनलाईन मासिकासाठी अजूनही नियमित लेखन करणाऱ्या अतुल यांनी भारतातील अनेक वैद्यक परिषदांनासुद्धा हजेरी लावली आहे. अॅमेझान, बर्कशायर हॅथवे व जे. पी मॉर्गन चेस या तीन कंपन्यांनी एकत्र येत आरोग्य क्षेत्रासाठी स्थापन केलेल्या कंपनीचे प्रमुख म्हणून येत्या जुलैमध्ये सूत्रे स्वीकारल्यानंतर कमी पैशात चांगली उपचारपद्धती उपलब्ध करून देण्याचे आव्हान डॉ. गावंडे यांच्यासमोर असणार आहे. तेव्हा, त्यांना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी भरपूर शुभेच्छा..