हटके मॉकटेल्स

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2018   
Total Views |



 

 
मान्सूनचे राज्यात आगमन झाले असले तरीही पावसाने पाठ फिरवलेलीच... त्यात अधूनमधून बरसणार्‍या सरी आणि मग पुन्हा ऊन-पावसाचा खेळ. तेव्हा, ऐन पावसाळ्यात अजूनही उष्णतेचा दाह जाणवतोच. त्यामुळे सरबतांचा थंडावा खरंच या मौसमातही हवाहवासा वाटतो. म्हणूनच आज अशाच काही हटके सरबतांची माहिती आजच्या ‘उदरभरण’मध्ये...

 

किवी ऑरेंज पंच

साहित्य : किवी, संत्र्याचा रस, बर्फाचा चुरा, आल्याचा रस, पुदिना

कृती : किवीचे तुकडे करून घ्या. संत्र्याचा बिया काढून, त्याच्या फोडी करून घ्या, आले बारीक चिरून घ्या. ज्युसरमध्ये सर्व गोष्टी घालून, ते छान एकत्र करून घ्या. ज्यूसरमधून त्याचा रस काढून घ्या. पुदिन्याच्या पानांनी गार्निश करा.

 

सिट्रस ट्विस्ट

साहित्य : नारळपाणी, लिंबाचा रस, साखर (गरजेनुसार), पुदिन्याची पाने, बर्फ, दोन लहानशी लिंबे.

कृती : लहान लिंबांतले एक लिंबू गोलगोल चकत्यांच्या स्वरूपात कापून घ्या. दुसर्‍या लिंबाच्या लहान लहान फोडी करा. एका भांड्यामध्ये लिंबाच्या फोडी घालून त्या खलून घ्या. आता त्यात नारळपाणी, साखर, लिंबूरस ओता. नीट ढवळा. ज्या पेल्यामध्ये हे पेय द्यायचे आहे, त्यात बर्फाचा चुरा घाला. त्यावर हे मिश्रण ओता आणि लिंबाच्या गोल चकत्या आणि पुदिन्याने सजवा.

 

मँगो बनाना वॉलनट स्मूदी

साहित्य : आंबा, दही, केळं, मध, अक्रोड, साखर, केशर

कृती : मिक्सरमध्ये आंबा, दही, केळे, मध, अक्रोड आणि साखर घालून फिरवून घ्या. क्रीमी मिश्रण होईपर्यंत फिरवा. मिश्रण जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नको. तयार मिश्रण ग्लासमध्ये काढून घ्या. फ्रीजमध्ये तासभर ठेवून सर्व्ह करा.

 

स्ट्रॉबेरी स्लश

साहित्य : स्ट्रॉबेरीचा क्रश, लिंबू रस आणि भरडलेला बर्फ एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवा. उंच ग्लासात ओतून सर्व्ह करा.

स्ट्रॉबेरी स्लश विथ मिंट

साहित्य : स्ट्रॉबेरी स्लश तयार करून, त्यात पुदिन्याची चार-पाच पानं कुस्करून घाला आणि सर्व्ह करा.

मँगो स्लश

साहित्य : मँगो ज्यूस, कोकोनट क्रीम, बर्फाचा चुरा, पुदिन्याची पानं

कृती : वरील साहित्य ब्लेंडर किंवा मिक्सरमध्ये घालून मिक्स करून घ्या आणि सर्व्ह करा. यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम घालून, ब्लेंड केल्यास मँगो स्मूदी तयार होईल.

मिंट नींबू पानी

साहित्य : नेहमीचं लिंबू सरबत करण्याऐवजी एका ग्लासच्या तळाशी पुदिन्याची पानं, लिंबूरस, साखर आणि बर्फाचा चुरा घाला. सोडा किंवा स्प्राईटने ग्लास भरा किंवा नेहमीप्रमाणे साखर, लिंबूरस, पाणी एकत्र करून त्यात पुदिन्याची पानं घाला आणि ब्लेंड करा. उन्हातून आल्यावर यामुळे नक्कीच तुम्हाला रिफ्रेशिंग फील मिळेल.

कोकम स्लश

साहित्य : कोकम सिरपमध्ये लिंबू रस, बर्फाचा चुरा

कृती : कोकम सिरप बाजारात सहज उपलब्ध असतेच, साखरयुक्त कोकम सिरप एका ग्लासमध्ये ओतून, त्यात थोडा लिंबाचा रस घाला, बर्फाचा चुरा घाला. ब्लेंड करा आणि सर्व्ह करा.

 

मसाला कोक

साहित्य : कोक, चाट मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना, आल्याचा रस, बर्फाचा चुरा.

कृती : कोकमध्ये चाट मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना, आल्याचा रस आणि बर्फाचा चुरा मिसळा. स्टर करून सर्व्ह करा. कोकची एक हटके चव तुम्हाला उन्हाची झळ विसरायला मदत करेल.

 

ब्लॅक करंट

साहित्य : ब्लॅक करंट क्रश, लिची क्रश, बर्फाचा चुरा, लिंबू रस

कृती : वरील साहित्य ब्लेंडरमध्ये ब्लेंड करून घ्या. नंतर सर्व्हिंग ग्लासमध्ये एकत्र करून सर्व्ह करा. ब्लॅक करंट क्रशऐवजी स्ट्रॉबेरी क्रशही छान लागतो.

 

स्पायसी कलिंगड

साहित्य : कलिंगडाच्या फोडी, कलिंगडाचा ज्यूस, बर्फाचा चुरा, एक हिरवी मिरची, पुदिना, साखर

कृती : एका ग्लासच्या तळाशी पुदिन्याची पानं आणि साखर घाला. बर्फाच्या खड्यांनी ग्लास पूर्ण भरा. वरून फ्रेश कलिंगड ज्यूस ओता. त्यात कलिंगडाच्या फोडी करून टाका. स्टर करून सर्व्ह करा. या मॉकटेलला तिखट फ्लेवरही देता येतो. त्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे मॉकटेल तयार करून घ्या. नंतर एक हिरवी मिरची उभी चिरून घ्या. बिया काढून ती मिरची ग्लासमध्ये एक-दोनदा फिरवा. तिखट फ्लेवर मिळेल.

@@AUTHORINFO_V1@@