संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेतून अमेरिका बाहेर
महा एमटीबी   20-Jun-2018

मानवाधिकारांच्या बाबतीत परिषद पक्षपात करत असल्याचा आरोप


वॉशिंग्टन डी.सी. :
संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेमधून  अमेरिकेने अखेर बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. परिषद ही मानवाधिकारांच्या बाबतीत पक्षपात करत असून ही परिषद मानवाधिकारांच्या रक्षणासाठी आता पूर्वीप्रमाणे सक्षम नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. त्यामुळे अमेरिका संघटनेतून बाहेर पडत आहे, असे अमेरिकेने घोषित केले केले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव माईक पॉम्पियो आणि संयुक्त राष्ट्रातील राजदूत निकी हेले यांनी एक पत्रकार परिषद घेऊन याविषयी घोषणा केली आहे. यामध्ये त्यांनी परिषदेवर पक्षपात करण्याचा आरोप लावला आहे. परिषद ही काही ठराविक देशांमध्येच होत असलेल्या मानवाधिकारांच्या हननविषयी नेहमी वक्तव्य करते. परंतु व्हेनेझुएला, इराण या सारख्या देशांमध्ये होत असलेल्या मानवाधिकारांच्या हननाकडे ती सोयीने दुर्लक्ष करते. इतकेच नव्हे तर ज्या देशांमध्ये मानवाधिकारांना काहीच किमत नाही, अशा देशांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना परिषदेचे सदस्यत्व बहाल केले जात आहे. त्यामुळे ही परिषद फक्त एका बुजगावण्याप्रमाणे काम करत असल्याचा आरोप यावेळी दोन्ही नेत्यांनी आपल्या वक्तव्यामध्ये केला. तसेच परिषदेच्या  इस्राईलविरोधी धोरणांवर देखील त्यांनी यावेळी टीका केली. तसेच अमेरिका परिषदेमधून जरी बाहेर पडत असला तरी देखील मानवाधिकारांच्या रक्षणाबाबतीत अमेरिका नेहमी सजक आणि जागरूक राहील, असे देखील त्यांनी म्हटले आहे.


दरम्यान अमेरिकेने या अगोदर देखील परिषदेच्या अनेक निर्णयांवर आणि वक्तव्यांवर टीका केलेली आहे. व्हेनेझुएलासह अनेक देशांमध्ये गेल्या वर्षी झालेल्या मानवाधिकारविरोधी कृत्यांवर  परिषदेने कधीही वक्तव्य केले नाही. परंतु म्यानमारमध्ये झालेल्या रोहिंग्या विस्थापानावर आणि जेरुसलेमला अमेरिकेने मान्यता दिल्यानंतर परिषदेचे नेते बिन राद अल हुसैन यांनी या दोन्ही गोष्टींना मात्र कडाडून विरोध केला होता. तसेच परिषदेने पॅलेस्टाईन नागरिकांच्या समर्थनार्थ एक प्रस्ताव ही पारित केला होता. याचवेळी अमेरिकेने परिषदेवर पक्षपात करत असल्याचा आरोप केला होता. तसेच अमेरिका आपल्या सदस्यत्वावर विचार करेल असा इशारा देखील दिला होता.