टपाल तिकिटांच्या संग्रहाची षष्ट्यब्दीपूर्ती
महा एमटीबी   27-Jun-2018अजूनही पोस्टाची तिकिटे जमा करण्याचा छंद जोपासणाऱ्यांपैकी एक व्यक्तिमत्त्व नाशिकमध्ये आहे. शांतीलाल फकीरचंद हिरण हे त्यांचे नाव.

 

एकेकाळी शाळेत शिकविताना मुलांना एक तरी छंद असावा, असे सांगितले जात असे. त्यावेळी हमखास उदाहरण दिले जात असे, ते पोस्टाच्या तिकिटांचा छंद जोपासण्याचे. पण, सध्याच्या डिजिटल जमान्यात एकूणच टपालसेवेचे महत्त्व नगण्य झाले आहे. त्यामुळे पोस्टामार्फत येणारी पत्रे आणि पाकिटे यांचे प्रमाण जवळजवळ शून्यावर आले आहे. मात्र, अजूनही पोस्टाची तिकिटे जमा करण्याचा छंद जोपासणाऱ्यांपैकी एक व्यक्तिमत्त्व नाशिकमध्ये आहे. शांतीलाल फकीरचंद हिरण हे त्यांचे नाव. पेठे विद्यालयाजवळ असलेल्या दुकानात शुद्ध देशी तूपविक्रीचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. त्यांचे खापरपणजोबा राजस्थानातील जोधपूर जवळील बिसलपूर या मूळ गावाहून १८९२ च्या सुमारास नाशिकला आले. त्यांनी किराणा आणि अन्य व्यवसाय सुरू केले. त्यानंतर त्यांचे आजोबा शुद्ध तुपाचा व्यवसाय करू लागले. सध्यादेखील शांतीलालजी हा व्यवसाय करीत आहेत.

 

वास्तविक पाहता, त्यांचे व्यापारी कुटुंब. पण मग हा पोस्टाची तिकिटे जमवण्याचा छंद कसा लागला? कारण, यात पैसे मिळण्यापेक्षा गमवावे लागण्याची शक्यता जास्त. याबाबत विचारले असता ते सांगतात की, “लहानपणी दूरदूरहून तांदूळ, गहू, ज्वारी आदी माल यायचा. त्यावेळी पत्रव्यवहारदेखील होत असे. शाळेत इयत्ता पाचवीत असताना पोस्टाच्या तिकिटांचे आकर्षण वाटू लागले. त्यातून मग हा छंद वाढीस लागला. परदेशी पत्रे शरणपूर भागातील लोकांकडे येत असत. त्यावर परदेशातील तिकिटे चिकटविलेली असत. त्यांना मागितल्यावर ते फुकट देत असत. त्यात वेगळीच मजा वाटत असे.” १९५२ नंतर तीन पैसे, पाच पैसे अशी भारतीय तिकिटे मिळू लागली. तेव्हापासून अद्याप वयाच्या ७१ व्या वर्षीही शांतीलालजींनी हा छंद जोपासला आहे. तब्बल ६० वर्षे असा छंद जोपासणारे हिरण यांनी जवळपास ३५ हजार तिकिटे जमविली. हे कार्य जगावेगळेच म्हणावे लागेल. कारण, कोणाचे तरी पाहून असा छंद सुरू करणे तसे कठीण नाही. तसा प्रयत्न अनेकांनी केला होता. मात्र, थोड्याच वेळात लोक या छंदाची कास सोडण्याची अनेक उदाहरणे आहेत.

 

पहिले पोस्टाचे तिकीट निघाले ते ६ मे १८४० रोजी. या तिकिटावर ब्रिटनच्या राणी व्हिक्टोरिया यांचे चित्र होते. वृत्तपत्रावरदेखील पोस्टाची तिकिटे काढण्यात आल्याची मनोरंजक माहिती त्यांनी दिली. हिरण यांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी हा छंद जोपासताना ज्या विषयाची तिकिटे आहेत, त्या विषयाशी संबंधित व्यक्तींना भेटून त्या तिकिटाजवळ त्यांच्या स्वाक्षऱ्या जमा केल्या आहेत. त्यासाठी काही मान्यवर नाशिकला आलेले असताना त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत, तर काहींना भेटण्यासाठी त्यांनी दूर दूर भ्रमंती केली आहे. अशा मान्यवरांमध्ये १०० व्यक्तींचा समावेश आहे. उदाहरणार्थ, मास्टर दीनानाथ यांच्यावरील पोस्टाचे तिकीट काढण्यात आले, तेव्हा त्यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, मीना मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर यांच्या त्यावर सह्या घेतल्या. राष्ट्रपती भवनाशी संबंधित तिकिटाजवळ त्यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची स्वाक्षरी घेतली आहे. क्रिकेटशी संबंधित तिकिटाजवळ क्रिकेटपटू अजित वाडेकर, सुनील गावस्कर, अशोक मांकड, तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या तिकिटाजवळ त्यांनी ललिता शास्त्री आणि शास्त्री यांचे चिरंजीव यांच्या स्वाक्षऱ्या मिळविल्या आहेत. यात माजी राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा, प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण अशा अनेकांचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी या मान्यवरांचे सही करतानाचे फोटोदेखील घेतलेले आहेत. यामुळे या संग्रहाचे महत्त्व अधिकच वाढलेले आहे.

 

हा छंद जोपासण्यासाठी जिल्हा, राज्य (महापेक्स) आणि राष्ट्रीय स्तरावर भरणाऱ्या पोस्टाच्या तिकिटांच्या प्रदर्शनांना त्यांनी पदरमोड करून भेटी दिल्या. मुंबई, दिल्ली, नागपूर अशा अनेक ठिकाणी त्यांनी भटकंती केली. या छंदासाठी त्यांनी थेट भूतान गाठले आणि तेथे जाऊन तेथील राजाची स्वाक्षरी आपल्या संग्रहात जोडली. नाशिकला ‘नापेक्स’ हे प्रदर्शन भरविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. ‘फिलाटेलिक अॅगण्ड मेस्मॅटिक सोसायटी’ची स्थापना त्यांनी केली. त्यांच्यामुळे शेकडो व्यक्तींना या छंदाची गोडी निर्माण झाली.

 

गेल्या २० वर्षांत मोबाईल, ई-मेल, कुरिअर यामुळे हल्ली पोस्टाच्या तिकिटांचा वापर कमी झाल्याने या छंदाचे स्वरूप बदलले आहे. तिकिटे अमर्याद असल्याने एखादा विषय घेऊन त्या विषयाची तिकिटे जमविली जातात. उदाहरणार्थ, ’डॉग्ज’ या विषयावरील तिकिटे हिरण यांनी जमविली. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त झाले. 'रेड क्रॉस’ या विषयावरील तिकिटेदेखील त्यांनी जमविली आहेत. फुले, पक्षी, प्राणी, जागतिक नेते असे अनेक विषय सांगता येतील. परदेशी तिकिटे आता कमी झाली असून त्याची जागा भारतीय तिकिटांनी घेतली आहे. या छंदातून खूप माहितीदेखील मिळते. भारतीय स्वातंत्र्ययुद्धाला १८५७ मध्ये प्रारंभ झाला, असे आपण मानतो. मात्र, त्यापूर्वी १७५७ मध्ये या स्वातंत्र्ययुद्धाला सुरुवात झाल्याचे पुरावे असून त्याचे तिकीटदेखील आहे, असे हिरण यांनी संगितले. भावी काळात आपल्या या छंदाची माहिती सर्वांना होण्यासाठी एक पुस्तक लिहिण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. याबरोबरच एखादी जागा घेऊन तेथे ही तिकिटे आणि अनुषंगिक साहित्य ठेवले तर छोटेखानी संग्रहालय देखील होऊ शकते. भावी काळात तर पोस्टाच्या तिकिटांचा वापर आणखी कमी होणार आहे. अशा स्थितीत हा संग्रह म्हणजे इतिहासाची माहिती देणारा मोठा ठेवा ठरू शकतो.

- पद्माकर देशपांडे