'सैराट झालं जी' ची सर 'कोई धडक है ना.." ला येणार का?
महा एमटीबी   20-Jun-2018

 
 
मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून धडक हा चित्रपट चर्चेत आहे. मराठमोळ्या सैराटचा हिंदी रीमेक असल्याने धडकविषयी मराठी प्रेक्षकांच्या मनात देखील खूप उत्सुकता आहे. आज काही वेळापूर्वीच धडक या चित्रपटातील प्रमुख गाणं "धडक है ना.." प्रदर्शित करण्यात आलं. या गाण्याला संगीत सैराटच्याच अजय अतुल यांनी दिलं आहे, तर गाण्याला आवाज दिला आहे, प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आणि अजय गोगावले यांनी. एकूण गाणं सुंदर असलं तरी देखील 'सैराट झालं जी' ची सर या गाण्याला आलेली नाही. त्यामुळे कदाचित प्रेक्षकांचा भ्रम निरास होऊ शकतो.
 
 
 
 
 
गाण्यासाठी वापरण्यात आलेल्या लोकेशन्स खूप सुंदर आहेत. नृत्य शिकत असतानाची पार्थिवी म्हणजेच जान्हवी कपूर गाण्यात खूप सुंदर दिसली आहे. राजस्थानातील वेगवेगळ्या आकर्षक स्थळांवर चित्रीकरण केल्यामुळे गाणं प्रभावी आणि आकर्षक नक्कीच झालं आहे. मात्र रीमेक असल्या कारणाने प्रत्येका दृश्याची, गाण्याची तुलना होणे साहजिकच आहे. त्यामुळे जो शांत, सुरेल आणि प्रेमळ भाव 'अलगुज माझं... " हे गाणं सुरु झाल्या झाल्या येतो, तो या गाण्यात येत नाही.
 
 
 
 
 
 
 
 
ईशान खट्टर याने प्रमुख भूमिकेत चांगले काम केले आहे, याची एक झलक या गाण्यातून देखील मिळाली. ईशान आणि जान्हवी दोघेही खूप सुंदर दिसले आहेत, त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली आहे. दिग्दर्शक शशांक खैतान यांच्या 'धडक' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.