युद्धाचा सातवा दिवस !
महा एमटीबी   27-Jun-2018इकडे द्रोणांचे धनुष्य विराटाने मोडून टाकले. त्यांच्या ध्वजाचेही तुकडे केले. नंतर द्रोणांचा सारथीदेखील मारला. द्रोणांनीदेखील विराटाच्या सारथ्यास मारून टाकले.


अभेद्य अशी वर्तुळाकार व्यूहरचना भीष्मांनी केली होती तर युधिष्ठिराने अर्जुनाला सांगितलं वज्राकार व्यूहरचना कर. हीदेखील भेद करायला कठीण अशी रचना होती. गुरू द्रोण विराट आणि द्रुपद यांच्यावर चालून गेले. अश्वत्थाम्याने शिखंडीवर हल्ला केला. दुर्योधन आणि धृष्टद्युम्न यांच्यात युद्ध सुरू झाले. नकुल सहदेव शल्यमामांशी लढू लागले. विंद अनुविंद अर्जुनास भिडले. भीम आणि कृतवर्मा यांची जुंपली. अभिमन्यू तर चित्रसेन, विकर्ण आणि दु:शासन यांचा समाचार घेत होता. भगदत्त आणि घटोत्कच यांची जुंपली. अलाम्बुश याच्याशी सात्यकी भिडला. भूरीश्र्वास आणि धृष्टकेतु लढत होते तर श्रुतायुशी युधिष्ठिर लढत होता. कृप आणि चेदिराज यांची पण जुंपली. आज एकमेकांशी द्वंद्व युद्ध करण्याचाच दिवस होता जणू! अर्जुन कृष्णाला म्हणाला, “भीष्मांनी मुद्दाम अशी रचना केली आहे की, आपले खूप सैन्य मारले जाईल. पण मी त्या त्रिगर्त बंधूंना सोडणार नाही,” असे म्हणून त्याने त्रिगर्तांवर बाणांचा वर्षाव केला. त्याने ऐन्द्रास्त्र नावाचे अस्त्र सोडले. त्यामुळे काही क्षणांतच त्यांचा व्यूह मोडला गेला. त्रिगर्ताला माघार घ्यावी लागली. हे पाहून भीष्म अर्जुनावर चाल करून गेले. दुर्योधन अर्जुनाचा पराक्रम पाहून अस्वस्थ झाला. त्याने सुशर्मास भीष्मांच्या मदतीला पाठविले. भीष्मांनी अर्जुनावर हल्ला केला. भीष्म आणि अर्जुन यांचे घमासान युद्ध झाले.

 

 विराटाच्या मदतीला त्याचा पुत्र संख्या आला, पण द्रोणांनी सोडलेला बाण त्याच्या चिलखतात घुसून तो पडला. आपल्या पुत्राचे मरण पाहून विराट क्रुद्ध झाला. त्याचा तिसरा पुत्र या युद्धात मारला गेला, पण द्रोणाच्या पुढे तो असमर्थ होता आणि निघून गेला. द्रोणांनी आपला संहार चालूच ठेवला.

 

अश्वत्थामा आणि शिखंडी यांचे युद्धदेखील चालूच होते, शिखंडीने अश्वत्थाम्याच्या कपाळावर तीन बाण सोडून त्याला जखमी केले. तो संतापला आणि त्याने शिखंडीच्या सारथ्यास मारून टाकले. घोडे पण मारले. शिखंडी खाली उतरला आणि तलवार गरगर फिरवत लढत राहिला. अश्वत्थाम्याचे सारे बाण त्याने तलवारीने बाजूला केले. शेवटी उडी घेऊन तो सात्यकीच्या रथावर गेला.  सात्यकी आणि अलाम्बुश यांचे घमासान युद्ध झाले. अलाम्बुश माया तंत्रात निष्णात होता, त्याने ते वापरले, पण सात्यकीपुढे त्याचे काही चालेना. त्याने इंद्रास्त्र सोडून अलाम्बुशाचे मायातंत्र मोडून काढले. मग अलाम्बुश पळून गेला. दुर्योधन आणि धृष्टद्युम्नाच्या लढाईत दुर्योधनाच्या रथाचे तुकडे झाले. तेव्हा शकुनी दुर्योधनाच्या मदतीस आला. तरीही धृष्टद्युम्नाने दुर्योधनाचा पराभव केला.

 

भीम व कृतवर्मा यांचे युद्ध चालू होते. भीमाने त्याचा रथ तोडला व घोडे मारून टाकले. ध्वज खाली पाडला. त्यामुळे त्याला माघार घ्यावी लागली. एकूणच पांडवांची सगळीकडे सरशी होत होती. भगदत्त आणि घटोत्कच यांचे युद्ध खूप वैशिष्ट्यपूर्ण होते. भगदत्ताने घटोत्कचाच्या रथाचे घोडे मारून टाकले. यावरून तो संतापला आणि त्याने आपला भाला जोरात फेकला.

 

शल्यमामा आपले भाचे नकुल आणि सहदेव यांच्याशी लढत होता. ते अतिशय छानच लढत आहेत, हे पाहून तो मनातून सुखावला होता पण त्याने नकुलाचा ध्वज खाली पाडला व नंतर त्याचे घोडे व सारथी यांनाही ठार केले. त्यामुळे नकुल सहदेवाच्या रथात चढला. सहदेव आपल्या मामावर खूप क्रोधित झाला. त्याने एक भाला मामांकडे फेकला व त्याचा फटका बसून शल्य बेशुद्ध झाला. त्याचा रथ मग दुसरीकडे नेला.

 

भर माध्यान्हीची वेळ होती. युधिष्ठिर श्रुतायुशाच्या दिशेने चाल करून गेला. त्याने श्रुतायुशाचे घोडे ठार मारले. त्यामुळे भिऊन तो रणांगणातून पाळूनच गेला. युधिष्ठिर कौरव सैन्याचा विनाश करत राहिला. चेदिराजाने कृपाचा पराभव केला. अभिमन्यूशी दुर्योधनाचे तीन भाऊ लढत होते. अभिमन्यूने त्यांचा पराभव केला, मात्र त्यांना ठार मारले नाही कारण, त्याला आपल्या काकांनी, भीमाने घेतलेली शपथ आठवली. मग अभिमन्यूसमोर भीष्म स्वत: आले. ते पाहून अर्जुन कृष्णाला म्हणाला, “आजोबांना या तरुण सिंहाशी युद्ध करणे जड जाईल!” अर्जुनासमोर सुशर्मा आला, दोघांची घमासान लढाई झाली. त्रिगर्त बंधू पण अर्जुनावर चाल करून आले. अर्जुनाने सुशर्माच्या अनेक सहायकांना ठार केले.

 

भीष्म हसत हसत आपल्या नातवांशी युद्ध करत होते. पांडूपुत्रांचा त्यांना अभिमान वाटत होता. ते त्यांच्या शौर्याची वाखाणणीच करत होते. भीष्मांनी युधिष्ठिरावर आपले लक्ष केंद्रित केले. नकुल-सहदेव आणि युधिष्ठिर तिघेही भीष्मांशी लढत होते. त्यांनी युधिष्ठिराचा रथ निकामी केला. म्हणून युधिष्ठिर नकुलाच्या रथात आला, पण ते तिघेही भाऊ भीष्मांपुढे फिक्के पडत होते. त्रिगर्त बंधूंनी अर्जुनाला घेरा घालून व्यस्त केले होते. त्यामुळे तो भीष्माकडे येऊ शकला नाही. इतक्यात सूर्य मावळला आणि युद्ध थांबले. युधिष्ठिर भीष्मांचे काय करावे, या चिंतेत तंबूत परतला कारण शिखंडी समोर आला की भीष्म तोंड फिरवून दुसरीकडे जात होते. त्यामुळे शिखंडीदेखील चिडला होता. त्याला आपली पूर्वीची अंबा आठवत होती. आपला सूड घेण्यास अंबा उत्सुक होती. तो स्वत:शीच म्हणाला, “कदाचित उद्या मला भीष्मांना ठार मारता येईल. मी त्या संधीची वाट पाहत आहे.”

 

- सुरेश कुळकर्णी