ही तर तत्त्वाची लढाई : हेमंत टकले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2018
Total Views |

 
 
मुंबई : मुंबई पदवीधर मतदारसंघाची आताची ही लढाई उमेदवाराची नाही तर तत्वाची आहे. या देशात चांगला विचार जर रुजवायचा असेल तर परिवर्तनाच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची वाटते. म्हणून कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच अशा निर्धाराने आम्ही एकत्र आलो आहोत, त्यामुळे आम्ही नक्की विजयी होऊ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले यांनी व्यक्त केला. मुंबई पदवीधर मतदारसंघातील पुरोगामी पदवीधर आघाडीचे उमेदवार राजेंद्र कोरडे यांच्या उमेदवारीबाबत शेकाप कार्यालयात पुरोगामी पदवीधर आघाडीतर्फे आज संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रवक्ते संजय तटकरे यांच्यासह आघाडीतील अन्य नेते उपस्थित होते.
 
 
ही मुंबई पदवीधरांची निवडणूक असून त्यासाठी सगळे विरोधक पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे हे वैचारिक व्यासपीठ महत्वाचे आहे. आज देशात सत्ताधाऱ्यांकडून एकप्रकारचा उन्माद केला जातोय. त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. सर्वसामान्य नागरीक आज सुरक्षेच्या बाबतीक भयग्रस्त झालेला आहे. एका कुठल्यातरी विचारसरणीला हाताशी धरुन आपली सत्ता अतिशय बेलगामपणे वापरायची याच्यापलीकडे या सत्ताधाऱ्यांना सुचत नाही. आणि अशावेळेला ठामपणे उभे राहायचे म्हणून सगळे विरोधी पक्ष एकत्र आले आणि संघटना एकत्र आल्या आहेत. यामागे विचारसरणी हा भाग आहेच. डावीकडे झुकलेली विचारसरणी असणं म्हणजे या देशात गुन्हा आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर त्याला ठामपणे उत्तर देण्याची गरज आहे असेही टकले यावेळी म्हणाले.

 
 
मुंबईत जे घडते त्याचे दुरगामी परिणाम जाणवतात. ही एक निवडणूक महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणासाठी कलाटणी देणारी ठरेल इतकी महत्वाची आहे असा विश्वास आमदार हेमंत टकले यांनी व्यक्त केला.या निवडणुकीची यंत्रणा वेगळ्या प्रकारची असते. सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा हा भाग वेगळा असतो. नोंदणी होते त्याप्रमाणे मतदार होतात. त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचे काम करत असून त्यासाठी जी व्यवस्था करायला हवी ती आम्ही एकत्रितपणे करत असल्याचेही टकले यांनी सांगितले.
 
 
राजेंद्र कोरडे हे जनसामान्यांचे उमेदवार आहेत. कोरडे यांनी तळागाळातील लोकांशी संवाद साधला आहे. त्यामुळे आपण त्यांच्या पाठिशी उभे राहणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. आमची भूमिका स्वच्छ आहे, भारताचे संविधान धोक्यात आले आहे. आपण याचा विरोध आता केला नाही तर सत्ताधाऱ्यांची दडपशाही सुरूच राहील. आम्ही पुरोगामी विचारांनीच महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत, असे ते म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@