जग बदल घालुनी घाव सांगुनी गेले भिमराव...
महा एमटीबी   25-Jun-2018
नांदेडच्या भोकर गावच्या बळीरामने शिक्षणाचा खर्च निघावा म्हणून रस्त्यावर खडी टाकल्या. पण, आज तोच बळीराम इंग्रजी साहित्याचे आंतरराष्ट्रीय अभ्यासक डॉ. बळीराम गायकवाड म्हणून उदयांकित झाला.

 

मुंबईतील महाविद्यालयात इंग्रजी प्राध्यापकाची जागा रिक्त होती. नांदेडच्या भोकर गावचा खऱ्या अर्थाने आर्थिक-सामाजिक स्तरावरील एक वंचित तरुण बळीराम गायकवाड मुंबईमध्ये आला. अर्थातच, रक्तातच आणि श्वासातच वंचित परिस्थितीविरुद्ध संघर्षासोबतच समन्वय साधण्याची वृत्ती असल्याने बळीराम त्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून निवडले गेले. पण, आयुष्याचा संघर्ष कधी कधी आयुष्याचा न राहता तो ललाटाचा भागच बनून जातो. त्यामुळेच की काय, बळीराम हे अनुसूचित प्रवर्गाच्या रिक्त जागेवर आरक्षणाअंतर्गत नियुक्त झाले होते. त्या जागेवर पूर्वी जी व्यक्ती होती, तिने न्यायालयात महाविद्यालयाविरुद्ध दावा टाकला. सामना त्या व्यक्ती विरुद्ध महाविद्यालय असा होता. पण, न्यायालयाने आदेश दिला की, अनुसूचित प्रवर्गानुसार नियुक्त झालेल्या उमेदवारालाही खटल्यात सामील करा. झाले, रिकाम्या खिशाने आणि भरलेल्या मनाने मुंबईत दाखल झालेल्या बळीरामपुढे एक मोठा पेच निर्माण झाला. वकील करायला पैसे आणायचे कुठून? बरं, त्याच कालावधीत घरात एक मोठे कौटुंबिक वादळ उठले झाले होते. मोठ्या आशेने आईबाबांचा निरोप घेऊन मुंबईत आलो, तर जोपर्यंत खटल्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत पगार नाही. यावेळी मुंबईतील बिर्ला महाविद्यालयाच्या म्हस्केसरांनी मोलाची साथ दिली. मुंबईतल्या शुभचिंतकांनी मानसिक आणि आर्थिक आधार दिला. त्यामुळे बळीराम अकरा महिने मुंबईत अक्षरश: जीव टांगणीला लावून राहिले. पुढे महाविद्यालय हे खटले जिंकले आणि बळीराम नोकरीवर नियुक्त झाले.

 

पण, ही तर केवळ सुरुवात होती. बळीराम यांना वाटले, आर्थिक, सामाजिक आणि आता कौटुंबिक पार्श्वभूमीवरही वंचितपणाचे दुःख अश्वत्थाम्यासारखे चिकटले आहे. मुंबईमधल्या नामांकित महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून संधी मिळाली, याला आरक्षण कारणीभूत आहे. नव्हे, असे त्यांना नेहमीच ऐकायला मिळे. त्यामुळे आता आर्थिक स्थिरता आल्यावर यापुढे एकही सवलत घ्यायची नाही. तसेच आरक्षणापलीकडे जाऊन बळीराम ही एक व्यक्ती आहे आणि सातत्यपूर्ण अभ्यास आणि कष्टपूर्ण प्रामाणिक प्रयत्न यानुसार आपण यश मिळवू शकतो, हे सिद्ध केलेच पाहिजे. त्यासाठी बळीराम यांनी अभ्यासपूर्ण प्रयत्न केले. उच्च शिक्षण घेतले. इंग्रजी साहित्यातील ‘स्त्रीवाद’ हा विषय घेऊन ‘डॉक्टरेट’ मिळवली आणि पुढे ‘पोस्ट डॉक्टरेट’साठी विषय निवडला. ‘महाराष्ट्रातील दलित आत्मचरित्र आणि आफ्रिकन अमेरिकन आत्मचरित्र यांचा तौलनिक अभ्यास.’ त्याचवेळी बळीराम यांचे समाजभान त्यांना शांत बसू देत नव्हते. महाविद्यालयातील गरजू, गरीब पण होतकरू मुलांना त्यांनी शैक्षणिक बाबतीत दत्तकच घेतले. जवळजवळ 300 महाविद्यालयीन विद्यार्थी त्यांच्या सहकार्याने ज्ञानसाधना करू लागले, आयुष्य घडवू लागले. पुढे गुणवत्तेबाबत जगातल्या पहिल्या पाच शिष्यवृत्तींमध्ये नोंद असलेल्या ‘नेहरू फुल ब्राईट’ ही शिष्यवृत्ती मिळवली. शिष्यवृत्तीचा विषय होता, महाराष्ट्र आणि अमेरिकेच्या जडणघडणीचा तौलनिक अभ्यास. ‘फुल ब्राईट’ शिष्यवृत्तीने बळीराम यांच्या गुणवत्तेला आणि अभ्यासशील कर्तृत्वाला कोंदण प्राप्त झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे इंग्रजी साहित्याचे अभ्यासक म्हणून बळीराम यांना आमंत्रणे येऊ लागली.

 
तो दिवस उजाडला, ज्या महाविद्यालयात नोकरी मिळविण्यासाठी मनात नसतानाही, परिस्थिती नसतानाही बळीराम यांना उगीचच न्यायालयाची पायरी चढावी लागत होती. त्याच महाविद्यालयाच्या संचालक मंडळाने मोठ्या सन्मानाने बळीराम यांच्याकडे विचारणा केली की, “तुम्ही आमच्या महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून जबाबदारी स्वीकारावी.” ज्येष्ठतेच्या बाबतीत बळीराम तसे कनिष्ठच होते, पण तरीही संचालक मंडळाने बळीराम यांना विनंती केली होती. तसे पाहायला गेले तर डॉ. बळीराम यांना अनेक संधी खुल्या होत्या. पण, त्यांनी संचालकांच्या म्हणण्याचा स्वीकार केला. एक वर्तुळ पूर्ण झाले होते. महाविद्यालयात आरक्षणामुळे नोकरी मिळाली, असे जे एक प्राक्तन होते. त्या प्राक्तनाला आता नवे सूर मिळाले. डॉ. बळीराम गायकवाड यांना आरक्षणामुळे नाही, तर गुणवत्तेमुळे, उच्च भावनाशील समाजभानामुळे महाविद्यालयात उच्च जबाबदारी मिळाली. कर्तृत्व आणि गुणवत्ता यामुळे आरक्षणही मागे पडते, हे सिद्ध झाले.
 
 डॉ. बळीराम गायकवाड म्हणतात, “मला आयुष्याचे अनेक चढउतार आठवतात. औरंगाबादला एम.एचे शिक्षण घेत असताना, रूम घेऊन मित्रासोबत राहायचो. दसऱ्याला आम्ही सर्व उपाशीपोटी दिवसभर रूमवर होतो. कारण, आम्हा हुशार विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या स्कॉलरशिपवर आमचे घर चालायचे. आता दिवस प्रयत्नपूर्वक बदलले आहेत, पण आमच्यासारखे जगणे होतकरू गरजू विद्यार्थ्यांच्या वाट्याला येऊ नयेत यासाठी प्रयत्न करतो. जमेल तितका खारीचा वाटा उचलतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आणि अण्णाभाऊ साठेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला. अण्णाभाऊ साठे सांगून गेलेत, “जग बदल घालुनी घाव, सांगून गेले भिमराव...” पण, हे घाव घालणे म्हणजे लक्ष्याप्रती प्रामाणिक, कष्टपूर्ण प्रयत्न आहेत. कारण, प्रामाणिक हेतूंसाठी केलेल्या कष्टांना पर्याय नसतो...

9594969638