भारताच्या दिपिका कुमारीचा 'सुवर्णवेध'
महा एमटीबी   25-Jun-2018

अमेरिकेतील तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा केला पराभव

 
 
 
 
सॉल्टलेक सिटी : येथे होत असलेल्या यूएसए तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत (USA Archery World Cup) भारताच्या दिपिका कुमारीने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. महिला रिकर्व्ह फायनलच्या अंतिम फेरीत जर्मनीच्या मिशेल क्रॉप्पनवर ७-३ अशा गुणांनी मात करून दिपिका कुमारीने सुवर्ण पदक पटकावले. दिपिकाच्या या कामगिरमुळे देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
 
दरम्यान याआधी याच स्पर्धेमध्ये दिपिकाने २०११मध्ये रौप्यपदक, २०१२ मध्ये १ रौप्य आणि १ सुवर्ण, त्यानंतर २०१३ मध्येही १ रौप्य आणि १ सुवर्णपदकांची कमाई तिने केली होती. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर २०१८ च्या स्पर्धांमध्ये दिपिका कुमारीने सुवर्ण पदक मिळवले आहे. तसेच या विजयामुळे येत्या ऑक्टोबर महिन्यात तुर्की येथे होणाऱ्या या वर्षीच्या तिरंदाजीच्या अंतिम स्पर्धेसाठी देखील तिची निवड झाली आहे. अंतिम स्पर्धेसाठी झालेल्या या निवडीसंबधी देखील आपला आनंद व्यक्त केला आहे.
 
यानिवडीविषयी आपला आनंद व्यक्त करताना दिपिका म्हणाली की, मी स्वतःच्याच खेळाची पुनरावृत्ती करत होते, हरण्या-जिंकण्याचा विचार न करता सर्व काही मनापासून करत होते. तसेच माझ्या प्रत्येक खेळाचा मी मनापासून आनंद घेत होते. त्याचबरोबर मी टर्कीमध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणार आहे, त्यात काय होईल याचा आता मी काहीच विचार करत नाहीये, असे तिने यावेळी म्हटले.