होय, बरीच शांतता आहे!
महा एमटीबी   21-Jun-2018 

‘तिकडे’ जाऊन सर्व पावन झाले आहेत.” पण खरे सांगायचे तर नाशिकमध्ये खरंच बऱ्यापैकी शांतता आहे, हे भुजबळांना कोणी सांगावे? आणि देशाच्या, राज्याच्या, शहराच्या, गल्लीच्या गुन्हेगारीसाठी राज्याचा प्रमुख जबाबदार असतो, असेच त्यांनी अप्रत्यक्षपणे कबूल केले आहे आणि ‘आमच्या काळात शांतता नव्हती’ याचा कबुलीजबाबच त्यांनी यातून दिला आहे.
 
नाशिकचे माजी पालकमंत्री आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाला. विविध कार्यक्रम आटपून नाशिक दौऱ्यावर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अतिशय उल्हसित असणाऱ्या भुजबळांनी उपहास करत नाशिकमधील कायदा-सुव्यवस्थेवर आपल्या परीने मार्मिक टिप्पणी केली व आपले ‘वाकबळ’ दाखविले. यावेळी भुजबळ म्हणाले की, “नाशिकमध्ये सर्व कसं शांत आहे. कुठे आहेत खून, लूटमारीच्या घटना? अशा घटना फक्त आम्ही सत्तेत होतो, तेव्हाच होत होत्या. आता ‘तिकडे’ जाऊन सर्व पावन झाले आहेत.” पण खरे सांगायचे तर नाशिकमध्ये खरंच बऱ्यापैकी शांतता आहे, हे भुजबळांना कोणी सांगावे? आणि देशाच्या, राज्याच्या, शहराच्या, गल्लीच्या गुन्हेगारीसाठी राज्याचा प्रमुख जबाबदार असतो, असेच त्यांनी अप्रत्यक्षपणे कबूल केले आहे आणि ‘आमच्या काळात शांतता नव्हती’ याचा कबुलीजबाबच त्यांनी यातून दिला आहे. मुळात गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि ती एक प्रवृत्ती आहे. त्यांच्या ‘भुजात बळ’ हे केवळ सत्ताकारणात कोण आहे, यामुळे येत असते का? विरोधी पक्षाच्या नेत्याच्या मतदारसंघात कायदा-सुव्यवस्था कायम अबाधित असते का? याची उत्तरे या निमित्ताने भुजबळांनी द्यायला हवीत.
 

आजमितीस नाशिकमध्ये भूषण लोंढे, टीप्पर गँगचे सर्व गुंड, गल्लीबोळातील स्वयंघोषित भाई, दादा यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. तसेच त्यांची विधीवत धिंड देखील काढली आहे. गेल्या चार-पाच वर्षांत गाड्या जाळण्याचे तुरळक प्रकार वगळता मोठे जळीतकांड घडले नाही आणि हे सर्व ‘साहेब’ आपण पालकत्व घेतलेले असताना नाशिकमध्ये घडत होते. याचे किमान स्मरण आपण ठेवावे, हीच माफक अपेक्षा. ‘साहेबांनी’ हेही लक्षात घ्यावे की, प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नाशिकनगरी आहे आणि रामराज्यातही गुन्हेगारी होतीच. त्यामुळे आधुनिक जगात कायमच शांतता नांदावी, अशी जर साहेबांची मनिषा होती, तर साहेबांनी त्यांच्या गृहमंत्रिपदाच्या काळात पोलीस खाते का बरखास्त केले नाही? कारण, जर सर्वत्र शांतता केवळ ‘सत्तेत कोण आहे’ यामुळे ठरत असेल तर, त्यांच्या काळातच हा चमत्कार घडला असता तर किमान भविष्यात विविध तुरुंगांमध्ये अनेक ‘भुजबळ फार्म’ तरी आम्हा पामरांना पाहावयास मिळाले असते. त्यामुळे ‘दत्तक’ घेतलेल्या नाशिकमध्ये कोणे एकेकाळी पालकत्व असलेल्या नाशिकपेक्षा खरंच बऱ्यापैकी शांतता आहे. आपण चिंता करू नये.

 

अन् दृष्टिकोन बदलला...

 

नादुरुस्त पथदीप, ओसंडून वाहणारे गटाराचे घाण पाणी, अस्वच्छ-दुर्गंधीयुक्त परिसर, अनियमित पाणीपुरवठा अशा विविध नागरी समस्यांसाठी नगरसेवकांसह महापालिका कार्यालयाचे उंबरठे झिजविणाऱ्या नाशिककरांना मागील चार महिन्यांत ऑनलाईन तक्रार निवारण कार्यप्रणाली भ्रमणध्वनी अॅप आणि संकेतस्थळाने चांगलाच दिलासा दिला आहे. महापालिकेच्या कार्यपद्धतीबद्दल सुमारे ५५ टक्के नाशिककरांनी समाधान व्यक्त केले आहे. ऑनलाईन तक्रार निवारणात गत चार महिन्यांत १० हजारांपैकी ९४७७ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. सुमारे २० लाख लोकसंख्येच्या नाशिकमध्ये सुस्त महापालिका प्रशासन आता कार्यप्रवण झाले असून तो शहरवासीयांसाठी एक सुखद धक्काच म्हणावा लागेल. नागरिकांना केंद्रबिंदू मानून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वेगवेगळ्या संकल्पना प्रत्यक्षात आणल्या. त्यात तंत्रज्ञानाचा चपखलपणे उपयोग केला. तक्रार निवारण कार्यप्रणाली भ्रमणध्वनी अॅप आणि संकेतस्थळ हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. आपल्या भागातील कोणताही प्रश्न किंवा समस्या सोडविण्यासाठी आजवर नगरसेवक अथवा पालिकेच्या कार्यालयात खेटे मारण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मात्र, या प्रणालीने प्रशासनाच्या कामकाजाचा नूरच पालटला आहे. तक्रार दाखल करण्यासाठी नागरिकांना कोणाकडे जाण्याची गरज भासत नाही. घरबसल्या ऑनलाईन कोणीही थेट तक्रार नोंदवू शकतो. प्राप्त तक्रारी मुदतीत सोडविण्याचे दायित्व असल्याने संबंधित विभागांचा कामकाजातील हलगर्जीपणा आपसूकच दूर झाला आहे. ऑनलाईन तक्रार करणाऱ्यांपैकी ५४.९२ टक्के नाशिककरांनी तक्रारीचे तत्परतेने निराकरण झाल्यामुळे समाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. या एका प्रणालीमुळे शहरवासीयांचा महापालिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आजवर दाखल झालेल्या तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी विद्युत विभागाशी संबंधित, तर सर्वात कमी तक्रारी विविध कर विभागाशी संबंधित आहेत. चार महिन्यांत ९३.८४ टक्के तक्रारींचे तत्परतेने निराकरण झाल्यामुळे नागरिक सुखावले आहेत. प्रशासनाच्या गतिमानतेचे उत्तम उदाहरण सध्या नाशिकमध्ये पाहावयास मिळत आहे. त्यातच माजी पालकमंत्र्यांनी, “सध्या महापालिकेत कामे किती वेगाने होत आहेत?” असे उपहासात्मक बोल नुकतेच ऐकवले. नकळत का होईना, पण ते खरे बोलले याचे समाधान निश्चितच नाशिककरांच्या ठायी असणार, यात शंका नाही.

 

- प्रवर देशपांडे