अभ्यंगं आचरेत् नित्यम् भाग -३

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2018
Total Views |



 

अभ्यंग कसा करावा, तेल कुठल्या दिशेने लावावे हे सर्व सविस्तररीत्या आपण बघितले. आता तेल कुठले निवडावे, कुठल्या तेलांचा वापर करावा, याबद्दल जाणून घेऊया.

 
अभ्यंगाचे विविध उपयोग आपण मागील लेखात बघितले. अभ्यंगासारखी हितकर दिनचर्या कालबाह्य समजली जाते. ‘वेळ नाही’ या सबबीखाली अभ्यंगाला आपण मुकतो. लहान मुलांना, तान्हुल्यांना नित्य तेल लावून, आंघोळ घातली जाते. त्यांच्या शरीराचे पोषण, वाढ, बळकटी वाढावी म्हणून. मग, हेच फायदे मोठे झाल्यावर नाहीसे का होतात? स्वतःच्या स्वास्थ्यासाठी, आरोग्यरक्षणासाठी जे जे करायला हवे, त्यासाठी अवश्य वेळ काढावा. आजारी पडल्यावर औषधोपचार करण्यापेक्षा, आजारी न पडण्यासाठी काळजी घेणे कधीही उत्तम.
 
 

तीळ तेल : आहारात, औषधांत व पूजाकर्मादी कार्यांमध्ये तीळ मोठ्या प्रमाणात वापरले जातात. आयुर्वेदात जिथे जिथे फक्त ‘तैल’ (तेल) असा उल्लेख आहे, तिथे तिथे तीळ अभिप्रेत आहे. असे म्हटलेच आहे. ‘तीलोद्भवं तैलम्।’ म्हणजे जे तिळापासून काढले जाते, ते तेल. तिळाच्या तेलाने अभ्यंग केल्यास, कृश व्यक्ती सशक्त होते आणि स्थूल व्यक्ती कृश होते. म्हणजे शरीरयष्टी उत्तम करण्यासाठी आणि राखण्यासाठी (Maintain) तीळतेलाचा उपयोग करावा, हे वैशिष्ट्य फक्त तीळतेलातच आहे.

 
 

तीळ उत्तम ’स्नेहन’ करते. (शरीराला स्निग्धांश देते.) वेदनाहारक आहे. तसेच व्रणशोधकही आहे. म्हणजे जखम असल्यास ती स्वच्छ करण्यास मदत करते आणि स्वच्छ करून, भरून आणण्यासही उपयोगी आहे. नित्य (दररोज) तीळतेलाने अभ्यंग केल्याने त्वचेतील रुक्षता तर कमी होतेच, पण रक्तप्रवाह अबाधित होतो आणि त्वचा निरोगी होते. अंगकांती सुधारते, हाडांना बळकटी येते आणि शरीराची व्याधींशी (रोगांशी) लढण्याची क्षमता वाढते. निरोगी आयुष्य हे दीर्घायूदेखील होते.

 
 

तीळतेलामध्ये भिन्न-भिन्न औषधी द्रव्य घालून, ते तेल सिद्ध केलं, (विविध औषधांनी संस्कारित केलेलं तीळतेल) तर ते विभिन्न आजारांवर उपयोगी ठरते. वेगवेगळ्या वेदना शमविते. विविध वातामुळे होणार्‍या व्याधींवर उपयोगी आहे.

 
 

तीळतेलाचा वापर फक्त अभ्यंगासाठीच नाही, तर कर्णपूरक (कानात तेल घालणे), नेत्रतर्पण (डोळ्यांत तेल घालणे), आहारातून समावेश, बस्ती या पंचकर्मासाठी, तसेच अन्य सिद्ध तेलं बनविण्यासाठीही होतो. भाजलेल्या जखमेवर व जुनाट जखमेवर तीळतेलाची पट्टी बांधावी. जखम लवकर भरून येते किंवा तीळतेलात सुंठ, हिंग, लसूण इ. द्रव्ये घालून, तेल गरम करावे व ते सांध्यांना, अंगाला लावावे. सर्व दुखणी लगेच कमी होतात. केसांसाठीही तीळतेल उपयोगी आहे. केस वाढणे, काळे होणे आणि मऊ होणे यासाठी तीळतेलाने शिरोभ्यंग करावे. (केसांना तेल लावावे) तीळतेलात चिंचेचा कोळ सिद्ध केल्याने जे तेल तयार होते, तेही मलबद्धतेसाठी बस्ती या चिकित्सेत उपयोगी आहे.

 
 

आयुर्वेदात विभिन्न तेलांचे गुणधर्म सांगितले आहेत. आचार्य असे म्हणतात की, सर्वच तेलं वाताचे हरण तर करतातच, पण तीळाचे तेल अत्यंत वातनाशक आहे व अन्य औषधांच्या संयोगाने आणि संस्काराने सर्वच रोगांवर मात करणारे ठरते. हे केसांसाठी उत्तम आहे. ताकद देणारे आहे. कफ, वात, जंतू (उवा इ.), खरूज, खाज, जखम याला नष्ट करणारे, कांतिउपकारक, कांतिदायक आहे.

 
 

तीळतेल उष्ण (गरम) आणि तीक्ष्ण असल्याने पित्त व रक्तामुळे होणार्‍या रोगांमध्ये वापरू नये, तसेच लहानांमध्ये व वृद्धांमध्ये पथ्यकर आहे. म्हणजेच उपयोगी आहे, बाधत नाही.

 

एरंडेल तेल: या तेलाने ताकद येते, पित्त वाढते. यामध्ये चिकटपणा अति असतो. त्यामुळे अभ्यंगाला हे तेल सहसा वापरले जात नाही. या तेलाला थोडा दुर्गंधही असतो. (पण हल्ली त्यावर प्रक्रिया करून, बाजारात आणले जाते. त्याने वास उग्र राहत नाही.) एरंडाचे तेल कृमिनाशक आणि सर्व प्रकारच्या शूलांवर (दुखण्यांवर) उपयोगी आहे. (शूलघ्न) कुष्ठ म्हणजे केवळ rejuvenation properties

 
 

नाही, तर ज्यातून स्त्राव येतो आणि सर्व चिरकालीन त्वचा विकार) आणि वातावरही उपयोगी आहे. हे तेल रसायनाचेही कार्य करते. (leprosy) परंतु हे तेल पित्ताला कुपित करणारे आहे वायुनाशक आणि शोधक अशी दोन्ही गुणधर्म एरंडेल तेलात आहेत.

 

खोबरेल तेल : हे तेल केश्य (म्हणजे केस वाढण्यास हितकर) आहे. त्याचबरोबर विविध त्वचाविकारांमध्येही या तेलाचा चांगला उपयोग होतो. जखमा भरण्यासाठीदेखील या तेलाचा उत्तम फायदा होतो. (व्रणरोपण) खोबरेल तेल हे सर्व वयोगटांसाठी सर्व व्यक्तींसाठी हितकारक आहे. त्याचा अपाय होत नाही. (याचा अपवाद केवळ आमवात. आमवात असल्यास तेल लावू नये. तेल लावल्यास एरंडेलात सुंठ घालून लावावे, अन्य कोणतेही तेल नाही)

 
 

सरसोंचं तेल : याला मराठीत ’शिरसी’ असे म्हणतात व इंग्रजीत mustard म्हणतात. संस्कृतमध्ये याला ‘सर्षप’ म्हणतात. सर्षप तेल आणि राजिका तेल यांत थोडा फरक आहे. सर्षप तेल हे पिवळ्या/पांढर्‍या बियांपासून काढले जाते. या तेलाचा व तेलबियांचा अधिक वापर उत्तर भारतात होतो. जिथे थंडी अधिक पडते, तिथे हे सर्षप तेल उपयोगी आहे. सर्षप तेल जंतुघ्न आहे. वेदनेचे शमन करणारे आहे आणि उत्तम स्नेहन (स्निग्धांश) असलेले आहे. सर्षप तेल खाजही कमी करते. पचायला व शोषणाला हलके आहे. उष्ण (गरम) असल्याने, पित्त व रक्त दूषित करते. पण, याच्या अभ्यंगाने मेदाचे (चरबीचे) प्रमाण कमी होते. तसेच ते ’कर्णरोग’ (कानाच्या तक्रारी) व ’शिरोग्रह’ या रोगांमध्येही उपयोगी आहे. त्वचाविकारांमध्ये सर्षप तेलाचा वापर करावा ते लावावे. ताकद वाढण्यासाठी नियमित (दैनिक) अभ्यंग करावे असे शास्त्रकार सांगतात. दातांमध्ये, हिरड्यांमध्ये पू झाल्यास सर्षप तेलात सैंधव मीठ घालून, ते लावावे. याने आराम पडतो.

 
 

राजिका तेल : मोहरी अथवा राईला संस्कृतमध्ये ‘राजिका’ म्हणतात. इंग्रजीत यास ’'indian mustard' असे म्हणतात. महाराष्ट्रात व दक्षिण भारतात मोहरीचा वापर फोडणीसाठी केला जातो. हे काळ्या रंगाचे दाणे (तेल बियाणे) असतात. हे तेल खूप गरम असते. थंडीमुळे अंग/सांधा जखडल्यास राजिका तेल लावावे. लघवीचा त्रास होत असल्यास (लघवी थोडी थोडी आणि थांबत थांबत होणे) राजिका तेल वापरावे. हे तेल खाज (कफामुळे असल्यास) तर कमी करतेच, पण, त्याचबरोबर विशिष्ट त्वचाविकारामध्ये जसे पामा, अंगावर चट्टे उठणे मध्येही उपयोगी आहे. राजिका तेल कृमिनाशकही आहे. विविध आजारांमध्ये मोहरीच्या बियांचा लेप लावावा, असे आयुर्वेदाने सांगितले आहे. जसे संधिवात कटिशूल, आमाशयशूल, दौर्बल्य इ. पण, हा लेप दहा मिनिटांच्या वर कधीही लावू नये, अन्यथा त्या जागी तीव्र स्वरुपाची आग होते. हा लेप कधीही गरम करू नये. साध्या पाण्यातूनच लावावा.

 
 

करडईचे तेल : संस्कृतमध्ये करडईला ‘कुसुम्भ’ असे म्हणतात. आयुर्वेदानुसार कुसुम्भ तेल हे तिन्ही (वात-पित्त-कफ) दोषांना बिघडविणारे आहे. कुपित करणारे आहे. त्यामुळे त्याचा वापर टाळावा.

वरील सर्व तैलप्रकार विविध प्रातांमधून आहारात वापरले जातात. त्यांचा अभ्यंतर वापर, भाजी शिजविण्यासाठी, फोडणी देण्यासाठी केला जातो. मात्र कुसुम्भ तेल वगळता, अन्य सर्व तेलं बाह्य प्रयोगासाठीही उपयोगी आहेत.

 
 

क्षौमादि तेल : क्षौम म्हणजे अळशी. अळशीचे तेल वातनाशक पित्तकारक आहे. तसेच डोळ्यांसाठी अहितकर आहे.

 
 

बिभीतक तेल : बिभीतक म्हणजे बेहडा. बेहडा हा त्रिफळातील एक घटक आहे. (आवळा, हरडा आणि बेहडा मिळून त्रिफळा तयार होते) हे तेल कफ आणि वात (जे अतिरिक्त वाढले आहेत आणि ज्यांमुळे शरीरात रोग होऊ शकतात) त्यांचा नाश करणारे आहे. केसांसाठी बेहड्याचे तेल उपयोगी आहे. तसेच डोळ्यांना आणि कानांनाही तर्पण करणारे (पोषण करणारे) आहे.

 
 

काही तेलांचा वापर विशिष्ट कार्यांसाठी होतो. सर्व तेलांचा अभ्यंगासाठी वापर होत नाही. अशा विशिष्ट उपयोगासाठी सांगितलेल्या तेलांबद्दल पुढील लेखात अजून जाणून घेऊ.

 
 

(क्रमश:)

वैद्य कीर्ती देव

(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@