डिजिटल इंडिया आणि गुगलचं प्रॉडक्ट
महा एमटीबी   25-Jun-2018


 

 

 
माध्यमांच्या लोकशाहीकरणाचा पुरेपूर फायदा जावदने घेतला. इंटरनेटसारखी शक्ती खूप लवकर मिळाल्याने त्याने व्यवसाय सुरू केला. आज त्याच्यामुळे अनेक जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

केरळमध्ये एका हमालाने रेल्वेस्थानकावरील वायफाय वापरून अभ्यास केला आणि सरकारी नोकरी मिळवली. श्रीनाथ के असे त्या हमालाचे नाव. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती वाचत असे. त्यासाठी त्याला एक रुपयाही मोजावा लागला नाही. स्थानकांवर गुगल संस्थेने या मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे हे शक्य झाले. त्यापेक्षाही महत्त्वाची होती त्याची जिद्द. आपल्याकडे काय यंत्रणा उपलब्ध आहेत आणि संधी मिळवण्यापेक्षा संधी निर्माण करून त्याचे सोने करण्याकडे त्याचा कल होता. केरळमधल्याच एका २१ वर्षाच्या युवकाने गुगलची मदत घेऊन वार्षिक दोन कोटी उलाढाल असलेली कंपनी सुरू केली. मोहम्मद जावद असे या युवकाचे नाव.

 
जावद जेव्हा वर्षांचा होता तेव्हा त्याच्या वडिलांनी एक कॉम्प्युटर आणि एक जीमेलचा आयडी त्याला बनवून दिला. आपण आज सगळेच गुगलची सेवा घेतो. त्यासाठी एकाच आयडीची गरज असते. या आयडीमुळे जावदला संपूर्ण जगाची कवाडे उघडली गेली, तेही एका क्लिकवर. जावदने गुगलवर सगळ्या सेवांची माहिती घेतली, त्यातब्लॉगस्पॉटया गुगलच्या सेवेचाही समावेश होता. दररोज संशोधन करून तो शिकत होता. दहावीत असताना त्याने आपल्या वर्गमित्र श्रीरंगच्या मदतीनेज jasri.tk नावाची वेबसाईटही सुरू केली.

११ वीत असताना त्याने आपली स्वतःची TNM Online Solution ही संस्था सुरू केली. दोन कर्मचारी नेमून ही संस्था त्याने चालू ठेवली. पुढे अभ्यास करत करत जावद हे काम करत होता. फेसबुकच्या माध्यमातून त्याने अडीच हजारांत वेबसाईट बनवली जाईल, अशी जाहिरातही केली. त्यावेळी स्पॉन्सर्ड जाहिराती आलेल्या नव्हत्या. समाजमाध्यमाचा मुक्त आणि मोफत वापर कसा करता येईल, यावर त्याने भर दिला. दोनच कर्मचारी जरी संस्थेत कार्यरत असले तरी त्यांचा पगार वेळेत व्हावा, अशी जावदच्या आई फरीदा यांची इच्छा होती, त्यासाठी आपले दागिने गहाण ठेवण्यासाठीही त्या तयार होत्या, पण सुदैवाने तशी वेळ आली नाही. समाजमाध्यमांवर मोफत जाहिरात होत होती. नवनव्या लोकांना जावद वेबसाईट बनवून देत होते. ते काम पाहून इतर लोक जावदकडे येत. जावदचे कामच त्याचं व्हिझिटिंग कार्ड होतं. कॉलेज सुटल्यानंतर जावद थेट ऑफिस गाठत असे. वाजेपर्यंत तो काम करे. कधी कधी क्लायंटशी चर्चा करत रात्रीचे दोन वाजत, तेव्हा त्याची आई त्याच्यासाठी थांबत असे. कंपनी सुरू केल्यानंतर पहिल्याच वर्षी जावदकडे १०० वेबसाईटची ऑर्डर आली. कॉलेजमध्ये कमी हजेरी देऊनही त्याला बारावीला ८५ टक्के गुण मिळाले.

पुढे जावदने बारावी झाल्यानंतर बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये प्रवेश घेतला. कंपनी उभी राहत होती. महाविद्यालयात जाऊन हा व्यवसाय सांभाळणे शक्य नसल्याचे जावदच्या लक्षात आले. म्हणून त्याने यावर तोडगा काढत दुरस्थ शिक्षण घेण्याचे ठरवले. गुगलने एसऊ नावाची प्रणाली सुरू केली. या प्रणालीनुसार गुगलवर जी व्यक्ती हवी ती माहिती शोधत असेल त्याला स्थळ आणि विषयनिहाय माहिती देण्यास सुरुवात केली. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला एका विषयाच्या कोर्सबद्दल माहिती हवी असल्यास त्याला त्याच्या देशातील, राज्यातील किंवा शहरातील तो कोर्स किंवा संस्थेची माहिती मिळेल, अशी प्रणाली तयार केली. ही बाब जावदच्या पथ्यावर पडली. कारण जर केरळमध्ये कुणी स्वस्तात वेबसाईट बनवतं असं जर कुणी सर्च केले तर जावदची वेबसाईट दिसेल. याचा मोठा फायदा जावदला झाला.

TNM Online Solutins या कंपनीचा जावद सध्या व्यवस्थापकीय संचालक आहे. त्याच्या दोन शाखा आहेत. एक त्याच्या मूळगावी कन्नूरमध्ये आणि दुसरी दुबईत. त्याने रिअल इस्टेटचाही व्यवसाय सुरू करून त्याचे मुख्य कार्यालय भारताच्या सिलिकॉन व्हॅली असलेल्या बंगळुरूमध्ये थाटले. तिथे सध्या १०० कर्मचारी कार्यरत आहे. कन्नूरगावी जावदने वयाच्या १९ व्या वर्षी आपले घर बांधले. या यशामागे त्याचे आईवडील तर आहेतच पण त्याची बहीण फातिमाचाही तितकाच सहभाग असल्याचे जावद सांगतो.

आज वयाच्या २१ व्या वर्षी त्याच्याकडे दोन कंपन्या त्याच्या मालकीच्या असून त्याच्या तीन शाखा कार्यरत आहेत. ज्या वयात मुलं दुचाकीची स्वप्न बघतात, त्या वयात जावदकडे BMW कार आहे.

अर्थात समाजमाध्यमांचे किंवा नवमाध्यमांचे लोकशाहीकरण झाल्यामुळे हे शक्य झाले. माध्यमांचे लोकशाहीकरण म्हणजे एक असे की, पूर्वी आपली कामे दाखविण्यासाठी लोकांकडे व्यासपीठ नव्हते. माध्यमांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे कमी पर्याय लोकांना उपलब्ध होते. माध्यमांच्या लोकशाहीकरणामुळे समाजातल्या प्रत्येक घटकाला एक व्यासपीठ मिळाले. याचा पुरेपूर फायदा जावदने घेतला. इंटरनेटसारखे सशक्त माध्यम त्याने हुशारीने वापरले. आज त्याच्यामुळे कित्येक जणांना रोजगार उपलब्ध झाला. जावद हा खर्‍या अर्थाने डिजिटल इंडिया आणि गुगलचे प्रोडक्ट आहे.