पुन्हा तुर्कस्तानात एर्दोगनयुग...
महा एमटीबी   25-Jun-2018
एर्दोगन गेली १५ वर्षं तुर्कस्तानमध्ये सत्तेवर आहेत. २००३ ते २०१४ पर्यंत त्यांनी पंतप्रधान म्हणून काम पाहिलं त्यानंतर ऑगस्ट २०१४ मध्ये ते राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढले आणि थेट लोकांमधून निवडून आलेले ते पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले. त्यांच्या अध्यक्षपदाची मुदत २०१९ मध्ये संपणार होती मात्र त्याआधीच त्यांनी निवडणुका जाहीर केल्या आणि तुर्कीवर 'मेरा ही राज' असल्याचे विरोधकांना दाखवून दिले.

 

युद्धग्रस्थ सीरिया आणि युरोप यांच्या दरम्यान वसलेल्या तुर्कस्तानच्या 'सुलतानपदा'वर १५ वर्षांपासून विराजमान असलेले रेसेप तय्यप एर्दोगन यांनी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पुन्हा बाजी मारली. रविवारी मतदान झाल्यानंतर लगेच मतमोजणी सुरुवात झाली. राष्ट्राध्यक्षपद काबीज करण्यासाठी तुर्कीमध्ये किमान ५० टक्के मतांची गरज असते. जस्टीस अँड डेव्हलपमेंट पार्टीचे एर्दोगन यांनी एकूण ५३ टक्के मत मिळवून विजयाचा हा सिलसिला चालूच ठेवला आहे. त्यांनी रिपब्लिकन पीपल्स पार्टीचे मुहर्रम इन्स यांचा पराभव केला. अध्यक्ष एर्दोगन यांनी पुन्हा सत्तेत येण्यासाठी आवश्यक स्पष्ट बहुमत मिळवल्याचे तुर्कस्तानच्या निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केल्यानंतर देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे. 'हा विजय लोकशाहीचा व तुर्कस्तानच्या ८१ मिलियन नागरिकांचा आहे' असे अध्यक्ष एर्दोगन यांनी विजयानंतर देशाला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले आहे.

 

एर्दोगन गेली १५ वर्षं तुर्कस्तानमध्ये सत्तेवर आहेत. २००३ ते २०१४ पर्यंत त्यांनी पंतप्रधान म्हणून काम पाहिलं त्यानंतर ऑगस्ट २०१४ मध्ये ते राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढले आणि थेट लोकांमधून निवडून आलेले ते पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले. त्यांच्या अध्यक्षपदाची मुदत २०१९ मध्ये संपणार होती मात्र त्याआधीच त्यांनी निवडणुका जाहीर केल्या आणि तुर्कीवर 'मेरा ही राज' असल्याचे विरोधकांना दाखवून दिले. एर्दोगन यांची दडपशाही, भ्रष्टाचार, धर्मनिरपेक्षतेच्या पडद्याआडचा धार्मिक कट्टरतावाद याविरोधात विरोधक एकजूट झाले होते तर दुसरीकडे त्यांनी अर्थव्यवस्थेला लावलेले वळण, मध्यमवर्गाची वाढलेली क्रयशक्ती व आर्थिक प्रगती हा एर्दोगन यांचा मोठा आधार होता. एर्दोगन यांच्याविरोधात एकूण ५ उमेदवार उभे होते यामध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या रिपब्लिकन पीपल्स पार्टीचे मुहर्रम इन्स, पीपल्स डेमोक्रॅटिक्स पार्टीचे सेलाहातींन डेर्मितास आदी उमेदवार उभे होते. पीपल्स डेमोक्रॅटिक्स पार्टीचे डेर्मितास हे तुरुंगातून निवडणूक लढत होते. डेर्मितास हे कुर्दिश समर्थक असून ते गेल्या २० महिन्यापासून तुरुंगात आहेत. एर्दोगन यांच्या विजयानंतर जगभरातील समर्थ विजय साजरा करत आहेत. बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना एर्दोगन यांची स्तुती केली होती. तुर्कस्तानला पुढे नेणारा नेता अशा शब्दात त्यांचा गौरव केला होता अर्थात यामागे अमेरिकेचा संधिसाधूपणा होता. नेहमीप्रमाणे अमेरिका आपले काम करून घेण्यासाठी शत्रूलाही आपला मित्र करून घेते. याचे चांगले उदाहरण विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग यांच्यात झालेली वाटाघाटी. एर्दोगन हे लोकशाहीला मारक असताना व हुकुमशाहीकडे मार्गस्त होत असताना देखील नाटो देश तुर्कीच्या अध्यक्षांचे कौतुक कारण्यामागेही ओबामा यांचा सिरीयातील इसिस बंडखोरांच्या विरोधात तुर्कस्तानची मदत घेण्याचा स्वार्थ दडला होताच.

 

एर्दोगन यांचा जन्म २६ फेब्रुवारी १९५४ रोजी झाला. एर्दोगन यांचा राजकारणात प्रवेश नेकमॅटिन एर्बकन यांच्या वेलफेअर पक्षाचे सदस्य म्हणून झाला. पुढे जाऊन ते १९९४-१९९८ या काळात इस्तंबूलचे महापौर झाले. तुर्कीच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठा निर्णय एर्दोगन यांनी २०१७ मध्ये घेतला होता. त्यांनी सार्वमत घेऊन देशाचे सर्वाधिकार स्वत:कडे घेतले. म्हणजे एकीकडे तुर्कीने लोकशाही स्वीकारली मात्र दुसरीकडे अध्यक्षांकडे सर्वाधिकार देऊ केल्याने लोकशाही पद्धतीने देशाच्या गादीवर बसलेला 'सुलतान' अशाप्रकाची चर्चा सगळीकडे रंगली. सद्यस्थितीत पहायला गेलं तर तुर्कीमध्ये आर्थिक संकट असून यावर मात करणे एर्दोगन यांच्यापुढे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. मात्र याचबरोबर या निकालाचा मध्यपूर्वेच्या भागात व जागतिक राजकारणावरसुद्धा परिणाम होऊ शकतो. याचाही सामना करणे एर्दोगन यांच्यापुढे आव्हान असणार आहे. त्यामुळे दहशतवाद, आर्थिक संकट, जागतिक राजकारण आणि स्थानिक विरोधकांची एकजूट याला 'अध्यक्ष एर्दोगन' कसे सामोरे जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.